Hair Care for Holi: रंग खेळताना केसांची वाट लागली तर? टेंशन सोडा, फक्त 6 गोष्टी करा; केस मस्त, एन्जॉय रंग!
Updated:March 17, 2022 15:19 IST2022-03-17T15:12:33+5:302022-03-17T15:19:47+5:30

आया होली का त्योहार.... असं म्हणत आता काही तासांतच मुक्त हस्ते रंगांची उधळण सुरू होईल... वर्षातून एकदा येणारा हा सण. त्यामुळे त्या दिवशी भरभरून रंग खेळून घेण्याची हौस अनेक जणांना असतेच.. पण मग केसांचं काय होणार याची काळजीही वाटतेच ना...
हल्ली तर केसांच्या तक्रारी एवढ्या वाढल्या आहेत की त्यात केसांची हेळसांड अजिबातच नकोशी वाटते... रंगामुळे केस आणखीनच गळतील का, केसांचा कोरडेपणा वाढेल का, ही चिंता सारखी सतावते.
रंगांमध्ये केमिकल्सचा भरपूर मारा केलेला असतो. त्यामुळे त्यांचा अतिरेक नक्कीच केसांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे रंग खेळण्याआधी केसांची थोडी काळजी घेतलेली कधीही चांगली.
रंग खेळण्याआधी केसांना भरपूर तेल लावा. तेल लावल्याने रंग किंवा रंगाचे पाणी थेट आपल्या स्काल्पला चिटकत नाही. तेलाचं आवरण स्काल्पला रंगाच्या माऱ्यापासून सुरक्षित ठेवतं.. तेल लावल्यानंतर केसांचा गुंता काढा आणि त्यानंतरच ते बांधा.
केस मोकळे सोडून रंग खेळण्याची सध्या चांगलीच क्रेझ आहे. पण केसांच्या दृष्टीने ते खूपच हानिकारक आहे. मोकळ्या केसांत रंग अडकून गुंता होण्याची शक्यता खूप जास्त आहे..
उंच बांधलेला बन रंग खेळण्यासाठी एक चांगली हेअरस्टाईल होऊ शकतो. पण हा बन खूप घट्ट बांधलेला नको. बन घातल्याने सगळ्या केसांना रंग लागत नाही.
साधी, सरळ वेणी ही देखील एक चांगली हेअरस्टाईल ठरू शकते. यामुळे केस बांधलेले राहतात आणि जास्त गुंता होत नाही.
केसांवर खूप रंग पडला आहे, असं जाणवलंच तर साधं पाणी घेऊन डोक्यावर ओता. जेणेकरून रंग चटकन निघून जाईल आणि डोक्याच्या त्वचेला रंगांमुळे इजा होणार नाही.
रंगाने माखलेलं डोकं आणि कडक ऊन असं कॉम्बिनेशन केसांसाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे रंग लागलेला असताना कडक ऊन टाळा.