Our river is trying to tell us something. When will we hear her cry? | आपली नदी आपल्याला काहीतरी सांगू पाहतेय.तिच्या हाका आपण कधी ऐकणार?    
आपली नदी आपल्याला काहीतरी सांगू पाहतेय.तिच्या हाका आपण कधी ऐकणार?    


-माधवी वागेश्वरी

ब्रिंग बॅक द फॉरेस्ट्स 

  ब्रिंग बॅक द रेन्स

  लेट कावेरी फ्लो
हे तीन वाक्य तळतळून सांगणारी शॉर्ट फिल्म म्हणजे  ‘द स्टोरी ऑफ कावेरी’. ही अवघ्या तीन मिनिटांची प्रतीकात्मक अशी शॉर्ट फिल्म असून, ती अतिशय परिणामकारकरीत्या बनवली गेलेली आहे. के.एम. आय्यपा यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे. ननजम्मा चियप्पा यांनी यात कावेरी नदीची भूमिका केली आहे. विनोद ईशवर यांनी पटकथा लिहिली आहे. 
या फिल्मला 2018 च्या गोवा, मुंबई आणि चेन्नई येथे  झालेल्या अॅड फिल्म फेस्टिव्हलमध्ये जवळपास 15 पुरस्कार मिळाले होते. विशेष म्हणजे हा राष्ट्रीय स्तरावरील ड फिल्ममहोत्सव असतो. मानाचा नॅशनल जियोग्राफिक ग्रीन अवॉर्डही या फिल्मला मिळालं होतं. न्यू यॉर्क, अमेरिका येथे  अँड फिल्म फेस्टिव्हल होतो. 2018 च्या या महोत्सवात ‘द स्टोरी ऑफ कावेरी’ या फिल्मला दिग्दर्शनासाठीचा दुसरा क्रमांक मिळाला होता.
पुराणातल्या मिथक कथेतून या फिल्मचं कल्पनाविश्व तयार झालं आहे. दैत्यानं लुप्त केलेला पाऊस, मनुष्यानं शिवाची केलेली आराधना, त्यातून कावेरीचा झालेला जन्म. 
कावेरी नदी. नदी म्हणजे चैतन्य. नदीकाठीच तर माणसानं संस्कृती फुलवली. ज्या कावेरीनं धमण्यांमध्ये जीवनरस ओतला तिच्याच जिवावर आज तिची लेकरं उठली आहेत. पुराणातील त्या दैत्याचा जणू पुनर्जन्म झाला आहे.
खरं तर हे सगळं आपण वर्षानुवर्षे ऐकतोय, पाहतोय, वाचतोय आणि तरीही तेच तेच करतोय. जंगलं तोडतोय, वाळू उपसा करतोय, सगळ्या प्रकारचं आणि सगळ्या पद्धतीचं प्रदूषण करतोय. आपलीच शेपूट खात स्वत:ला रक्तबंबाळ करणा:या सापागत आपल्या सगळ्यांची अवस्था झाली आहे. ज्या गंगेचा अभिमान वाटतो तिचे काय हाल करतोय आपण? तिकडं नर्मदा नदीचंही तसंच. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत नर्मदा नदीच्या पाण्यावरून वाद आहे. आपली गोदावरी. तिच्यात सगळंच निर्माल्य स्वाहा करत सोवळ्या ओवळ्याच्या आणि पावित्र्याच्या गप्पा ठोकायला आपण मोकळे होतो. 
गोदावरी भारतातील सर्वात मोठय़ा नद्यांपैकी एक आहे. ती महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातून वाहते. या राज्यांमध्ये या नदीच्या पाणीवाटपावरून वाद सुरू आहे. आपल्याकडे नद्या तुंबलेल्या आहेत, त्यामध्ये घाण साठली आहे, जलपर्णी वाढली आहे. देशभर हीच परिस्थिती आहे. कृष्णा खो-या तील पाणीवाटपासंदर्भात महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्यात वाद आहेच. गेली 114 वर्षापासून कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून भांडण सुरू आहे. कावेरी नदीच्या पाण्यासंदर्भातील न्याय, समानता आणि सद्सद्विवेकबुद्धी यामध्ये राजकारणी आणि आपण सर्व नागरिक निशंकपणो  कमी पडत आहोत. कावेरी नदी पाणीवाटपाचा प्रश्न खूप जुना आहे. 