Join us  

बाई, तू सगळ्यांचं करतेस पण तुझी कुणाला कदर नाही, हे किती दिवस खरं मानायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2024 6:27 PM

स्वत:साठी जगलेच नाही तर दोष नक्की कुणाचा? बायका स्वत:साठी जगणं इतकं का दुय्यम मानतात?

ठळक मुद्देनव्या वर्षात स्वतःची एक चांगली मैत्रीण स्वतःच होऊ. रोज स्वतःला एक जादू की झप्पी देऊ. आरशात बघून तू मला जशी आहेस तशी खूप खूप आवडतेस.

स्मिता पाटील वळसंगकरएक छोटी मुलगी धावत येते. तिच्या ‘मां’ला ‘चल’ असं मानेनं सांगते. दोघी उत्साहानं धावत धावत निघतात. बाहेर एक ट्रक उभा. दोघी त्यात चढतायत. मां ट्रकचंस्टेअरिंग हातात घेते आणि मोकळेपणानं हसत ट्रक चालवायला सुरू करते. वाटेत भेटणाऱ्या लहान-मोठ्या बायांना सोबत घेऊन ट्रक धावतो. या मायलेकी एकमेकींची आणि मुख्य म्हणजे स्वतःची कंपनी खूप एन्जॉय करतात. त्या सगळ्यांच्या डोळ्यात नवी स्वप्नं दिसतात, आत्मविश्वास आणि खूप सारा आनंद दिसतो.

मन के मंजीरे आज खनकने लगे , भूले थे चलना, कदम थिरकने लगे, दिल ये गाने लगा है,मुझको आने लगा है, खुद पे ही ऐतबार ।मीता वसिष्ठने पडद्यावर साकारलेलं ते गाणं जितक्या वेळा बघते तितक्या वेळा आत काहीतरी हलत जातं आणि खूप भारी पण वाटतं. ते भारी वाटतं ते तुमच्या माझ्यासारख्या ‘ती’ने परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या आनंदाच्या क्षणांसाठी!

(Image : google)

वर्षे सरत जातात तसतशी आठवणींची गाठोडी जमा होत जातात. कधीकधी त्या गाठोड्यातून एकेक आठवण बाहेर येते. ‘तू सगळ्यांचं करते, पण तुझ्या हाताला यश नाही माई, तुझ्या प्रेमाची किंमत नाही बघ कुणाला’, दारावर येणाऱ्या ज्योतिषानं सांगितलेलं किंवा कुणी बोललेलं, स्वतःला वाटलेलं आठवून आठवून त्रास करून घेते. इतरांसाठी सगळं करताना बाई स्वतःसाठी जगायचं विसरूनच जाते.

आपला आवडता पदार्थ एकटीसाठी करून खाल्ला, दिवसभर जे आवडतं तेच मनसोक्त केलं, लांब कुठेतरी भटकून आले, मैत्रिणींशी घरच्या जबाबदाऱ्या सोडून गप्पा मारत बसले असं आठवतंय का अलीकडच्या काळात? मध्यंतरी महिलांचं एक शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये एक छोटीशी ॲक्टिविटी होती. स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आणि आपल्या समोरची जी महिला आहे तिच्या पाठीवर कौतुकांनं थाप मारायची. हे करताना मनात म्हणायचं, तू जे काही करतेस त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. तू एकदम भन्नाट आहेस.

ती कृती करून झाल्यावर अक्षरशः अनेक महिलांना डोळ्यातलं पाणी थांबवता आलं नाही.कुणी आपल्यासाठी काही केलं नाही, त्रास झाला हे नवीन वर्षात सगळं विसरून जाऊ. जे झालं ते झालं. आता कितीही काही केलं तरी परत मागे जाता येत नाही आणि सगळं बदलून टाकता येत नाही. मग आता हातातले जे क्षण आहेत ते पुरेपूर जगून घेऊ.

(Image : google)म्हणजे नक्की करायचं काय?

१. सगळ्यात आधी म्हणजे स्वतःला प्रायोरिटी देणं. ज्या शरीराच्या माध्यमातून आपलं या जगात अस्तित्व आहे त्या शरीराचं म्हणणं नीट लक्ष देऊन ऐकणं. सात ते आठ तास पुरेशी झोप, रोज कमीत कमी वीस मिनिटे ते एक तास आपल्याला झेपेल तो व्यायाम आणि पोषक आहार ही त्रिसूत्री नव्या वर्षात जमेल आपल्याला?२. स्वतःची काळजी घेणं, स्वतःचे लाड करणं, काहीतरी नवीन शिकणं.

३. छंद असो, वाचन असो, लिखाण असो की काही कला, काही आवडीचं करत राहणं.४. हे सगळं करता यावं म्हणून टाइम मॅनेजमेंट शिकणं. घरातली कामं ही फक्त स्वतःचीच जबाबदारी आहे असं न मानता कामांमध्ये इतरांचाही सहभाग घेणं. कधी कधी घरातल्या पसाऱ्याकडे - कामांकडे चक्क दुर्लक्ष करता येणं हेसुद्धा शिकून घ्यायला हवं!५. नव्या वर्षात स्वतःची एक चांगली मैत्रीण स्वतःच होऊ. रोज स्वतःला एक जादू की झप्पी देऊ. आरशात बघून तू मला जशी आहेस तशी खूप खूप आवडतेस असं म्हणू. हे सगळं करण्याची ताकद आणि प्रोत्साहनही स्वतःला देऊ!

(लेखिका मुक्त पत्रकार आणि मुलांसोबत वाढताना पालक मंडळाच्या संचालक आहेत.)smita.patilv@gmail.com

टॅग्स :महिलारिलेशनशिप