Join us  

तुमच्या झोपायच्या स्थितीवरुन समजते तुमचे व्यक्तिमत्त्व; बघा या टेस्टशी जुळते का आपली पर्सनॅलिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2022 11:54 AM

युरोपियन जरनल ऑफ पर्सनॅलिटीच्या सर्वेक्षणानुसार तुमची झोपेची स्थिती तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. पाहूया झोपण्याची कोणती स्थिती काय दर्शवते.

ठळक मुद्देबघा तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता त्यावरुन तुमचे व्यक्तिमत्त्व तसे आहे काझोपण्याची स्थिती आपल्या मानसिकतेशी, स्वभावाशी निगडित असते हे वाटत नसले तरी खरे आहे

झोप ही अनेकांसाठी अतिशय प्रिय असणारी गोष्ट. आपण रात्री तर ताणून झोपतोच पण कधी एकदा विकेंड येतोय आणि आपण मनसोक्त झोपतोय असे अनेकांना होऊन जाते. मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी किंवा आरामासाठी झोप हा अतिशय उत्तम उपाय आहे. ज्यांना पडल्या पडल्या गाढ आणि शांत झोप लागते ते खऱ्या अर्थाने सुखी असतात असं म्हटलं जातं. आता हे सगळं ठिक असलं तरी आपण कोणत्या स्थितीत झोपतो यावरुन आपलं व्यक्तीमत्त्व समजतं असं म्हटलं जातं. अनेकांना पोटावर झोपायची सवय असते. तर कोणाला पाय एकदम जवळ घेऊन. काही जण एकदम हात पाय पसरुन झोपतात तर काही जण एकदा एका स्थितीत झोपले की सकाळी उठेपर्यंत त्याच स्थितीत असतात. आपल्या शरीराची स्थिती ही आपल्या मनस्थितीशी किंवा आपल्या व्यक्तीमत्त्वाशी निगडीत असते हे आपण लक्षात घ्यायला हवे. युरोपियन जरनल ऑफ पर्सनॅलिटीच्या सर्वेक्षणानुसार तुमची झोपेची स्थिती तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. पाहूया झोपण्याची कोणती स्थिती काय दर्शवते. 

(Image : Google)

१. पाठीवर झोपणारे 

तुम्ही बहुतांश काळ पाठीवर झोपत असाल तर तुम्हाला लक्ष केंद्रित करुन घ्यायला आवडते. अशा व्यक्ती आशावादी असून त्या समविचारी लोकांच्या सहवासात आनंदी असतात. हे लोक सगळ्यांमध्ये कायम उठून दिसतात. या लोकांना स्वत:कडून किंवा इतरांकडून बऱ्याच अपेक्षा असतात. असे लोक इतरांच्या न पटणाऱ्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. या लोकांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. पाठीवर झोपणाऱ्या लोकांना स्वत:चा वेळ लागतो, ते असेच पडून बरीच स्वप्न पाहतात आणि एखादे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि यश संपादन करतात. हे लोक दिवस आणि रात्रीसाठी स्वत:चे राजा किंवा राणी असतात. 

२. एका अंगावर झोपणारे 

तुम्ही एका अंगावर झोपत असाल तर तुम्ही शांत, विश्वास ठेवता येईल असे, अॅक्टीव्ह व्यक्ती असता. अशा व्यक्ती भूतकाळाचा जास्त विचार न करता भविष्याबद्दल विचार करतात. अशा व्यक्ती कोणत्याही बदलाशी किंवा परिस्थितीशी लवकर जुळवून घेतात. कठिण परिस्थितीतही चेहऱ्यावर हास्य ठेवून काम करण्याची वृत्ती असते. या लोकांना स्वत:बद्दल पूर्ण माहित असल्याने त्यांचा अपमान करणे तेवढे सोपे नसते. यामध्येही जे हात पसरुन एका अंगावर झोपतात ते स्वत:च्या मतावर ठाम असणारे असतात. जे उशी घेऊन झोपतात ते दुसऱ्याला मदत करायला तत्पर असतात. असे लोक आयुष्यात नातेसंबंधांना सर्वाधिक महत्त्व देतात. 

३. पाय किंवा गुडघे एकदम जवळ घेऊन झोपणारे 

अशा लोकांना सुरक्षित वातावरणाची आवश्यकता आहे असे त्यांची झोपण्याची स्थिती सांगते. लहान बाळासारखी असणाऱी ही स्थिती असलेल्या लोकांना कोणी आपली काळजी घेतलेली आवडते. असो लोक खूप अंतर्मुख असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचणी येतात. आपल्या कुटुंबियांसोबत हे लोक जास्त कम्फर्टेबल असतात. हे लोक काहीसे बुजरे, निष्पाप, संवेदनशील आणि लगेच क्षमा करणारे असतात. अशाप्रकारे पाय जवळ घेऊन झोपणाऱ्या लोकांना कमीत कमी लोकांमध्ये वावरणे जास्त आवडते. झोपेचा अभ्यास करणारे संशोधक सॅम्युअल डंकेल यांच्या म्हणण्यानुसार जे लोक लहान बाळासारखे झोपतात ते भावनिक आणि भित्रे असतात.

(Image : Google)

४. पोटावर झोपणारे 

अनेकांना पोटावर म्हणजेच पालथं झोपण्याची सवय असते. या लोकांची इच्छाशक्ती एकदम चांगली असून ते आव्हान पत्करण्यासाठी तत्पर असतात. हे लोक काहीसे साहसी असून कोणतीही अडचणी सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. इतरांना मार्गदर्शन करायला आवडत असल्याने ते नेहमी उपयुक्त सल्ले देतात. कोणत्याही कठिण परिस्थितीत मध्यम मार्ग काढण्याचा यांचा स्वभाव असतो. या लोकांमध्ये आत्मविश्वास थोडा कमी असतो. उशीखाली हात, डोकं एका बाजूला आणि पालथं झोपणारे लोक मनाने मोकळे असतात असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. 

टॅग्स :मानसिक आरोग्यव्यक्तिमत्व