Nutritious food time table can solve the malnutrition problem. | कुपोषणाच्या समस्येवर पौष्टिक आहाराच्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीचा उपाय

कुपोषणाच्या समस्येवर पौष्टिक आहाराच्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीचा उपाय

रिहाना शेख, शामल  दाणे

स्थळ : सास्तूर, जि.उस्मानाबाद


उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर गाव़ जवळपास 12 हजारांची लोकवस्ती़ सिंचनाची सोय असल्याने ब-यापैकी सधनता. 1993च्या किल्लारी भूकंपाने हे गावही होत्याचं नव्हतं झालं.

कालांतराने गाव सावरलं खरं; पण वेगवेगळ्या प्रश्नांनी गांजतच गेलं. सधनता असली तरी गाव पारंपरिक वळणाचंच़ विशेषत: आरोग्याच्या बाबतीत़ महिला कुपोषित. कमी वयात मातृत्व पदरी आलेल्या.

काही महिन्यांपूर्वी अंगणवाडीत एक-दोन नव्हे, तर चार तीव्र कुपोषित बालकं  दाखल झाली़ मध्यम कुपोषितांचीही संख्या चांगलीच वाढू लागली होती़
अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांच्या कार्यपद्धतीबाबत ओरड होऊ लागली खरी; पण त्याचा बाऊ न करता या तायांनी आव्हान स्वीकारलं आणि अवघ्या महिनाभरातच मुलांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढलं. काही महिन्यांपूर्वी जिल्हाभरातील सर्वच अंगणवाड्यांतील बालकांची आरोग्य तपासणी झाली, तेव्हा सास्तूर येथील अंगणवाडी क्र. 8 मध्ये 64 पैकी 4 मुलं तीव्र कुपोषित तर दोन मध्यम कुपोषित आढळली. 

या अहवालामुळे अंगणवाडी सुपरवायझर एस.व्ही. दाणे, कार्यकर्ती रिहाना शेख यांच्यासोबतच पालकांनाही धक्का बसला. पण या सगळ्यांनी कामाला जुंपून घेतलं.

सर्वप्रथम मुलांच्या आयांना विश्वासात घेतलं गेलं. पहिल्या टप्प्यात ग्राम बालविकास केंद्र सुरू केलं. माकणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सुनील मंडले यांच्याकडून कुपोषित मुलांची तपासणी झाली. त्या मुलांच्या घरी गृहभेटी सुरू झाल्या.

कुपोषण का बळावतं, कुपोषणाच्या मुळाशी कोणती कारणं असतात,  औषधोपचारांची गरज असते का, आहार कोणत्या प्रकारचा आणि दिवसातून किती वेळा दिला पाहिजे - आदी प्रश्नांची उत्तरं त्यांच्यासमोर मांडली. येथून एका गतिशील मोहिमेची सुरुवात झाली. 

बालकांच्या आहाराचा सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा तक्ता निश्चित करण्यात आला. तब्बल महिनाभर अविरत हा दिनक्रम सुरू होता.
यानंतर मुलांची तपासणी केली असता, ती कुपोषणातून बाहेर आल्याचं स्पष्ट झालं. पालकांनी दिलेली साथ आणि कर्मचा-यानी घेतलेल्या अखंड परिश्र मातून अवघ्या एक महिन्यात सास्तूरची अंगणवाडी कुपोषणमुक्त झाली आह़े

------------------------------------------------------------

पौष्टिक आहाराचं वेळापत्रक

 * आयांबरोबर कुपोषित मुलं सकाळी   8 वाजता अंगणवाडीत 
 गोड खीर, कधी शेंगदाण्यांचे लाडू तर  कधी अन्य पौष्टिक खाद्य असा नास्ता
*  9 वाजेच्या सुमारास हलका आहार
 * 12 वाजता अन्य मुलांसोबतच अंगणवाडीतील पोषण आहार. 
 * 3 वाजता उकडलेली अंडी व केळी
* सायंकाळी 5 वाजता गहू, मुगाच्या  पिठाची लापशी


- बाबूराव चव्हाण
(उपसंपादक, लोकमत : उस्मानाबाद)

 

Web Title: Nutritious food time table can solve the malnutrition problem.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.