अभिमानास्पद! ग्रामीण कला नेली सातासमुद्रापार; वयाच्या ९६ व्या वर्षी भीमव्वा यांना पद्मश्री पुरस्कार
Updated:May 29, 2025 16:24 IST2025-05-29T16:17:55+5:302025-05-29T16:24:52+5:30
Bheemavva Doddabalappa Shillekyathar : कर्नाटकच्या भीमव्वा डोड्डबालप्पा शिल्लेक्याथर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

कला माणसाला जिवंत ठेवते, जगायला शिकवते असं म्हणतात. अशाच एका कलेचा आता गौरव करण्यात आला आहे. कर्नाटकच्या भीमव्वा डोड्डबालप्पा शिल्लेक्याथर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
भारतातील कला विश्वासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ९६ वर्षीय भीमव्वा यांनी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्या एक लोकप्रिय ज्येष्ठ कलाकार आहेत.
तोगलू गोम्बायटा ही एक कर्नाटकातील पारंपारिक कठपुतली कला आहे. या कलेत निपुण असलेल्या भीमव्वा यांनी ७० हून अधिक वर्षे तोगलू गोम्बायटाच्या माध्यमातून रामायण आणि महाभारत सारखी महाकाव्य सादर केली आहेत.
भीमव्वा यांनी वयाच्या १२ व्या वर्षी ही कला शिकली आणि लग्नानंतरही ती कला अधिक विकसित केली. त्यांनी परदेशातही ही कला सादर करत लोकांना अद्भूत आनंद दिला आहे.
अमेरिका, पॅरिस, इटली, स्वित्झर्लंड, हॉलंड, इराण, इराक, दुबईसह अनेक देशांमध्ये भारतातील ही ग्रामीण कला सादर करण्याचे श्रेय त्यांना जातं. आजही भीमव्वा तोगलू गोम्बायटा सादर करतात.
२०१४ मध्ये भीमव्वा डोड्डबालप्पा शिल्लेक्याथर यांना राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आता केंद्र सरकारने प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने गौरव केला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भीमव्वा यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या कलेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
कलेला वयाचं कोणतंही बंधन नसतं. आपली संस्कृती, परंपरा आणि कला जोपासण्यासाठी आवड, जिद्द आणि मेहनत अत्यंत महत्त्वाची असते हे भीमव्वा डोड्डबालप्पा शिल्लेक्याथर यांनी सिद्ध केलं आहे.