Join us  

बाई म्हणून तुम्ही स्वत:ला कमी तर लेखत नाही ? असा ‘कमीपणा’ बायका स्वत:कडे का घेतात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:53 PM

'बाईचा जनम लय वंगाळ वंगाळ '  अशी स्वप्रतिमा महिलांच्या मनात रुजलेली असते किंवा कुटुंबाने, समाजाने ती रुजवलेली असते. महिलांच्या आयुष्यावर, मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल ?

ठळक मुद्देमानसिक आजाराचे एक लक्षण म्हणून देखील आपली स्वप्रतिमा ढासळलेली असू शकते.

राजू इनामदार

स्त्रियांचे मानसिक आरोग्य याविषयी चर्चा करत असताना आज आपण स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर जे विविध सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक , सांस्कृतिक तसेच व्यक्तिगत घटक परिणाम करत असतात त्यापैकी स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या स्व-प्रतिमा या व्यक्तिगत घटकाविषयी सविस्तर समजावून घेणार आहोत....काही वर्षांपूर्वी मी एक ओवी ऐकली होती...

बाईचा जनम लय वंगाळ वंगाळ, चुलीमधे जसा वल्या लाकडाचा जाळजळता जळणा बाई दुःखाची जळमटं, कोंडला ग धूर मनी होते घुसमटथकली नजर पाणी डोळ्याच खळना, थरारती व्हट्ट काय सबुद फुटणाघरकाम रांधा वाढा नेहमीच ग झालं, चार भिंतीआड जिनं नशिबाला आलंलिव्हन वाचन नाही शिक्षण मिळालं, अडाणीपणानं सुख निघुनी या गेलंकधी ग सरल बाई काळोखाची रातं, येईल नशिबी कधी सुखाची पहाट सुखाची पहाट ...सुखाची पहाट....

या ओवीची सुरूवातच ' बाईचा जनम लय वंगाळ वंगाळ ' या वाक्याने होते. बाईचा जन्मच वाईट असतो अशी स्वप्रतिमा ज्या महिलांच्या मनात रुजलेली असते किंवा कुटुंबाने, समाजाने ती रुजवलेली असते. त्या महिलांच्या आयुष्यावर आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि म्हणूनच या ठिकाणी मला एक विधान करावेसे वाटते ते म्हणजे..' आपली स्व प्रतिमा आपले मानसिक आरोग्य घडवते किंवा बिघडवते 'हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्या स्व-प्रतिमेत आपल्या सुखाचं , आनंदाचं किंवा मानसिक आरोग्याचं रहस्य लपलेल आहे. आपली स्व-प्रतिमा आणि आपले मानसिक आरोग्य याचा फार जवळचा संबंध आहे हाच संबंध उलगडण्यासाठी आपण सुरुवातीलाच स्व - प्रतिमा म्हणजे काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू.  या स्व - प्रतिमेचा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणामही समजावून घेऊया..

स्व प्रतिमा म्हणजे काय ?

कोणतीही व्यक्ती स्वतःशी स्वतःच्या मनात स्वतःबद्दल काय विचार करते, स्वतःबद्दल काय स्वसंवाद करते, तिचे स्वतःच्या नजरेत स्वतःचे काय स्थान/ मूल्य/ किंमत आहे, ही त्या व्यक्तीची स्व प्रतिमा असते असे आपल्याला म्हणता येईल. या स्व प्रतिमेवर त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतो. उदाहरणार्थ एखादी स्त्री स्वतःला स्वतःच्या मनात सतत कमी लेखत असेल, मला काहीच जमणार नाही असा संवाद सतत स्वतःशी करत असेल, रांधा वाढा उष्टी काढा आणि वरून शिव्या आणि मारहाण सहन करा हीच आपली लायकी आहे, हेच आपले समाजातील स्थान आहे, हेच स्त्री जन्माचे भोग आहेत असं तिला वाटत असेल , असंख्य गोष्टींची भीती तिला वाटत असेल आणि दडपणाखाली ती सतत राहत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्या स्त्रीची स्वप्रतिमा खालावलेली आहे. ती स्वतःला कस्पटासमान समजत आहे. अशा पद्धतीने स्वतःविषयी विचार करण्यामुळे आपोआपच तिचा आत्मविश्वास कमी होतो .स्वतः विषयीचा आत्मसन्मान हळूहळू कमी व्हायला लागतो. तिचा स्वतःचा आतला आवाज तिला मागे मागे खेचायला लागतो आणि या सर्व गोष्टींचा दूरगामी दुष्परिणाम तिच्या व्यक्तीमत्वावर व्हायला लागतो आणि अनेक प्रकारचे ताण तणाव ,नैराश्य ,चिंता ,एकटेपण , न्यूनगंड अशा मानसिक आजाराच्या फेऱ्यांमध्ये ती अडकायला लागते. पाहता पाहता आयुष्यातला आनंद नाहीसा होऊन जीवंतपणी नरक यातना भोगण्याची वेळ येते. त्यातून आपल्या समाजात स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. अनेक आजार अनेक दिवस अंगावर रेटले जातात. योग्य वेळी त्या आजाराचे निदान आणि उपचार न मिळाल्यामुळे आजार बळावतात आणि एक अर्थहीन आणि निरुपयोगी आयुष्य तिला जगावे लागते. परंतु ही स्त्रियांचं आयुष्य उध्वस्त करणारी त्यांना गुलामीत ढकलणारीस्व-प्रतिमा त्यांच्यात येते कुठून? 

