Join us  

आवरा घरातला पसारा, एवढ्या वस्तूंचं करणार काय? लागेल-लागेल म्हणून साठवलेल्या वस्तूंच्या ढिगात तुम्ही हरवलात तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2023 7:00 AM

आपल्या घरात आपण इतक्या वस्तू का साठवून ठेवतो? त्या वस्तूंच्या पसाऱ्यात आपलं नक्की काय होतं?

ठळक मुद्देघराची साफसफाई हा काही एकट्या स्त्रियांचा प्रांत नसतोच!

- प्राची पाठक‘लागेल - ‘पुढे मागे कामास येईल,’ असं करत आपल्या घरामध्ये खूप वस्तू साचत जातात. वस्तू चांगली तर आहे, कशाला टाकायची, असं करत घरात पडून राहतात. त्यांचा वापरही कधी काळी होतो किंवा होतच नाही. ‘टाकवत नाही म्हणून’ ह्या गटामध्ये घरोघरी प्रचंड अडगळ पडलेली असते.आपल्या घरात किंबहुना स्वयंपाकघरात जरा डोकावून बघूया. घरात माणसं किती आणि त्यांना लागणाऱ्या आणि आल्या- गेल्याला लागणाऱ्या अशा तिथल्या वस्तू किती? मग ते ऑफिसला न्यायचे डबे असोत किंवा लहान मुलांची खेळणी, पाहुण्यांसाठी लागतील म्हणत जमा करून ठेवलेल्या ठेवणीतल्या कपबशा, डिनर सेट्स असो. काही ना काही निमित्ताने नवीन वस्तू आणि त्यांचे सेट्स मात्र वाढतच जातात. आपण आपल्या घरात एवढा पसारा का घालून ठेवतो?

(Image :google)घरात होतं काय?१. स्वयंपाकघरात जितक्या प्रमाणात वस्तू वाढतात, तितक्या प्रमाणात त्या काढून टाकल्या जात नाहीत. एरव्ही स्वयंपाकघराचं इंटेरिअर चकाचक केलेलं असतं. पण ज्यावर अन्न शिजवलं जातं, तो गॅस मात्र सर्व बाजूंनी अतिशय चिकट आणि काळपट पडलेला असतो. गॅसवर बदाबद पाणी आणि भसाभस साबण न ओतता तो नीट स्वच्छ करता येणे ही एक कला असते. ते एक तंत्रसुद्धा असतं, याचं भान अनेक स्त्री-पुरुषांना नसतं. म्हणूनच गॅसची केवळ वरवरची सफाई केली जाते. त्यातून एखादा पार्ट लूज होतो, तुटतो. गॅसच लीक होऊ शकतो. चुकीची साफसफाई महागात पडते.२. घरोघरी कटलरी आणि क्रॉकरीच्या बॉक्सेसचा साठाच माळ्यांवर, कपाटांमध्ये करून ठेवलेला असतो. काहीजण तर शोकेसेसमध्ये हे आयटम्स सजावट म्हणूनच ठेवून देतात. कोणी जगभरातल्या वेगवेगळ्या प्लेट्सचे आपापल्या भिंतीवर आकर्षक प्रदर्शनच मांडतात. ते असतात फक्त आल्या-गेल्याला. पाहुणे येतात तेव्हाच या गोष्टी वापरल्या जातात. पाहुणे जायचा अवकाश की, ह्या गोष्टी परत बॉक्सेसमध्ये पॅक करून माळ्यावर, कपाटांत जाऊन बसतात. कालांतराने आल्या-गेल्यासाठी ते काढायचासुद्धा कंटाळा येत जातो. ठेवणीतल्या म्हणून ठेवलेल्या वस्तू तशाच पडून राहतात. अनेकदा पडून पडून खराब होतात. त्यांचे रंग उडतात, टवके पडतात. तरीही ते आपले माळे व्यापून असतात. कधी अचानक स्वच्छता मोहीम काढली, तर त्या सामान हलवा हलवीत काही गोष्टी तुटून जातात. भेट म्हणून पास ऑन करायच्या किंवा आवर्जून विकत घेऊन भेट द्यायच्या वस्तूंच्या यादीमध्ये अशाच डिनर सेट्सचा, कपबशा सेट्सचा, इतर कटलरी वस्तूंचा मोठा वाटा असतो.

