Join us

त्वचा कोरडी पडणार नाही, चेहऱ्यावरून लोकांची नजर हटणार नाही! वाचा खास मेकअप टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 15:42 IST

1 / 8
मेकअप साठी चांगल्या ब्रँडचे प्रॉडक्ट वापरूनही त्वचा कोरडी पडत असेल किंवा ओढल्यासारखी वाटत असेल तर त्यासाठी पुढे दिलेल्या बेसिक टिप्स वापरा. जेणेकरून मेक अप जास्त वेळ टिकेल, शोभून दिसेल आणि लोकांची नजर तुमच्यावर खिळूनही राहील. चला पाहूया त्या टिप्स!
2 / 8
अनेक गोष्टी आपण पाहतो आणि विसरून जातो. बर्फाचा मसाज हा त्यापैकीच एक! तयार होण्याच्या गडबडीत आपण थेट प्रोडक्ट लावायला घेतो. पण तसे न करता चेहरा स्वच्छ धुवून घेतला की बर्फाचे एक दोन क्यूब स्वच्छ रुमालात बांधून चेहऱ्यावर गोलाकार फिरवा. पाच ते सात मिनिटे हा मसाज केल्याने चेहऱ्याला तजेला मिळतो आणि थोड्या वेळाने मॉइश्चरायजर लावल्याने पुढचा मेक अप छान बसतो. अगदीच थंड वातावरण असेल तर बर्फाचा मसाज न करता वाफ घ्या!
3 / 8
जर तुमच्याकडे मसाज करण्यासाठीही वेळ नसेल तर कपडे, दागिने, मेक अपचे सामान यांची जुळवाजुळव करेपर्यंत एका मोठ्या बाउलमध्ये फ्रिजमधले गार पाणी घ्या किंवा साध्या पाण्यात बर्फाचे ४-५ क्यूब टाका, पाणी गार झाले की त्यात चेहेरा बुडवून ठेवा. २-४ सेकंद चेहरा गार पाण्यात बुडवल्याने चेहऱ्याला उजळपणा येतो आणि पुढचा मेक अप सोपा जातो.
4 / 8
व्हिटॅमिन ई आणि खोबरेल तेलाचा वापर चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. मेक अप करण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला की थेंबभर खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधला गर एकत्र मिसळून चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घेतला, तर चेहरा कोरडी पडण्याचा मुख्य प्रश्न मिटेल आणि थोड्या वेळाने चेहऱ्यावर लावलेला मेक अप छान बसेल आणि दिवसभर टिकेल. हे मिश्रण तुमचे नैसर्गिक मॉइश्चरायजरचे काम करेल.
5 / 8
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एलोवेरा जेल आणि ग्लिसरीन देखील वापरू शकता. दोन्ही गोष्टी चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. तुमच्या मेक अप किटमध्ये कोरफड जेल असायलाच हवी. ही जेल सर्व प्रकारच्या त्वचेला उपयुक्त ठरते आणि मेकअप साठी योग्य बेस तयार करते. त्या जेलमध्ये १ चमचा ग्लिसरीन घातल्याने त्वचा मऊ होते. त्यामुळे मेक अप छान बसतो.
6 / 8
बाजारात अनेक प्रायमर उपलब्ध आहेत. चेहऱ्यावर मेणचट थर तयार करण्याचे काम प्रायमर करते. मात्र वर दिल्यानुसार तुम्ही प्राथमिक तयारी केली तर तुम्हाला प्रायमर लावावे लागणार नाही. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपल्या स्किन टोन पेक्षा एक स्किन टोन जास्त असलेले फाउंडेशनच निवडा. चेहऱ्याला छान लकाकी येईल आणि मेक अप नॅचरल दिसेल.
7 / 8
लीप बामने ओठावर मसाज केल्यानंतरच लिपस्टिक लावा. कोणत्या समारंभात जायचे आहे आणि कधी जायचे आहे यावर लिपस्टिक, आय शॅडो, लायनरची शेड निवडा. रात्री डार्क मेक अप चांगला दिसेल मात्र तोच सकाळी केला तर उग्र वाटेल. दिवसाच्या उजेडात नैसर्गिक मेक अप खुलून दिसेल. न्यूड लिपस्टिकही छान दिसेल. लोक तुमचा चेहरा निरखत राहतील आणि दिवसभर चेहरा टवटवीत राहील.
8 / 8
कोणतेही प्रॉडक्ट चेहऱ्यावर वापरण्याआधी आठवणीने हाताच्या पृष्ठभागावर लावून बघा. चोवीस तासात हाताच्या त्वचेवर काहीच त्रास झाला नाही तरच ते प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावा. कारण चेहऱ्याची त्वचा आपल्या शरीराच्या त्वचेच्या मानाने नाजूक असते. म्हणून चेहऱ्यावर कोणतेही प्रयोग थेट करू नये.
टॅग्स : ब्यूटी टिप्समेकअप टिप्स