ही स्व-प्रतिमा कशी घडवली जाते ?

आपल्या पुरुष प्रधान समाज व्यवस्थेमध्ये लहानपणापासून मुलींना ज्या गोष्टी ऐकवल्या जातात ,जे संस्कार केले जातात, जे भेदभावाचे अनुभव त्यांना दिले जातात त्यातूनच स्त्रियांची स्व-प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. स्त्रियांना अगदी लहानपणापासून आयुष्याच्या विविध टप्प्यावर अनेक गोष्टींची शिकवण घरात आणि समाजात दिली जाते. बहुतांश स्त्रियांकडून कोणत्याही प्रकारचे प्रश्न न करता निमूटपणे ती अमलात आणतात. किंबहुना पुरुषसत्तेच्या रेट्यामुळे त्यांना ती अमलात आणावीच लागते आणि अशा शिकवणीतून स्त्रियांचा स्वभाव घडत जातो. काय करावे? काय करू नये? याचे धडे त्यांना उठताबसता दिले जातात त्यातूनच त्यांची स्वप्रतिमा आकार घ्यायला लागतेउदाहरणार्थ- - सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते.- पायातली चप्पल पायात असावी.- बैल झोडपावा तसोतशी आणि बायको झोडपावी दर दिवशी.- स्त्रियांना होणारा त्रास हा स्त्री जन्माचा भोग असतो जन्माला आली की तिच्या मागे लागतो आणि मेल्यानंतर सुटतो.- समाजात स्त्रीच्या रूपाला आणि पुरूषांच्या कर्तुत्वाला महत्त्व असतं.- बाईच शरीरच अपवित्र असतं.- काळया ,जाड्या, बुटक्या ,नकट्या मुलींना समाजात नवरा मिळणं कठीण असतं.- पुरुषांची बरोबरी बाईने करू नये.- आपण आपल्या पायरीने राहावं वर तोंड करून उलट उत्तर करू नये.- दारुडा, हिंसक कसाही असला तरी पती हा परमेश्वर असतो.अशा प्रकारची असंख्य वाक्य सतत कानावर पडून पडून स्त्रियांची स्व प्रतिमा मनात तयार होत असते आणि ती अधिकाधिक घट्ट होत जाते. समाजाने ठरवून दिलेल्या माप दंडामध्ये स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न स्त्रिया करत असतात. खरंतर हे सर्व करत असताना त्यांची प्रचंड दमछाक होत असते .ज्या स्त्रिया समाजाने ठरवून दिलेल्या भूमिका निभावू शकत नाहीत अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत त्यांना आपण आदर्श स्त्री नाही अशी रुखरुख लागून राहते आणि त्यांची स्वप्रतिमा आपोआपच खालावयाला लागते आणि त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि एकूणच विकासावर दुष्परिणाम व्हायला लागतो स्वतःच्या कातडीचा रंग, उंची, नाक कसं असावं? तसेच आपल्याला मूलबाळ होणं न होणं मुलगा होणं न होणं अशा असंख्य गोष्टी खरे तर कोणत्याही स्त्रीच्याच काय तर कोणाच्या हातात नसतात परंतु अशा अनेक अविवेकी व अशास्त्रीय धरणांचे मोठे ओझे घेऊन स्त्रिया जगत असतात. आदर्श स्त्री च्या चौकटीत फिट होण्याचा प्रयत्न करत असतात .आजूबाजूचा समाज देखील त्यांच्याकडून अशाच अपेक्षा करत असतो आणि त्यांना आदर्श स्त्रीच्या पिंजऱ्यात सतत ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. या सर्वच ओढाताणी मध्ये स्त्रियांना असं वाटतं की आपण वाईट आहोत ,आपण साध्यासुध्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही ,आपल्यामुळे घरात दु:ख निर्माण होतंय, आपण आनेकांच्या सुखाच्या आड येतोय, आपला जगून काय फायदा, आपला काही उपयोग नाही अशा सतत स्वतः विषयी नकारात्मक विचारांमुळे त्यांची स्वप्रतिमा अधिकच खालच्या पातळीवर पोहोचते. त्या स्वतःचा द्रोह करू लागतात. त्याचा त्यांच्या नातेसंबंधांवर , दैनंदिन कामावर विपरित परिणाम व्हायला लागतो म्हणजेच मानसिक अनारोग्य सुरू होते आणि म्हणूनच सकारात्मक स्वप्रतिमा तयार होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पुढील काही बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे .

 

स्वप्रतिमा स्पष्ट आणि उंच होण्यासाठी ७ सूत्रं..

१) स्व स्वीकारआपण जसे आहोत तसे विनाअट स्वतःचा स्वीकार करणे गरजेचे आहे स्वतःच्या शरीर आणि मनाच्या स्वीकारातूनच स्वप्रतिमा उंचावते आणि पुढील प्रगतीचे मार्ग दिसू लागतात.

२) स्वतः वर प्रेमआपल्याला नेहमी दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवले जाते परंतु आपण पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला हवं तरच आपण दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो .स्वतः वर प्रेम केल्यामुळे आपली आत्मप्रतिष्ठा वाढते.३) स्व दोष निर्मूलनआपल्या व्यक्तिमत्त्वात काही उणीवा असतील तसेच आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत काही चुका असतील तर लवकरात लवकर त्यात दुरूस्ती करून घेणे गरजेचे आहे तसेच सतत आपले ज्ञान आणि कौशल्य वाढवून स्वतःच्या क्षमता विस्तारत राहणे ही महत्त्वाचे आहे यातूनच आपल्या मनात स्वतःविषयी आत्मसन्मान जागृत व्हायला लागतो.४) स्व सुरक्षाआपण माणूस आहोत आणि सर्व प्रकारच्या हिंसेपासून मुक्त आयुष्य जगण्याचा आपला अधिकार आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या हिंसेला नकार देऊन स्व सुरक्षेला प्राधान्य देऊया.५) स्वतःशी आणि इतरांशी सुसंवादस्वतःशी संवाद सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करूया . स्वतःला कमीपणा आणतील अशी वाक्य स्वतःशी बोलूया नको तसेच आपले प्रश्न आणि अडचणी विषयी योग्य व्यक्तींशी मनमोकळा संवाद करूया. गरज असल्यास तज्ज्ञ समुपदेशकाची मदत घेऊया. यातूनच आपली स्वप्रतिमा स्पष्ट होण्यास मदत होईल.६) स्वतःला शब्बासकी देणं आणि स्वतःला माफ करणं.इतरांकडून कौतुकाची शाब्बासकीची अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः च स्वतःला चांगल्या गोष्टींसाठी शब्बासकी द्यायला शिकले पाहिजे. त्याचबरोबर काही चुका झाल्या असतील तर सतत ते आठवून स्वतःला त्रास करून घेता कामा नये स्वतःला माफही करता आल पाहिजे.७) स्वहित आणि स्व विकास स्वहिताचा विचार करणे हा गुन्हा नाही. स्वहिताचा विचार करून स्व विकासाचे नियोजन करूया. आपले शिक्षण, व्यवसायासंबंधी सुयोग्य निर्णय घेऊया .स्वहित आणि स्व विकास हा आपला हक्क आहे याची जाणीव ठेवूया.वरील सर्वच गोष्टी आपली स्वप्रतिमा उजळ करण्यासाठी आपल्याला उपयोगी होतील अशी आशा वाटते या सप्तसूत्री मध्ये तुम्ही आणखी भर घालू शकता .तसेच या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती अशी की विविध प्रकारच्या मानसिक आजारांमध्ये आपल्या मेंदूतील रसायने असमतोल झालेली असतात आणि त्यातून विविध प्रकारचे मानसिक आजार आपल्या मध्ये सुरू झालेले असू शकतात अशा वेळी मानसिक आजाराचे एक लक्षण म्हणून देखील आपली स्वप्रतिमा ढासळलेली असू शकते. तेव्हा मात्र सुयोग्य मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि औषध उपचार घेणे फार महत्त्वाचे असते. कधी कधी स्व-प्रतिमा सुधारण्यासाठी गोळ्या-औषधांचीच गरज असते. त्यामुळे याही गोष्टीचे भान आपल्याला असायला हवे. गरज असेल तेव्हा मनोविकार तज्ञांची आणि मानसशास्त्रज्ञांची मदत घ्यायला संकोच करू नये. 

(मानसरंग समन्वयक - मानस मित्र , परिवर्तन संस्था)

आपल्याला काही मानसिक प्रश्न असतील तर..मानसिक आधार आणि आत्महत्या प्रतिबंध मनोबल हेल्पलाइन   ७४१२०४०३००येथे संपर्क साधता येईल.www.parivartantrust.in

  

टॅग्स :महिलामानसिक आरोग्य