A new trend on social media that gives confidence to wear sari freely | #sareeflow :साडी नेसून मुक्तपणे वावरण्याचा  आत्मविश्वास देणारा  समाजमाध्यमांवरचा एक नवा ट्रेण्ड

#sareeflow :साडी नेसून मुक्तपणे वावरण्याचा  आत्मविश्वास देणारा  समाजमाध्यमांवरचा एक नवा ट्रेण्ड

   - प्रतिनिधी
साडी नेसून मिरवायला अनेकींना आवडतं; पण साडी नेसून रोजची कामं करायला मात्र नकोसं वाटतं.  साडी नेसता येते; पण वागवता येत नाही, साडी आवडते, पण साडी नेसल्यानंतर आरामदायी वाटत नाही अशीही अनेकींची समस्या असते. त्यामुळे साडी सणावारापुरतीचं असंही अनेकींनी ठरवून टाकलेलं असतं. पण साडी घालून आपण काहीही करू शकतो हा विश्वास अनेकजणी देत आहेत. साडी घालून आपण रोजची कामं करू शकतो, धावू शकतो, उडय़ा मारू शकतो, वाद्य वाजवू शकतो, अवघडातले अवघड नृत्य प्रकारही करू शकतो. साडी घालून अवघडल्यासारखं वाटत नाही. उलट साडीनं आत्मविश्वास येतो हे सांगण्याचा प्रयत्न अनेकजणी करत आहेत.
कोण आहेत त्या?
 इश्ना कुट्टी, निलांजना घोष दस्तीदार, मोहिनी डे आणि ब-याच जणी.  #sareeflowवर आपल्याला त्या भेटतात. #sareeflow हा समाजमाध्यमांवर सध्या चर्चेत असलेला ट्रेण्ड आहे. या ट्रेण्डद्वारे साडीची एक चळवळच उभी राहिली आहे. हा ट्रेण्ड सुरू केला तो इस्ना कुट्टी या दिल्लीस्थित तरुणीनं. इश्ना ही हुल्ला हूप डान्सर आहे. तिनं काही दिवसांपूर्वी साडी घालून हुल्ला हूप नृत्य केलं आणि तो व्हिडिओ तिनं समाजमाध्यमांवर टाकला. तो व्हिडिओ टाकताच व्हायरल झाला. साडी घालून तुला हे कसं जमू शकतं इथपासून ते तुझा व्हिडिओ बघून आम्हालाही साडी घालून नाचावसं, धावावसं, उडय़ा माराव्याशा वाटत आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


  ‘साडी घालून आपण किती छान आणि कामूक दिसतो आहोत हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला नाही, तर साडी घालून किती मुक्तपणे, आनंदानं आणि आत्मविश्वासानं वावरता येतं हे मला दाखवायचं होतं. साडी घालणं म्हणजे नाजूक -साजूक दिसणं, हळूवार वावरणं नव्हे. उलट मी आईच्या कपाटातली तिची साडी घेतली. ती नेसली आणि हुल्ला हूप डान्स केला!’
इश्नानं सहावारी साडी नेसून, पायात स्निकर्स घालून हुल्ला हूपचं सादरीकरण केलं. ‘ससुराल गेंदा फूल’ या गाण्यावरचा व्हिडिओ टाकल्यानंतर तिनं  ‘चिन्नमा चिक्कमा’ या दक्षिण भारतीय गाण्यावर व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओनंतर ती म्हणते की दक्षिण भारतातल्या आज्या हा व्हिडिओ बघून माझ्यावर थोडय़ा चिडतील; पण मला काय सांगायचं आहे हे जर त्यांना समजलं तर त्यांना नक्कीच आनंद वाटेल. आईच्या कपाटात दक्षिण भारतीय साडय़ाच उरल्या आहेत. साडीचा प्रकार बघून मी म्युझिक ट्रॅक निवडते. पण इतर कोणत्याही म्युझिक ट्रॅकवर साडी घालून मी तितक्याच जोशात हुल्ला हूप करू शकते, असं इश्नाचं म्हणणं आहे. 
इश्नापाठोपाठ समाजमाध्यमांवर  #sareeflow वर निलांजना घोष दस्तीदार हिचा व्हिडिओ व्हायरल झाला. साडी घातलेल्या निलांजनानं   ‘बास गिटार’ वाजवण्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला. मनाची आणि बोटांची प्रचंड ऊर्जा लागणारं हे वाद्य वाजवून निलांजनानं साडी आणि आपली कला या दोन्हींसाठी वाहवा मिळवली आहे. साडी ही कोणतंही काम करण्यासाठी खूप सोईची, आरामदायी आणि मनाला आनंद देणारी असल्याचा संदेश निलांजनाही आपल्या या व्हिडिओमधून देते. 
इश्नाचा ‘ससुराल गेंदा फूल’ हा व्हिडिओ बघून महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही इश्नाचं कौतुक केलं. ‘इश्नाचा हा व्हिडिओ बघण्यास मला जरा उशीर झाला असला तरी हा व्हिडिओ बघून मला कमी आश्चर्य वाटलेलं नाही. #sareeflow चळवळ  नक्कीच खूप वाढेल ’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
साडी घालून वावरायचं कसं, हा प्रश्न पडत असेल तर   #sareeflow  हा ट्रेण्ड  नुसता पहायला काय हरकत आहे, कदाचित आपल्यालाही साडी घालून काही तरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल!

 

 

 


 

Web Title: A new trend on social media that gives confidence to wear sari freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.