Join us

मुलीच्या चेहऱ्यावर पिंपल्स वाढले की आईने काय करावं? आईलाच जास्त टेंशन येत असेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2024 17:00 IST

वयात येणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर पिंपल का येतात हे समजून घ्यायला हवं.

ठळक मुद्देचेहेऱ्यावर येणाऱ्या पिंपल्स/ फोडांमुळे तन्वीने आणि तिच्या आईने इतकं वैतागण्याची खरंच गरज होती का?

वाढत्या वयात मुलींच्या चेहेऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचं टेन्शन आईलाच जास्त येतं. मुलीचा चेहरा पिंपल्सने भरु लागला की आईलाच कळत नाही की आता काय करायचं? त्यात लोक सल्ले देतात ते वेगळे.  तन्वीचंही तसंच झालं. तन्वीचे तिच्या आईला फारच कौतुक. पण तन्वी मोठी होऊ लागली आणि आईचं टेंशन वाढलं. तन्वीच्या आईला लहानपणी चेहेऱ्यावर खूप पिंपल्स होते. आता चेहेऱ्यावर फोड नसले तरी त्याचे खड्डे आणि व्रण चेहेऱ्यावर राहिलेच. त्यामुळे आजही तन्वीच्या आईची स्वत:वर चिडचिड होतेच. 

गेल्या काही महिन्यांपासून तन्वी सारखी तणतणत होती. तिच्या चेहेऱ्यावर खूप पिंपल्स येत होते. आपला चेहेरा पिंपल्सने भरला आहे असं तन्वीला कायम वाटायचं. त्यामुळे बाहेर पडण्याची, मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळण्याची तिला लाज वाटत होती. जे आपल्या बाबातीत झालं तेच आपल्या मुलीच्या बाबतीत होतंय हे बघून तन्वीच्या आईची चिडचिड होत होती. तिला वाटायचं की तन्वी चेहेऱ्याची नीट काळजी घेत नसल्यानेच तिच्या चेहेऱ्यावर पिंपल्स येताय. ' तू चांगली राहात नाहीस' हे वाक्य आईकडून तन्वीला खूपदा ऐकावं लागायचं. त्यामुळेही तन्वी जास्तच वैतागत होती. चेहेऱ्यावरचे पिंपल्स आणि आईची सततची टीका यामुळे तन्वीचं तिच्या अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं. एकीकडे आई पेपर-टीव्हीमधल्या जाहिराती वाचून-बघून जे जे क्रीम्स आणायची ते तन्वी न चुकता चेहेऱ्याला चोपडायची. पण फरक पडत नाहीये असं दिसल्यावर दोघींचीही चिडचिड आणखीनच वाढली.चेहेऱ्यावर येणाऱ्या पिंपल्स/ फोडांमुळे तन्वीने आणि तिच्या आईने इतकं वैतागण्याची खरंच गरज होती का?

(Image :google)

वयात येणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स का येतात? उपाय काय?डाॅ. वैशाली देशमुख (टीन एजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोग तज्ज्ञ) सांगतात..

१. संप्रेरकं म्हणजे हार्मोन्स वयात येताना शरीरामध्ये बदल घडवून आणतात. त्यांच्यामुळेच चेहेऱ्यावर फोड येतात.२. आपली त्वचा किंवा कातडी कोरडी पडू नये, मऊ राहावी म्हणून त्यामध्ये तेलाच्या ग्रंथी असतात, वयात येताना त्यांच्यामधून जरा जास्तच तेल पाझरायला लागतं. कधीकधी हे अती झालेलं तेल त्या ग्रंथीच्या नळ्यांमध्ये अडकतं आणि त्यांना ब्लाॅक करुन टाकतं. मग तिथे फोड येतात.३. आता यावर उपाय काय?४. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहेऱ्यावरचे फोड चांगले दिसत नाही म्हणून फोडायचे नाहीत. जाहिरातीत दाखवलेली जी ती मलमं चेहेऱ्यावर लावायची नाही. कारण यामुळे फोड जावून तिथे कायमचे व्रण किंवा डाग राहाण्याची शक्यता असते.

(Image : google)

५. चेहेऱ्यावर पिंपल्स आले म्हणून वैतागायचं नाही, चिडचिड करायची नाही, स्वत:ची लाज वाटून घ्यायची नाही. पिंपल्स आहेत म्हणून चेहेरा लपवून घरात बसण्याची तर अजिबात गरज नाही. 'माझ्याच चेहेऱ्यावर कशा इतक्या पिंपस?' म्हणत स्वत:ला दोष देण्याचीही गरज नाही. आपणच आपल्या चेहेऱ्यावरचे फोड पाहून स्वत:ला त्रास करुन घेतो. इतर कोणाचं तर आपल्या चेहेऱ्यावरील फोडांकडे लक्षही नसतं. जसा काळ पुढे जाईल तशी चेहेऱ्यावरील फोडांची तीव्रता कमी कमी होत जाईल. नंतर फोड येण्याचे थांबेलही. पण तोपर्यंत चेहेऱ्यावरील पिंपल्सवर मुलींनी आणि त्यांच्या आयांनी जरा संयम बाळगावा.६. चेहरा दिवसातून अनेक वेळा धुवावा. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा काबूत राहातो.७. छोटे फोड असतील तर ते आपोआप जातील आणि मोठे दुखरे फोड असतील तर मात्र डाॅक्टरांकडे अवश्य जायला हवं.

टीनएजर मुली, सेल्फ इमेज आणि चेहऱ्यावरचे पिंपल्स ते फिल्टर लावलेले फोटो, या प्रश्नांची उत्तरं सविस्तर वाचा..https://urjaa.online/i-dont-like-pimples-but-why-do-they-happen-with-me-only/