(Image :google)

३. शोभेच्या वस्तूंचेदेखील हेच आहे. सुरूवातीला हौशीने घेऊन ठेवलेल्या वस्तू, फोटो फ्रेम्स कालांतराने धूळखातच पडलेल्या दिसतात. जसे दिवस जातात, तशा काही नवीन वस्तू भेट मिळतात. त्या ही अनेकदा ‘शोभेच्या वस्तू’ या गटातल्याच असतात. त्याही घरात पडून राहतात.४. कुठे वरचेवर काही पत्रकं मिळतात. ती लगेचच टाकून देण्यासारखी नसतात. वाचून टाकायचेच तर आहे म्हणत म्हणत ही कागदपत्रं अशा डिस्प्लेच्याच पुढे-मागे खुपसून ठेवली जातात.५. एखादी महत्त्वाची वस्तू वरचेवर तुटली, तर तिचे पार्टस् असे समोरच दिसतील, असे ठेवले जातात. त्यांना अनेक दिवस कोणीही वाली नसतो. घराच्या/गाडीच्या चाव्या, हाताचे घड्याळ आणि तत्सम वस्तूदेखील अशाच वरचेवर काढून ठेवायची सवय लागते. त्यात कोणी पाहुणे आले, तर ते ही अशाच खुल्या जागा त्यांचे लहान-मोठे सामान, फोन, चार्जर वगैरे ठेवायला वापरतात. लोक चहाचे कप, नाश्त्याच्या डिशेससुद्धा खाऊन झाल्यावर ठेवायला अशा जागा वापरून घेतात. त्या वस्तू उचल-पटक करताना त्यांच्या आजूबाजूच्या, मागे सरलेल्या शोच्या वस्तू खाली पडू शकतात. खराब होऊ शकतात. तिथे काही सांडून जाऊ शकते. मग डाग पडतात आणि वरचेवर दिसणाऱ्या पण नेटकेपणाने स्वच्छता न होणाऱ्या जागांमध्ये अशाही डिस्प्ले युनिट्सचा समावेश होऊन जातो! उगाचच मिळालेली शोभेतली घड्याळं, मूर्ती, फोटो, कॅलेंडर्स यांचा पसारा ठरवून आवरावा लागतो.८. इलेक्ट्रॉनिक वस्तू, घेऊन ठेवलेलं फर्निचर, कपाटं ओसंडून वाहणारे कपडे, गच्च भरलेला फ्रीज, तुडुंब भरलेल्या शू रॅक, कॉस्मेटिक्स, सगळ्या प्रकारची औषधं, भारंभार सामान ह्यांना आपण कधी मोकळा श्वास घ्यायला देणार? अगदी आपले माळे, बाल्कन्या, दारांच्या पाठीमागे टांगून ठेवलेल्या, गादीखाली दाबून ठेवलेल्या वस्तू... त्यांचं काय?९. ते सगळे एकच म्हणतात, आम्हाला मोकळं करा. घरात जरा जागा करा. तुमच्या घरात आहे का अशी गर्दी? या दिवाळीत त्यांना मुक्त करणार की डांबून ठेवणार?

बाईला आवरशक्ती नाही?स्वयंपाकघरातील स्वच्छतेला एक लिंगभेददेखील अजूनही जोडला गेलेला आहे. स्वयंपाकघर स्वच्छ करणे ही जणू घरातल्या स्त्रियांची पिढीजात जबाबदारी होऊन गेलेली असते. स्वयंपाकघर अस्वच्छ असेल, तर त्या घरातल्या बाईची परीक्षा करण्यात काहीच अर्थ नसतो. आपलं घर स्वयंपाकघरासकट स्वच्छ असणं ही एकूणच त्या घरातल्या सर्वांची जबाबदारी असते. घराची साफसफाई हा काही एकट्या स्त्रियांचा प्रांत नसतोच!

(लेखिका पर्यावरण अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ आहेत.)prachi333@hotmail.com

टॅग्स :दिवाळी 2023सुंदर गृहनियोजनमहिला