parents first see how they behave themselves and then expect from their children | मुलांनी कसं वागावं हे ठरवण्याआधी आई बाबा आधी स्वत: कसे वागतात हे बघणार का?

मुलांनी कसं वागावं हे ठरवण्याआधी आई बाबा आधी स्वत: कसे वागतात हे बघणार का?


- डॉ. श्रुती पानसे

एका क्षणी खळ्खळ हसणारी लहान मुलं कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी अचानक निराश होतात. रागावतात, क्षणात संतापतात. तर त्या पुढच्याच क्षणी प्रेमानं मिठी मारतात. त्यांच्या मेंदूत भावनांचे हे हेलकावे सतत चालू असतात. त्यावर नियंत्रण आणणं त्यांना जमत नाही. किंवा असं म्हणावं लागेल की, आपल्या भावनांवर नियंत्रण आणायचं असतं हे त्यांना माहीतच नसतं.
मुलं हळूहळू हे शिकतात. मुलं सूर्यफुलांसारखी असतात. सूर्यफूल जसं सूर्याकडे बघत आपली दिशा बदलतं. तसंच लहान मुलं आईबाबांकडे बघून वाढत असतात. मोठय़ा माणसांकडे बघून बघूनच आणि मेंदूचा विकास जसाजसा होत जातो, तसं मुलांच्या भावनांवर नियंत्रण येतं. ती मोठं झाल्याची, समजूतदार  झाल्याची, एक खूण म्हणावी लागेल. असं गृहीत धरू की, मोठय़ा माणसांना माहीत असतं की योग्य प्रकारे कसं वागायचं, आपल्या भावना कुठे आणि कशा व्यक्त करायच्या. चीड, राग, संताप या भावना समाजात वेडय़ावाकडय़ा पद्धतीनं व्यक्त करायच्या नसतात. कारण या भावना प्रदर्शित करणं हा त्या प्रश्नावरचा उपाय नसतो. याउलट शांतपणो  प्रश्न सोडवायचे    असतात. डोकं जागेवर ठेवून प्रश्न सोडवले तर ते चांगले सुटतात. नाहीतर जटिल होऊन बसतात. 
मोठे होत जाणारे प्रश्न
मुलं आमचं ऐकत नाहीत. आदळआपट करतात, उद्धटपणा करतात. ‘बाबांशी पटत नाही’. ‘आईशी जमत नाही’. घराबाहेर कोणाशी जमत नाही. असे प्रश्न  मुलं जशी मोठी होतात तसे निर्माण होतात. मुलांना वाढवणं म्हणजे फक्त मजा आणि आनंद नसतो. काही वेळा त्यात खूप ताण असतो. मुलं आपल्या  मनासारखी वागत नाहीत, बोलत नाहीत, अभ्यास करत नाहीत, खूप चुकीचं वागतात, समाजबाह्य वर्तन करतात. उदाहरणार्थ,  खोटं बोलणं, दुस -यांना मारणं, ढकलणं, दुस -यांची वस्तू चोरणं, शिक्षकांना उलट बोलणं, वडिलधा -यांशी- आईबाबांशी उलट उत्तरं देणं, असं झालं तर दु:ख होणारच. हे साहजिकच आहे. असे सर्व प्रश्न आले तर आधी आपण दु:खात बुडून जातो. मुलांवर चिडचिड करतो. त्यांचा अपमान करतो. स्वत:ला त्रास करून घेतो आणि त्यांना त्रास देतो. यामुळे प्रश्न कमी होत नाहीत  तर वाढतात.  हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे. एकदा हे लक्षात आलं की, असे प्रश्न पुढे जाऊन निर्माण होणारच नाहीत. असे प्रश्न मोठेपणी उद्भवतात. त्यांची मुळं लहानपणी घरात कसं वातावरण होतं, यात बहुतांशी सापडतात. 
आईबाबा आनंदी असतील तर.
मुलांच्या दृष्टीनं आईबाबांच्या चेह-यावरचे प्रसन्न भाव  अतिशय महत्त्वाचे असतात. ते पाहून मुलांना आधार वाटतो, सुरक्षितता वाटते. चेह-यावर प्रसन्न भाव असतील तर चेहरा स्थिर आणि आनंदी दिसतो. प्रसन्न चेह-यानं कामं करणारी माणसं नेहमीच सकारात्मक असतात. यातून विश्वास निर्माण होतो. सतत आनंदी असणा-या मुलांशी समपातळीवरचं छान नातं तयार होतं. आपण जेव्हा मनापासून प्रसन्न असतो. आपण आनंदी आणि समाधानी असणं हे इतरांवर नाही तर स्वत:वरच अवलंबून असतं. एखादी गोष्ट खूप भावली तर मोकळेपणानं कौतुक करायला हवं. अर्थात हे तितकं सोपंपण नाही.  
