lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > फार ‘बोअर’, रटाळ झालंय आयुष्य? फक्त १५ गोष्टी करा, जगणं आनंदीच नाही ‘हॅपनिंग’ होणारच!

फार ‘बोअर’, रटाळ झालंय आयुष्य? फक्त १५ गोष्टी करा, जगणं आनंदीच नाही ‘हॅपनिंग’ होणारच!

काय आपलं जगणं रोज तेच, काहीच मजा नाही त्यात असं वाटत असेल तर जगण्यात रंग भरणारी ही १५ सूत्रं करुन पहा, जिंदगी गुलजार होते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 03:21 PM2021-09-14T15:21:07+5:302021-09-14T15:25:10+5:30

काय आपलं जगणं रोज तेच, काहीच मजा नाही त्यात असं वाटत असेल तर जगण्यात रंग भरणारी ही १५ सूत्रं करुन पहा, जिंदगी गुलजार होते..

Very bored, dull life? Just do 15 things, life will be 'happening', full of joy. | फार ‘बोअर’, रटाळ झालंय आयुष्य? फक्त १५ गोष्टी करा, जगणं आनंदीच नाही ‘हॅपनिंग’ होणारच!

फार ‘बोअर’, रटाळ झालंय आयुष्य? फक्त १५ गोष्टी करा, जगणं आनंदीच नाही ‘हॅपनिंग’ होणारच!

Highlightsकचरा : घरात नकोच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात तो नको ! कचरा म्हणजे जुने राग, अपेक्षाभंग, कुणालातरी ‘सुनावण्या’ची खुमखुमी... असं सगळं !

काही मजा नाही जगण्यात, रोज तेच ते करायचे. आला दिवस घालवायचा. आपल्या जगण्यात का काही हॅपनिंग घडत नाही, का आपण असे कायम मागेच असे विचार अनेकदा मनात येतात. आणि आपल्याकडे कसं काहीच नाही, याचंच दु:ख अनेकजण करतात. पण खरं पाहिलं तर आपली ताकद ठरतील अशा अनेक गोष्टी आपल्याकडे असतात. मात्र त्यांचा आपण योग्य वापर करत नाही.
या १५ गोष्टी करुन पहा. निदान १५ पैकी काही निवडक तरी करा, मग सांगा काय बदल होतो मूडमध्येही आणि आपल्या जगण्यातही.
कर के देखो, हेच यातलं महत्त्वाचं सूत्र आहे.

1. भीतीशी लढा : मनात दडून बसलेल्या भीतीचे दार हिंमतीने उघडले, तर पलीकडे आनंद उभा असतो, असे म्हणतात. जे करावेसे वाटते, करणे गरजेचे असते; पण करायची-सांगायची-बोलायची हिंमत होत नाही अशी एक गोष्ट / कृती निवडा आणि ‘करून पाहा’!
2. रोज सात तास : झोप महत्त्वाची ! - हे आपण सारे जणू विसरूनच गेलो आहोत. निवांत झोपेच्या शोधात असाल, तर फक्त एक करा : रोज नेहमीच्या वेळेआधी अर्धा तास बिछान्यावर आडवे व्हा...ही तुमच्यासाठी सुरुवात असू शकते.
3. फक्त दहा मिनिटं : ‘स्वत:’साठी काढणं ही वरवर अतिशय सोपी वाटणारी पण कृतीत आणायला सर्वांत कठीण गोष्ट ! ती करून पाहा.
4. थोडा वेळ उन्हात : उभे राहा शांत ! आजूबाजूने वाहणारे जग पाहत सकाळचे कोवळे ऊन शरीराला लागू दे, मनात शिरू दे !
5. पाच-तीन-दोन : शांत बसा. तुम्हाला ‘दिसतात’ अशा पाच गोष्टी, तुम्ही ‘स्पर्श’ करू शकता अशा तीन गोष्टी, तुम्हाला ‘वास येतो’ अशा दोन गोष्टी यांची एक छोटी यादी करा. हे रोज करा. ‘त्या क्षणा’त जगण्याचा अनुभव हळूहळू सवयीचा होईल.
6. कौतुक : स्वत:च स्वत:चं आणि स्वत:पुरतं... करून पाहा. छान वाटेल ! स्वत:मधल्या चांगल्या गोष्टींचा शोधही लागेल.

7. सोडायचा प्रयत्न : एकच वाईट सवय ! सुरुवात सोप्या गोष्टींपासून केल्यास धीर येऊ शकेल. उदा. रोज चारऐवजी दोनच कप चहा !
8. एक फोन, एक स्पर्श : जीवलग मित्राला, मैत्रिणीला, आई-बाबांना, जवळच्या कुणाला ! एकच...पण रोज !!
9. जोमो : जॉय ऑफ मिसिंग आउटचा अनुभव घेणे ! म्हणजे आधी दिवसातला काही वेळ आणि हळूहळू अख्खा एक दिवस सोशल मीडियाच्या कुठल्याही कट्ट्यावर न फिरकणे. त्याशिवाय आजूबाजूचे आवाज, वास, स्पर्श हे कसे दिसतील तुम्हाला?
10. वाईट वाटलं, तर वाटू द्या : सतत आनंदी(च) असणं ही एक भ्रामक कल्पना आहे. तो हट्ट बरा नव्हे. उदास, अस्वस्थ वाटत असेल, तर वाटू द्या !! त्या भावनेचा शहाणा स्वीकार हाच ते सावट दूर करण्याचा महत्त्वाचा मार्ग असतो.
11. हे खाऊ? की ते खाऊ? किती खाऊ? कधी खाऊ? : या प्रश्नोपनिषदात अडकून तुम्ही साधा खाण्याचा आनंद हरवून बसला आहात का? यातून बाहेर या ! साधा उपाय : शरीराचं ऐका ! आणि तोंडावर ताबा ठेवा. ही एवढी सुरुवात पुरेशी आहे. पुढला रस्ता तुमचा तुम्हाला सरावाने सापडेलच ! 
12. डायरी : ही कल्पना जुनी आहे खरी, पण जुनाट नक्की नाही ! रोज काय झालं हे लिहून कुठे तुम्हाला इतिहास लेखनाला मदत करायचीय?- स्वत:च्या आयुष्यात काय व्हायला हवं, इतक्या नोंदी केल्या तरी पुरे !
13. गजर - वाजेल तेव्हा ‘स्नूझ’चं बटण दाबून त्याचा आवाज बंद करण्याची सवय लवकर घालवाल तेवढी बरी !
14. कचरा : घरात नकोच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात तो नको ! कचरा म्हणजे जुने राग, अपेक्षाभंग, कुणालातरी ‘सुनावण्या’ची खुमखुमी... असं सगळं !
15. विचार : त्यांच्यावर तुमचा ताबा नसतो हे मान्य, पण तुमच्या मानेवर बसण्यापासून त्यांना रोखायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? आज नाही, उद्याही नाही, पण कधीतरी जमेलच की!!

Web Title: Very bored, dull life? Just do 15 things, life will be 'happening', full of joy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.