Join us  

आईवर प्रेम आहे पण तुम्ही तिला ‘गृहित’ धरता? तिच्या मनाचा विचारच करत नाही.. असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2022 4:47 PM

Mother's Day 2022 make your mother feel special : आई म्हणजे सतत वात्सल्यमूर्ती असं कसं असेल, तिला राग येणं- दु:ख होणं साहजिक नाही का?

ठळक मुद्देआईवर प्रेम खूप असतंच, तिचा आदरही करायला शिका. तिला गृहित धरू नका.

मदर्स डे म्हणजे आईला विश करायचं, तिला काही तरी गिफ्ट द्यायचं आणि सोशल मीडियावर आईची महती गाणारे मेसेजेस दणादण फॉरवर्ड करायचे. या दिवशी काही विशिष्ट कवितांमधल्या विशिष्ट ओळींना सुगीचे दिवस येतात. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” पासून ते “आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर” पर्यंत सगळे मेसेजेस वेगवेगळ्या इमेजेसवर डिझाईन होऊन आपल्यापर्यंत येत असतात. त्यातही त्या इमेजमधली आई ही आवर्जून ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई’ दिसेल याची काळजी घेतलेली असते. जणू काही आईच्या मनात प्रेम आणि वात्सल्य सोडून कुठली तिसरी भावना येतच नसावी. येऊ नयेच. सगळं जग आईचा उदोउदो करतं. आणि मग आया हळूच त्या ट्रॅपमध्ये अडकतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी असते का? खरं म्हणजे असू शकते का? कुठल्याही व्यक्तीला इतर कुठलीच भावना मनात येणार नाही असं होऊ शकतं का? आपण मुलं म्हणून तरी आपल्या आईचा एक माणूस म्हणून विचार करतो का? (Mother's Day 2022 )

आई ही किती झालं तरी माणूस असते. आणि माणूस म्हंटलं की राग, लोभ, द्वेष, इर्ष्या, कंटाळा, मत्सर, तिरस्कार, मोह या सगळ्या भावना आल्याच. पण आईपणाच्या चौकटीत अडकलेल्या बायकांना या इतर भावना सहज व्यक्त करण्याचीही चोरी होऊन बसते. सतत मुलांच्या मागेपुढे नाचायचा कंटाळा येतो असं म्हणायची सोय उरत नाही. मुलं लहान असतांना कितीही लाडाची असली तरी कोणीतरी त्यांच्याकडे जरा वेळ बघावं आणि आपल्याला स्वतःसाठी जरा तरी वेळ मिळावा असं तिलाही वाटतं. पण असं नुसतं बोलून दाखवलं तरी तिच्यावर ‘वाईट आई’ असल्याचा शिक्का बसतो. टीनएजर मुलं कोणाचंच ऐकत नाहीत, त्यात आईचंही ऐकत नाहीत. मुलांचं लग्न होतांना तर आईची अजूनच चमत्कारिक परिस्थिती होते. तिला मुलगा असो नाही तर मुलगी, त्यांच्या संसारात मध्ये बोललं तरी पंचाईत होते आणि काही वेळा दिसत असतं की हे नवीन नवरा बायको किरकोळ कारणांवरून भांडतायत. यांना समजावून सांगितलं तर त्यांचा संसार मार्गी लागेल. अश्या वेळी मध्ये बोललं नाही तरी गडबड होते.थोडक्यात काय, तर अगदी तान्ह्या नुक्त्या जन्माला आलेल्या बाळापासून ते स्वतः आई / बाप होऊ घातलेल्या मुलांपर्यंत मुलांचं वय काहीही असलं, तरी आईवर आईपणाचा ताण असतोच. त्याचं स्वरूप फक्त बदलत राहतं. अशा वेळी निदान घरातल्या आणि जवळच्या लोकांनी तिला समजून घेतलं तरी तिला खूप दिलासा मिळतो. तीही माणूस आहे. तीही चुकू शकते. तिलाही कंटाळा येऊ शकतो. तिच्या स्वतःच्या आयुष्यात आणि शरीरातही या प्रत्येक टप्प्यावर बदल होत असतात. त्यांचा परिणाम अपरिहार्यपणे तिच्यावर होत असतो. इतकी साधी गोष्ट जरी घरातल्या माणसांनी समजून घेतली तरी तिच्यासाठी तिचं आईपण अधिक आनंददायक होतं. 

आईपणातून आनंद मिळावा यासाठी जवळची माणसं काय करू शकतात?

१. अगदी लहान मुलं असतील, तर दिवसातून किंवा आठवड्यातून काही काळ त्यांची पूर्ण जबाबदारी घ्या. त्या वेळात बाळाच्या आईला स्वतःसाठी जे करावंसं वाटेल ते करायला वेळ उपलब्ध करून द्या.२. शाळेत जाणाऱ्या मुलांसमोर त्यांच्या आईची उणीदुणी काढू नका.३. टीनएज मधील मुलांचं वागणं चुकत असेल तर त्यासाठी आईला दोष देण्याऐवजी तिला ती परिस्थिती हाताळायला मदत करा.४. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचे कुठलेही निर्णय चुकले तरी त्यामुळे ती ‘वाईट आई’ ठरत नाही हे लक्षात ठेवा. आणि तुमचा तिच्यावर विश्वास आहे असा तिला दिलासा द्या.५. आईवर प्रेम खूप असतंच, तिचा आदरही करायला शिका. तिला गृहित धरू नका.

टॅग्स :मदर्स डेपालकत्व