काश्मिरी मजूराची लेक खेळणार आयपीएल, जासिया अख्तरच्या जिद्दीला सलाम! क्रिकेटसाठी घर सोडलं आणि...
Updated:February 16, 2023 17:47 IST2023-02-16T17:29:54+5:302023-02-16T17:47:53+5:30
Kashmiri girl Jasia Akhtar Women's Cricket : प्रतिकूल परिस्थितीत मैदानावर आपले स्थान निर्माण करणाऱ्या जिद्दी तरुणीची गोष्ट

तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. भारतीय क्रिकेटपटू जासिया हिने हे सिद्ध करुन दाखवले आहे (Kashmiri girl Jasia Akhtar Women's Cricket).
मुलींनी क्रिकेट खेळणं हे आता काही प्रमाणात आपल्या समाजात पचनी पडत असलं तरी थेट काश्मिरसारख्या भागातून येऊन आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करणं नक्कीच सोपं नाही. पण जासिया अख्तरने ते सिद्ध करुन दाखवलं आहे. काश्मिरची ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
महिला प्रिमियर लीगच्या नुकत्याच पार पडलेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या टिमने जासियाला २० लाख खर्च करुन आपल्या टिममध्ये घेतलं आहे. जासियासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.
काश्मिरमधील शोपिया जिल्ह्यातील बारीपोरा गावात राहणाऱ्या जासियाच्या घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे. ४ बहिण-भाऊ, वडील मजुरीचे काम करत असल्याने इतक्या जणांचा उदरनिर्वाह करणे ही त्यांच्यासाठी काहीशी अवघड गोष्ट आहे.
सुरुवातीला क्रिकेट काय असते हेही माहित नसलेल्या जासियाने स्वत:च्या मेहनतीवर क्रिकेटसारख्या खेळात आपले स्थान निर्माण केले आहे. काश्मिरसारख्या ठिकाणी महिला क्रिकेटसाठी प्रतिकूल वातावरण नसल्याने जासियाने आपले गाव सोडून थेट पंजाब गाठले.
आपल्या आक्रमक फलंदाजीने महिला क्रिकेट विश्वात स्थान निर्माण करणारी जासिया मागच्या २ वर्षांपासून राजस्थानकडून खेळते. ३४ वर्षांची असलेली जासिया मिताली राज, झुलन गोस्वामी, दिप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर यांसारख्या स्टार खेळाडुंसोबत खेळली आहे.