1892 ते 1924 च्या दरम्यान ब्रिटिश मद्रास आणि तेव्हाचे म्हैसूर स्टेट यांच्यामध्ये काही करार झाले होते. त्या करारांनुसार  कावेरी पाणीवाटप होत होते आणि त्यावरूनच हा प्रश्न तापत चालला होता. पाणीवाटप लवादानं कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी यांच्या हिश्श्याचं पाणी ठरवून दिलं होतं. मात्र कर्नाटकनं पाणी सोडण्यास नकार दिल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले. एखाद्या नदीचा मोठा प्रवाह किंवा काही किलोमीटरचे क्षेत्र एखाद्या राज्यात आहे म्हणून त्या राज्याचा त्या नदीच्या पाण्यावर जास्त अधिकार आहे, हे न्यायालयानं अमान्य केलं आहे.
हे सगळे प्रश्न आणि माणसात तयार झालेला अतिरेकी संकुचितपणा ही शॉर्ट फिल्म अगदी नेमकेपणानं मांडते. डोळ्यात पाणी आणते.   ‘मी अजून किती काळ जगू शकते माझ्या बाळा तूच मला सांग’ असा प्रश्न कावेरी नदी लोकांना विचारते तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या शहरातली नदी उभी राहाते.
 नदी जिवंत राहायला हवी. त्यासाठी जंगलं जगवावी लागतील. झाडं लावावी लागतील. जंगल वाढलं तरच नदी वाहील हे सत्य आहे. धरणं आणि कालवे बांधून आपण पाणी निर्माण केल्याचा मिजास मिरवतो आहे. पण धरणं आणि कालवे हे पाणी साठवू शकतात. नवं  ताजं निर्मळ पाणी तयार करू शकत नाही. ही ताकद फक्त जंगलामध्येच असते.   ‘स्टोरी ऑफ कावेरी’ या फिल्ममध्ये पर्यावरण आणि पुराणातली गोष्ट हातात हात घालून येते. ही फिल्म  पाहाणा-याला अस्वस्थ करतअसली तरी शांतता आणि आशेचा संदेश ती देते.  
आपल्या मुलांना,  मुलांच्या मुलांना ताज्या, खळखळत्या पाण्याचा आनंद घेता यायला हवा. त्यासाठी जंगलावर वार करणं थांबवून जंगल वाचवण्याचे प्रयत्न सुरू व्हायला हवेत असं ही फिल्म सांगते. ‘अजून आपल्या हातातून वेळ गेलेली नाही.  या जंगलाच्या जोरावरच आपण आपल्या जिवंत नदीची, नदीतल्या खळखळत्या पाण्याची इच्छा पूर्ण करू शकतो.’ असा आशावाद ही फिल्म प्रेक्षकांमध्ये निर्माण करते. फिल्ममध्ये कन्नड भाषेत निवेदन ऐकू येत राहतं, फिल्मला इंग्रजी सबटायटल आहेत. पण समजत नसलेली ती कन्नड भाषादेखील इतकी या फिल्ममध्ये आर्तपणो बोलली गेली आहे. ती ऐकताना आत काहीतरी हलून जातं. आणि त्यावर कृष्णधवल प्रतिमा येत राहातात. या फिल्ममधली एक एक फ्रेम म्हणजे जणू पेंटिंग आहे. ही  फिल्म म्हणजे पडद्यावरची कावेरीवरची कविताच आहे. 
‘सगळं काही मलाच हवं’चा हव्यास आपल्याला कुठे घेऊन जाईल? कदाचित नामशेष होण्याकडेच घेऊन जाईल. निसर्गचक्र  अपरिहार्य असतं, त्याला कुठलीच नीती अनीती नसते, डायनोसॉर गेले म्हणून कोणी रडत बसलेलं नाही. सगळच जर मग असं आहे तर मग काय प्रदूषण करत सुटायचं? कृतज्ञ राहायचं की कृतघ्न व्हायचं याची निवड आपल्याला करायची आहे. कावेरीनं दिलेली हाक ऐकायची की कानात बोटं घालायचे हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे.

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)

madhavi.wageshwari@gmail.com

 

 

Web Title: Our river is trying to tell us something. When will we hear her cry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.