Join us  

मुलं खातच नाहीत, मोबइल दाखवत जेवू घालता? या 6 चुका कराल तर आयुष्यभर पस्तावाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 12:18 PM

मुलांना खायला घालणं हा हल्ली पालकांसाठी एक टास्त असतो. मग समोर ठेवला जातो आणि मूल नकळत तोंडात जात असलेला पदार्थ संपवते. पण ही पद्धत योग्य नाही. मुलांना खायला घालताना अजिबात करु नयेत अशा चुकांविषयी...

ठळक मुद्देमुलांना खायला घालणे हा पालकांसाठी मुख्यत: आईसाठी एक टास्क असतोपण मुलांना सगळे व्यवस्थित खाण्याची गोडी निर्माण करायची असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी

लहान मुले घरात येणार म्हटल्यावर वातावरण आनंदाचे तर असतेच. मग त्याच्या बाललीला पाहत, त्याच्यासोबत खेळत आपले दिवस कसे जातात हे कळत नाही. हे मूल मांडीत किंवा एका जागेवर असते तोपर्यंत ठिक आहे. पण जेव्हा ते पालथे पडायला, रांगायला आणि मग चालायलसा लागते म्हणजेच मोठे होते तशा अनेक गोष्टी बदलत जातात. लहान मुलांना खायला घालणे हा पालकांसाठी मुख्यत: आईसाठी एक टास्क असतो. आता मुलांना दात यायला लागलेले असतात. तेव्हा त्यांना काय खायला द्यायचे, त्यांना जेवणासाठी एका जागेवर कसे बसवायचे, ते नीट सगळे जेवण होईपर्यंत एका जागेवर बसतील यासाठी काय करायचे अशा एक ना अनेक गोष्टी यामध्ये येतात. आईचे कुंवा वरचे दूध सोडून मुले जेव्हा वरचे अन्न खायला लागतात तेव्हा पालकांनी काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. पालकांनी कोणत्या चुका आवर्जून टाळायला हव्यात. 

१. मुलांना पेस्ट स्वरुपातील खायला घालताना सुरुवातीला त्याची चव घेऊन बघा. आतापर्यंत त्यांनी दूध सोडून कोणत्याही पदार्थाची चव न घेतल्याने आणि पहिल्यांदाच वेगळे काही खाल्ल्याने ते सुरुवातीला अन्न जीभेने बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतात. मात्र पालकांना आपण केलेले अन्न मुलाला आवडलेले नाही असे आपल्याला वाटते. पण ते तसे नसते, त्यांना या पदार्थाची चवच माहित नसल्याने ते अशाप्रकारे अन्न बाहेर ढकलतात. 

२. अनेकदा मुलं तोंड वेडेवाकडे करतात, तेव्हाही आपल्याला असं वाटतं की त्यांना आवडत नाहीये किंवा त्यांना खायचं नाहीये. पण त्यांना ते आत गिळायचे असते हे अजून माहित नसल्याने ते असे करतात. पदार्थाची चव त्याची घनता त्यांच्यासाठी नवीन असल्याने ते असे करतात. 

( Image : Google)

३. बाळ खाताना तोंड, कपडे, फरशी, खुर्ची सगळे खराब करतात. मात्र आईला ते तसे नको असते. आई सतत बाळाचे तोंड, कपडे, फरशीवर सांडलेले साफ करायचा प्रयत्न करते. बाळाला मात्र त्या पदार्थाशी मनसोक्त खेळायचे असते. आपल्याला देत असलेले हे नवीन काय आहे असा प्रश्न त्याला पडलेला असतो त्यामुळे ते त्या गोष्टीशी फॅमिलियर व्हायचा प्रयत्न करत असते. पण आपण सतत साफसफाईच्या मागे लागून त्याला त्यापासून दूर करतो. सुरुवातीच्या टप्प्यात असे न करता बाळाला त्या पदार्थाशी कम्फर्ट तयार होईल असे करु द्या. सगळ्यात शेवटी तुम्ही बाळाला आणि आजुबाजूच्या गोष्टींना साफ करा.

४. बाळ रात्री आणि दिवसाही जास्त चांगले झोपावे किंवा त्याचे पोट व्यवस्थित भरावे यासाठी अनेक पालक बाळाला खूप लवकर वरचे अन्न द्यायला सुरू करतात. नुसत्या दुधाने बाळाचे पोट भरणार नाही असा त्यांचा समज असतो. बाळ रात्री जास्त वेळा उठते कारण त्याला भूक लागते असे आपल्याला वाटते. पण तसे नसून त्यांची झोपण्याची पद्धत बदलत असल्याने असेत होत असते. त्यामुळे त्यांना घनपदार्थ दिल्यावर ते शांत आणि नीट झोपतील असे वाटत असले तरीही ६ महिन्यानंतरच अशाप्रकारे पदार्थ द्यायला सुरुवात करायला हवी असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचेही म्हणणे आहे. 

( Image : Google)

५. पालक मुलांना खायला घालताना आणखी एक चूक करतात ती म्हणजे बाळाला वेगळे खायला घालणे. आधी बाळाचे पोट भरले की आपण शांतपणे जेऊ शकू असे त्यांना वाटते. मात्र प्रत्यक्षात तसे नसते. यामध्ये तुमचा तर वेळ जातोच पण बाळही नीट खात नाही. त्यापेक्षा तुम्ही जेवत असतानाच तुमच्या बाळाला सोबत जेवायला घेतल्यास ते सगळ्यांबरोबर जेवणे जास्त एन्जॉय करते. आपण जेवत असताना अन्न कसे खायला हवे. आपण ते कसे खातो या सगळ्या गोष्टी बाळ पाहते आणि त्यातून ते खायला शिकते. त्यामुळे त्याला वेगळे खायला देण्यापेक्षा तुमच्यासोबतच खायला द्या. 

६. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाचे पोट भरलेले ओळखायला शिका. बाळाचे पोट भरले तरीही तुम्ही त्याला आग्रहाने खायला घालत राहीलात तर बाळ त्यामुळे इरिटेट होते. बाळाने जास्त खावे आणि जाडजूड व्हावे असे प्रत्येकच आईला वाटत असते. पण त्याचे पोट भरले की ते खायला नाकारते आणि अन्नापासून दूर पळते, किंवा तोंडातून अन्न बाहेर काढते. पण बाळाचे पोट भरलेय हे तुम्ही वेळीच ओळखायला हवे.  

टॅग्स :पालकत्व