Join us  

घरकाम - बाहेरचं काम- स-त-त काम, त्यातून बायकांना येणाऱ्या ‘मेंटल लोड’ला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 2:53 PM

घरोघरीच्या स्त्रिया बारा महिने-चोवीस तास स-त-त स्वयंपाकघराच्या ओट्याशी बांधलेल्या असतात हे नाकारता न येणारं सत्य आहे. पण निदान ते काम दिसतं तरी, जी कामं दिसतही नाही ती कामं घरात कशी होतात, त्यांचा भार नक्की कोण वाहतं?

ठळक मुद्दे‘सांगितलं असतंस तर केलं असतं.’ या फालतू आर्ग्युमेंटच्या मागे लपू नका.

गौरी पटवर्धन

‘द ग्रेट इंडियन किचन’ नावाच्या सिनेमाने सध्या सोशल मीडियावरचं जग ढवळून काढलं आहे. केरळमधल्या एका नवीन लग्न झालेल्या, नृत्यशिक्षिका होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण मुलीभोवती हा सिनेमा फिरतो. तिच्या सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी तिच्या घरी जावं लागतं, आणि मग या मुलीचं संपूर्ण आयुष्य फक्त स्वयंपाकघर या एकाच केंद्रबिंदूभोवती फिरायला लागतं. नाश्ता-दुपारचं जेवण-नवऱ्याचा डबा-रात्रीचं जेवण-भात चुलीवरचाच पाहिजे-चटणी पाट्यावरचीच पाहिजे-पूजेचा नैवेद्य-या सर्व काळात केव्हातरी अपरिहार्यपणे तिची पाळी येणं-तिला बाजूला बसवून तिच्या जागी शेजारी/आत्तेसासू अशी दुसरी बाई उभी राहणं-बेसिक टेबल मॅनर्स नसलेला नवरा आणि सासरा आणि या सगळ्याच्या सतत बरोबरीने ड्रेन पाईप लीक होणारं, कित्येक वेळा सांगूनही नवऱ्याने प्लम्बर बोलवून दुरुस्त न केलेलं किचनचं सिंक!हा सिनेमा अनेक जणींच्या मनाला भिडला तसाच अनेक जणांना तो टोचला. अर्थातच आवडणाऱ्यांमध्ये पुरुष आणि टोचणाऱ्यांमध्ये स्त्रियाही आहेत, पण अल्पमतात. पण आवडून किंवा चिडून, हा सिनेमा बघितलेल्या प्रत्येकाला त्यावर बोलावंसं वाटतं आहे कारण त्या सिनेमाने आपल्याला आरसा दाखवला आहे. आपल्या घरातली परिस्थिती सिनेमाच्या मोठ्या स्क्रीनवर सार्वजनिक करून मांडून दाखवली आहे आणि ते दृश्य समोर दिसल्यावर त्यातला पराकोटीचा अन्याय, विषमता आणि असमानता प्रेक्षकांच्या अंगावर येते आहे.घरोघरीच्या स्त्रिया बारा महिने-चोवीस तास स-त-त स्वयंपाकघराच्या ओट्याशी बांधलेल्या असतात हे नाकारता न येणारं सत्य आहे. पण निदान ते सत्य लोक मान्य करतात. त्याबद्दल सहानुभूती दाखवतात, त्याचं समर्थन करतात, त्याचं उदात्तीकरण करतात, त्यासाठी धर्म / परंपरा / संस्कृती यांच्या कुबड्या घेतात, पण निदान ‘असं होतंच नाही.’ असं बटबटीतपणे म्हणत नाहीत.

पण या सतत दिसत राहणाऱ्या कामाच्या पलीकडे अजून एक मोठा कामाचा ढिगारा असतो तो म्हणजे या रोजच्या घरकामाचा विचार सतत चोवीस तास मनात बाळगणे. कारण तो विचार सतत मनात नसेल तर कुठलंही घर सुरळीतपणे चालू शकत नाही. हे काम अदृश्य असतं, पण ते प्रत्येक बाईच्या मनातली इतकी प्रचंड जागा व्यापून राहतं, की कॉर्पोरेटमध्ये अगदी मोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या, क्लायंटसमोर प्रेझेंटेशन देणाऱ्या बाईच्या मनातसुद्धा ‘उद्या मुलांच्या डब्यासाठी छोले भिजवले ना?’ हा विचार मध्येच येऊन जातो. किंवा अगदी छोट्या दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करणाऱ्या बाईला समोरून पालेभाज्यांची हातगाडी गेली तर मध्येच उठून पटकन दोन जुड्या विकत घेऊन टाकायचा मोह होतो, कारण नंतर बाजारात तीच जुडी पाच-दहा रुपये महाग मिळते हे तिला अनुभवाने समजलेलं असतं.कामाच्या ठिकाणी असे घरातल्या कामांचे विचार करण्यावरून बायकांची अनेकदा चेष्टा केली जाते, त्यांच्या कुवतीबद्दल किंवा कामातल्या सिन्सिअरिटीबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात, या गोष्टीचा वापर कायमच बायकांच्या विरोधात केला जातो. पण तो करणारे पुरुष हे लक्षात घेत नाहीत, की ते त्यांच्या घरी यातला कुठलाच विचार करत नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या स्त्रिया त्यांच्या कामाच्या ठिकाणी याच आरोपांच्या बळी ठरतात.इतर वेळी असमानतेच्या मुद्द्यावर बोलतांना सरसकट स्त्रिया आणि पुरुष अशी मांडणी करणं कठीण असतं. कारण पितृसत्ताक पद्धतीच्या वाहक स्त्रिया असू शकतात आणि शोषित पुरुष असू शकतात. पण घरकाम यात मात्र जवळजवळ स्त्रिया आणि पुरुष इतकी स्वच्छ विभागणी दिसते. आणि ही विभागणी इतकी घट्ट आहे, की बहुतेक सगळ्या पुरुषांना हा लेख म्हणजे निव्वळ कांगावा वाटू शकतो. ‘एवढं काय काम असतं घरात?’ हा प्रश्न पिढ्यानुपिढ्या विचारणाऱ्या कोडग्या जमातीला हा मेंटल लोड नेमका कशाला येतो हे समजावं यासाठी घरातल्या कामांची शक्य तेवढी डीटेल्ड यादी दिलेली आहे. आईला-बायकोला-बहिणीला-मुलीला-मावशीला-आत्याला-वहिनीला-काकूला-मामीला-भाचीला-पुतणीला-आजीला-पणजीला-खापरपणजीला कोणीही सांगत नाही की ‘आता कणिक भिजव. आता भाजी चीर.’ तरीसुद्धा तुमच्या ताटात रोज दोन वेळा चारीठाव घरचं ताजं अन्न पडतं. कपडे धुतले जातात. भांडी घासली जातात. केर काढला जातो. भाजी आणली जाते. वाळवणं केली जातात. लोणची घातली जातात. नैवेद्य तयार होतात. हे सगळं घराचं रहाटगाडगं न थांबता, न अडखळता चालू रहावं यासाठी घरातली बाई सतत त्याचा विचार करत असते. 

