Join us   

पावसाळ्यात नवीन झाडं लावताय? 10 टिप्स, झाडं वाढतील जोमात-कुंडीत सडणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 4:09 PM

1 / 10
१. झाडं लावण्याचा उत्तम हंगाम म्हणजे पावसाळा. या दिवसांत जर तुमच्या अंगणात नविन रोपटी आणून लावण्याचा विचार असेल तर त्याआधी काही गोष्टींची काळजी घ्या. झाडं लावणं हे काही खूप कठीण काम नाही. पण त्याचं थोडंसं तंत्र माहिती झालं तर मात्र झाडांची वाढ आणखी जोमात होते हे नक्की.
2 / 10
२. नविन रोपटी आणून लावण्यासोबतच पावसाळ्यात केलं जाणारं आणखी एक मोठं काम म्हणजे रिपॉटिंग. रिपॉटिंग म्हणजे एका कुंडीतलं रोपटं दुसऱ्या कुंडीत लावणं. नविन रोप लावणं आणि जुन्याच झाडाचं रिपॉटिंग करणं, या दोन्ही गोष्टी करताना या काही टिप्स लक्षात ठेवा.
3 / 10
३. ज्या झाडाचं रिपॉटिंग करायचं असेल त्या झाडाला ४ ते ५ तास आधी व्यवस्थित पाणी देऊन ठेवा. जेणेकरून झाड कुंडीतून बाहेर काढण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. रोपट्याला कधीही मुळाजवळ किंवा खोडाजवळ धरून ओढू नका. एखाद्या खुरप्याने आधी कुंडीच्या काठाजवळची माती उकरून थोडी भुसभुशीत करा. त्यानंतर कुंडी थोडी थोडी करून जमिनीवर सर्व बाजूंनी हळूच आपटा. माती मोकळी होईल आणि झाड मातीसकट बाहेर काढणं सोपं जाईल.
4 / 10
४. कुंडीतलं रोपटं मातीसकट बाहेर निघणं कधीही चांगलं. कारण यामुळे मुळं डिस्टर्ब होत नाहीत. तुटत नाहीत. त्यामुळे मग नव्या कुंडीतही अगदी चटकन झाड बहरतं.
5 / 10
५. मुळासकट आणि मातीसकट जेव्हा झाड बाहेर काढता, तेव्हा मुळाजवळची माती हलक्या हाताने बाजूला करा. मुळांवर बुरशी आलेली नाही ना किंवा एखादा रोग पडलेला नाही ना, हे एकदा तपासून घ्या.
6 / 10
६. यानंतर ज्या कुंडीत हे रोपटं पुन्हा नव्याने लावणार असाल त्या कुंडीची थोडी तयारी करा. नवी कुंडी ही जुन्या कुंडीपेक्षा आकाराने मोठीच असावी. नव्या कुंडीच्या तळभागाला छिद्रे आहेत की नाही हे बघून घ्या. या छिद्रांवर खापराचे तुकडे टाका. त्यानंतर त्यावर नारळाच्या शेंड्या, काही लहान- मोठी दगडं टाका आणि त्यानंतर त्यावर कंपोस्ट, माती, वाळू यांचं मिश्रण झाडांच्या गरजेनुसार टाकावं.
7 / 10
७. त्यानंतर आपण जे रोपट रिपॉटिंग करणार आहोत, ते त्या कुंडीत अलगद घाला. आजुबाजूने पुन्हा माती टाका. माती कुंडीच्या काठेकाठ भरू नये. १- २ इंच जागा रिकामी ठेवावी.
8 / 10
८. कुंडीत कधीही खूप दाबून दाबून माती भरू नका. माती भरल्यानंतर २- ३ दिवसांनी आपोआप माती आणखी खाली बसते. त्यानंतर गरज बघून पुन्हा माती टाका.
9 / 10
९. रिपॉटिंग करण्याचे काम कधीही खूप उन्हात करू नये. सकाळी १० च्या आधी किंवा सायंकाळी ५ नंतर कधीही रिपॉटिंग केले तर उत्तम.
10 / 10
१०. झाडांना फुलांचा बहर आलेला असताना रिपॉटिंग करू नये. बहर ओसरल्यानंतर रिपॉटिंग करा.
टॅग्स : मानसून स्पेशलगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सपाणी