अवघड प्रसंगी वागताना
जेव्हा खरोखरंच कसोटीचे प्रसंग असतात, दु:खाचे  प्रसंग असतात तेव्हा काय करायचं? वेळेशी लढाई करताना मनाविरुद्ध आपली चिडचिड होते. अशावेळी नक्की करायचं तरी काय?
 आपण आनंदी आहोत, मजेत आहोत, असं खोटं खोटं दाखवायचं का? तर नक्कीच नाही ! अगदी राग, निराशा, हताशा, अगतिकता, चीड यामुळे अगदी डोळ्यातून पाणी वाहत असेल तर मोकळे व्हायला हवं. मोकळं झालो तरच स्थिरता निर्माण  होईल. दु:ख पचवणं म्हणतात याला. दु:ख आहे, याचा स्वीकार करायचा म्हणजे हळूहळू शांतता निर्माण होईल. तसंच, जेव्हा नैराश्य येईल किंवा राग येईल तेव्हा तो दडपण्यापेक्षा योग्य मार्गानं राग बाहेर काढा. राग योग्य मार्गानं व्यक्त करणं अनेकांना अशक्य वाटतं. पण हे सरावानं जमतं. या सगळ्या गोष्टी आपल्या ठरवण्यावर अवलंबून आहेत. आपण ठरवलं तर संयमानं राग व्यक्त करू शकतो. यामुळे राग आलाच तर तो व्यक्त करण्याची योग्य पद्धत कोणती हे मुलांना सांगण्याची यापेक्षा जास्त चांगली पद्धत कोणती असू शकते? 
नकारात्मक भावना दाबून ठेवल्या नाही तर..
सर्व नकारात्मक भावना मनात वेगवेगळ्या प्रसंगांनी निर्माण होतात. होतच राहणार आहेत. आपल्या आणि मुलांच्या मनातही निर्माण होणार आहेत. त्या  भावनांचं समायोजन कसं करायचं हे आपल्याला कळलं तर आपण तसं वागू शकतो. आपल्याला जमलं तर ते स्वत:च्या प्रकृतीसाठी आणि मुलांच्या भावनिक संगोपनासाठी फार योग्य ठरतं. मुलांना सुशिक्षित आणि श्रीमंत  पालकांपेक्षा हसरे, आनंदी, त्यांच्या सोबत खेळणारे, मजा करणारे, समाधानी, सर्र्वावर प्रेम करणारे पालक हवे असतात. एवढं मिळालं की मुलं कुठेही खूश राहतात.आपल्या मनात निर्माण होणा-या सर्व भावना या कॉर्टिसॉलसारख्या नकारात्मक रसायनांमुळे निर्माण होत असतात. या कॉर्टिसॉलचा प्रभाव कमी करेल अशी सेरोटोनिन, ऑक्सिटॉसीनसारखी रसायनं ही मेंदूत तयार होत असतात. त्यांचा प्रभाव वाढवणं सरावानं जमू शकतं. कारण जर नकारात्मक भावना अवास्तव पद्धतीनं आणि जास्त काळासाठी दाबून- दडपून ठेवल्या तर त्याचा संपूर्ण मानसिक स्वास्थ्यावर परिणाम तर होतोच, याशिवाय शरीरावर आणि तब्येतीवर वाईट परिणाम होतो तो वेगळाच. म्हणून मनात कोणतीही भावना आली तर त्या भावनेला  पूर्णपणो न्याय द्यायला हवा. ती भावना टाळली नाही, तर आधी स्वीकारली पाहिजे, झेलली पाहिजे. 
कितीही मोठा प्रश्न असला तरी तो सोडवता येतो, हा विश्वास आपल्या मनात निर्माण व्हायला हवा.  तरच आपल्याला कृतीत उतरवता येईल. आपण कृतीत उतरवलेला मुलांनी पाहिला तरच भावी आयुष्यात  त्यांनाही भावनांचं समायोजन करता येईल.

(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)

ishruti2@gmail.com

 

 

Web Title: parents first see how they behave themselves and then expect from their children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.