स्वयंपाकघर चालवणं हे तर फारच कौशल्याचं काम आहे, पण निदान घर आवरणे किंवा कपडे या विभागाची तरी जबाबदारी घ्या. कपडे विभाग म्हणजे कपडे धुणे-वाळत घालणे-वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे-ते ज्याच्या त्याच्या कप्प्यात नीट लावून ठेवणे-कपड्यांना इस्त्री करणे किंवा कपडे मोजून इस्त्रीवाल्याला देणे-मोजून परत घेणे-त्याचा हिशोब ठेवणे-त्याचं बिलं लक्षात ठेऊन चुकतं करणे. घर आवरणे विभाग म्हणजे घर झाडणे-पुसणे-फर्निचर पुसणे-त्यावरचा पसारा आवरणे-आवरत राहणे-फर्निचर पुसणे-खिडक्या पुसणे-पडदे वेळच्यावेळी धुणे-पलंगावरच्या चादरी आणि उशांचे अभ्रे बदलणे-बेसिनजवळचा नॅपकिन रोज बदलणे-पांघरुणं नियमितपणे धुणे आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा त्यांना ऊन दाखवणे-ऊन दाखवलेली पांघरुणं, गाद्या, उश्या, चादरी परत जागेवर आणून ठेवणे-घरातल्या या वस्तू काय अवस्थेला आहेत त्याकडे लक्ष देणे-जुनाट दिसायला लागल्यावर नवीन विकत आणणे-केव्हाही पाहुणे आल्यास घालायला किमान एक जोड उत्तम अवस्थेत मेंटेन करणे-जुन्या चादरींची पायपुसणी किंवा झटकणी करणे-घरात कोणीही केव्हाही काहीही पुसायला ‘एक फडकं दे तर जरा’ असं म्हंटल्यावर लीलया एक फडकं काढून देणे...थांबा. दमून जाऊ नका. हे एकूण घर व्यवस्थापनातले दोन फुटकळ विभाग आहेत. अजून स्वयंपाकघर, लहान मुलांची काळजी, मुलांचा अभ्यास, वृद्ध व्यक्तींची काळजी हे खतरनाक विषय आपण सुरू देखील केलेले नाहीत. 

घरोघरचे पुरुषहो..

तुम्हाला जर ही घरकामं दिसत असतील, तर ती आपणहून करायला सुरुवात करा.  कामातून तिला बाहेर काढा. नुसतं काम करून भागत नाही. ते काम स्वतःची जबाबदारी म्हणून करा. तिने आठवण न करता करा. आणि इतक्या सातत्याने करा की तिच्या मनात त्या कामाचा विचारसुद्धा येण्याची गरज भासू नये.हे करतांना सुरुवातीला तुम्ही चुकाल, पण बायका समजून घेतील. तुमची शुद्ध भावना त्यांना समजेल. तुम्हाला काहीच दिवसात त्याचा कंटाळा येईल. पण मग स्वतःच्या मनाला सांगा, की ती कसं वर्षानुवर्षं हे करू शकते? मग मीही करू शकतो. हा रस्ता सोपा नसेल.आत्ताच्या व्यवस्थेचा फायदा तुम्हाला हजारो वर्षं मिळालेला आहे. तो सोडून देणं सोपं नाहीये. पुरुषसत्ताक संस्कृतीची घरातली केंद्र तुमच्या रस्त्यात अडथळे आणतील. पण तरीही ते करत रहा. कारण ती योग्य गोष्ट आहे. इट इज द राईट थिंग टू डू!अर्थात हे सगळं कोणासाठी? तर घरातल्या बायका सतत कामात असतात हे ज्यांना दिसतं त्यांच्यासाठी. तुम्हाला ते दिसतसुद्धा नसेल, तर वेळीच जागे व्हा, डोळे उघडा आणि आजूबाजूला बघा. जाणीव ठेवा. कृतज्ञ रहा… तेवढी तरी सुरुवात करा.

(लेखिका पत्रकार आहेत.)

टॅग्स :मानसिक आरोग्यमहिला