Nutrition can also be achieved by fasting. All you need is a fasting diet plan! | उपवास करूनही होऊ शकतं पोषण. फक्त त्यासाठी हवं उपवासातल्या आहाराचं  नियोजन!

उपवास करूनही होऊ शकतं पोषण. फक्त त्यासाठी हवं उपवासातल्या आहाराचं  नियोजन!

 शुभा प्रभू साटम


भारतभरात नवरात्र वेगवेळ्या प्रकारात साजरे होते,पण यात एक गोष्ट समान असते  ते म्हणजे उपवास. काही कडक उपास करतात, काही साधे तर काही मांसाहार वर्ज्य  करतात, काही कांदा लसूण खात नाहीत, कोणी एक  भुक्त ,कोणी फक्त फळं आहारात घेतात. कुणी तिखट-मीठही खात नाहीत.
श्रद्धा एक आणि शरीराला वेगळ्या आहाराची सवय व्हावी हे दुसरं कारण. आणि वजन कमी करावं हे पण एक कारण.स्वार्थ परमार्थ एकत्र साधलं जातं. 
पण होतं कसं की , उपवास काळात दुप्पट खाल्लं जातं,पिष्टमय ,तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ले जातात. बरेचदा उपासाचा ,अयोग्य आहाराचा अतिरेक होवून शरीराला योग्य पोषण मिळत नाही,माणूस थकलेला दिसतो.
एक लक्षात ठेवायचं की शरीराला विशिष्ट आहाराची सवय असते,तो एकदम बंद करून कडक धोरण स्वीकारलं तर शरीर यंत्रणा बुचकळ्यात पडते आणि साहजिकच ती बंड करते,मग थकवा,ग्लानी,चिडचिड, अंगदुखी, पित्त असं होवू लागतं. बरे उपवास अध्र्यात कसे सोडायचे? या भीतीनं लोक मग   ढकलत नेतात. 
पोषणाच्या दृष्टिकोनातून उपवासातल्या दिवसांच्या आहाराचं नीट नियोजन केलं तर हे सर्व टाळता येतं. 


उपवासाचं नियोजन कसं कराल?
 * उपवासाच्या दिवसात आपण कधी काय खाणार याचं नीट नियोजन हवं. आपला नेहमीचा आहार जीवनशैली,वजन,वय,कामाच्या वेळा हे लक्षात घेवून तसं ठरवायचं. वास्तव विचार करायचा.
* आपण भले पंचवीस वर्षापूर्वी फक्त फळावर राहत असू पण आता आपलं वय ,अन्य व्याधी ,हे बघायला हवं. आणि आहार तसा घ्यायला हवा.
* डी टॉक्स ही नवी संकल्पना उपवासमागे आता रु जू होतेय.
म्हणजे आहार पालटून शरीरातील खराब द्रव्यं,बाकी काही यांचा निचरा करून शरीर ताजं केलं जातं. शरीराचं ओव्हर ऑइलिंगचं असतं ते..  
*तुम्हाला जर न्याहारी,दोन जेवणं, मधलं खाणं, बाहेरचे चटक मटक अशी सवय असेल तर एकदम बंद करू नये. फक्त त्याचा पोर्शन अर्थात प्रमाण कमी करावं. 
* तेलकट ,तुपकट , पिठुळ पदार्थ न खाता वरी,भोपळा,काकडी,राजगिरा यांचं प्रमाण  वाढवावं.
* नारळ दूध ,ताजं दही,पपई,टरबूज, केळी,पेरू,चिकू अशी देशी आणि शक्यतो बारमाही मिळणारी फळं आहारात असावी
* काजू आणि बदाम याऐवजी सुके अंजीर,खजूर,मनुका(काळया मनुका) खाव्यात. बध्दकोष्ठता होत नाही
*साखरेऐवजी गूळ असावा.
* दिवसातून चार पाच वेळा तरी लिंबू मध घालून पाणी प्यावं.नारळ पाणी असल्यास उत्तम अथवा पातळ ताक किंचित सैंधव घालून घ्यावं.
* बटाटा ऐवजी रताळी आणि साबुदाणा ऐवजी राजगिरा , माखाने खावेत.
*एक दिवस मीठ मिरचीचे पदार्थ खाल्ले तर दुस:या दिवशी फक्त पातळ ताक काकडी फळं खावीत. 
*कडक उपास नसतील तर  मोडाची कडधान्यं,तृणधान्यं,पालेभाज्या अधिक खाव्यात.
*साखर,साबुदाणा कमी  वापरावा.तिखट पदार्थ करताना  त्यात आले+ जिरे जरूर  घालावे.
असे छोटे छोटे बदल केले तर हे नवरात्र तुम्हाला नक्कीच आरोग्य प्रदान   करेल
उदे ग अंबे ऊदे!

( लेखिका स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्यां आणि खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत. )

shubhaprabhusatam@gmail.com

 

 

Web Title: Nutrition can also be achieved by fasting. All you need is a fasting diet plan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.