Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
Updated:November 3, 2025 14:22 IST2025-11-03T14:08:21+5:302025-11-03T14:22:45+5:30
Deepti Sharma : अर्धशतकी खेळीनंतर दीप्ती शर्माने पाच विकेट्सचा डाव साधत संघाला ५२ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महिला क्रिकेट विश्वात भारतीय महिलांनी नवा इतिहास घडवला. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत एकदिवसीय विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं.
शफाली वर्माच्यासह दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने २९९ धावांचा बचाव करत फायनल बाजी मारली. दीप्ती प्लेयर ऑफ द सीरीज ठरली आहे.
अर्धशतकी खेळीनंतर दीप्ती शर्मानं पाच विकेट्सचा डाव साधत संघाला ५२ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दीप्तीच्या ऐतिहासिक कामगिरीने कुटुंबीय, नातेवाईक, शेजाऱ्यांना मोठा आनंद झाला आहे. तिच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, मिठाई वाटण्यात आली.
दीप्ती शर्माच्या घरी सकाळपासूनच मॅचची आतुरतेने वाट पाहत होते. दीप्तीची आई सुशीला शर्मा प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेल्या, तर वडील भगवान शर्मा आपल्या मुलीच्या संघर्षमय दिवसांची आठवण काढून भावनिक झाले.
भगवान शर्मा म्हणाले की, लहानपणीच दीप्ती भाऊ सुमित शर्मासोबत खेळायला मैदानावर जायची. तेव्हाच तिला क्रिकेटमध्ये रस निर्माण होऊ लागला.
एके दिवशी जेव्हा चेंडू दीप्तीकडे आला आणि तिने तो फेकला, तेव्हाच विकेट गेली. त्याच दिवशी सुमितने दीप्तीला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न पाहिलं.
दीप्तीच्या भावाने तिला कोचिंग, ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात समाज आणि नातेवाईकांनी यावरून खूप टोमणे मारले. मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका असं सांगितलं. पण कुटुंब दीप्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आणि तिच्या स्वप्नांना बळ दिलं.
दीप्तीची आई सुशीला शर्मा म्हणाल्या की, दीप्तीला नेहमीच क्रिकेट आवडत होतं आणि कुटुंबाने तिला नेहमीच खेळण्याची परवानगी दिली.दीप्ती हनुमानाची एक मोठी भक्त आहे आणि ती दररोज हनुमान चालीसा म्हणते.
मी मंदिरात प्रार्थना केली की, आपल्या देशाच्या लेकी जिंकाव्या आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. मुली जिंकल्या. घरात खूप आनंदाचं वातावरण आहे. दीप्ती आग्र्याला आल्यावर मोठा उत्सव साजरा करू असंही आईने म्हटलं.
२००५ आणि २०१७ मध्ये अधुरं राहिलेल स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघानं स्वप्ननगरीत साकार करून दाखवलं. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने शतकी खेळी केली.
भारतीय संघाचं तिने टेन्शन वाढवलं होतं. पण दीप्तीच्या गोलंदाजीवर तिने मोठा फटका खेळला अन् अमनजोत कौरनं तिसऱ्या प्रयत्नात कॅच पूर्ण करत भारतीय महिला संघाचा तिसऱ्या प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्याचा मार्ग मोकळा केला.