लेकीसाठी सोडली वैद्यकीय प्रॅक्टिस! दिव्या देशमुखच्या आईचाही मुलीसाठी मोठा निर्णय, दिली खंंबीर साथ...
Updated:July 29, 2025 17:57 IST2025-07-29T17:38:15+5:302025-07-29T17:57:19+5:30
Divya Deshmukh: Divya Deshmukh Women's World Cup Champion : Divya Deshmukh defeats Humpy Koneru : लेकीला आईबाबांचा खंबीर पाठिंबा, विश्वविजेतेपदापर्यंत मारली मजल...

दिव्या' जिच्या नावाचाच अर्थ आहे, अतिशय तेजस्वी. नागपूरची ही (Divya Deshmukh Women's World Cup Champion) लेक आज देशाचा अभिमान ठरली आहे. वयाच्या १९ व्या वर्षी तिनं कमावलेलं हे यश तिचं आणि तिच्या आईबाबांसह प्रशिक्षकांच्याही जिद्दीचं उत्तम उदाहरण आहे.
महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या दिव्या देशमुखने विजेतेपद मिळवलं. लहानपणापासून ही मुलगी बुद्धिबळ खेळते आणि आपल्या लेकीला यात रस आहे हे समजून तिच्या आईने आपलं करिअर बाजूला ठेवलं.
दिव्याची आई डॉ. नम्रता देशमुख या स्त्रीरोगतज्ज्ञ, वडील डॉ. जितेंद्र देशमुख हे देखील डॉक्टर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. डॉ. नम्रता यांनी आपली उत्तम प्रॅक्टिस थांबवली कारण मुलीला आणि मुख्य म्हणजे तिच्या बुद्धिबळ स्पर्धा आणि सरावाला वेळ देता यावा.
बुद्धिबळ स्पर्धांना मुलांना नेणं हे सोपं काम नसतं. अनेकदा प्रवास असतो, अनेक दिवस बाहेरगावी जावं लागतं. अगदी परदेशीही जाण्याची तयारी करावी लागते. दिव्याच्या आईनं लेकीसाठी हे सारं आनंदानं केलं.
१९ वर्षांच्या दिव्या देशमुखने जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या टाय-ब्रेकरमधील दुसऱ्या रॅपिड गेममध्ये अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव केला. त्यावेळीही आई तिच्या साेबत होती.
विजयी होताच दिव्यानं आईला मारलेल्या मीठीचा व्हिडिओ व्हायरल आहे. मायलेकीचा एक अत्यंतिक आनंदाचा क्षण. दोघींना न बोलता एकमेकींच्या मनातलं कळावं इतका आनंद आणि समाधानाचा.
दिव्याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेच महिला 'फिडेमास्टर' हा किताबही आपल्या नावे केला. कमी वयात हा बहूमान मिळविणारी दिव्या भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली होती.
दिव्या देशमुखने आतापर्यंत जगभरतील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ ब्रॉंझ पदकांची कमाई केलेली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिच्या नावावर सुवर्ण आणि ब्राँझ पदक आहे. बुद्धिबळातील या अद्वितीय कामगिरी आणि योगदानाबद्दल राज्य सरकारने दिव्याला दोन वर्षांपूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहे.