>सुखाचा शोध > सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या झाडांची गोष्ट, एकटेपणा संपवून मायेनं बोलणारी!

सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या झाडांची गोष्ट, एकटेपणा संपवून मायेनं बोलणारी!

आपण निगुतीनं लावलेल्या, जपलेल्या झाडांशी आपलं आतून घट्ट नातं असतं. वृक्षवेलींशी मैत्री जुळलेला माणूस कधीच एकटा नसतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 01:45 PM2021-05-04T13:45:36+5:302021-05-04T13:50:41+5:30

आपण निगुतीनं लावलेल्या, जपलेल्या झाडांशी आपलं आतून घट्ट नातं असतं. वृक्षवेलींशी मैत्री जुळलेला माणूस कधीच एकटा नसतो.

trees that give positive energy, ending loneliness. | सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या झाडांची गोष्ट, एकटेपणा संपवून मायेनं बोलणारी!

सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या झाडांची गोष्ट, एकटेपणा संपवून मायेनं बोलणारी!

Next
Highlightsअसं म्हणतात की झाडांची मुळे जमिनीखाली एकमेकांशी संवाद साधत असतात. पण मला वाटतं ती एकमेकांशीच नव्हे तर अनुबंध जुळलेल्या प्रत्येकाशी संवाद साधत असतात.

- गिरिजा मुरगोडी
 

चैत्र सुरु झाला आणि सृष्टीचा वसंतोत्सव बहरु लागला. हळदुली झुंबरं झुलवत बहावा, केशरी लाल संभार सांभाळत गुलमोहोर, सदाहरित पर्णभार सावरत आम्रवृक्ष, नवपल्लवानं सळसळत अश्वत्थ; या सगळ्या अथिरथींबरोबरच मोगरा, मदणबाण, चाफा, लिली, जास्वंद ही सगळी रंग गंधभारित मंडळीही नटून थटून या उत्सवातला आपला चैतन्यानंदी सहभाग साजरा करु लागली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’. हे सगेसोयरे कधी मनाची तलखी शांत करतात तर कुणाला आजारी असताना आपली सकारात्मक ऊर्जा देऊन दिलासा, उभारी देऊन बरे व्हायला मदत करत असतात. वृक्षवेलींशी मैत्री जुळलेला माणूस कधीच एकटा नसतो. असं म्हणतात की झाडांची मुळे जमिनीखाली एकमेकांशी संवाद साधत असतात. पण मला वाटतं ती एकमेकांशीच नव्हे तर अनुबंध जुळलेल्या प्रत्येकाशी संवाद साधत असतात.
आपण निगुतीनं लावलेल्या, जपलेल्या झाडांशी आपलं आतून घट्ट नातं असतंच. आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करुन राहिलेलं एखादं तरी झाड असतंच. माझ्याही मनात घर करुन आहेत माहेरच्या बागेतले ; हिरव्या गर्द आणि केशरी जर्द आठवणींनी मनाला नेहमी तजेलदार ठेवत राहिलेले दोन आम्रवृक्ष.

या अमृतपायरी आंब्यांच्या झाडांनी मोठ मोठे केशरी गराचे अतिशय गोड आणि रसरशीत असे अमृत आंबे भरभरुन दिले. त्यातलं एक झाड परसात होतं आणि एक आम्हा बहिणींच्या खोलीच्या बाजूला. त्याच्याशी तर मर्मबंधातल्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. कारण त्या झाडाखाली झोपाळा बांधलेला होता. बाजूला छानसा कट्टा. सदैव हिरवगार छत्र धरणारा तो प्रिय वृक्ष, खाली जिवलग झोपाळा आणि तो लाडका कट्टा. ही आमची अत्यंत आवडीची ठिकाणं.
निवांत बसून चहा, खाणं, भाज्या निवडणं, कपड्यांच्या घड्या घालणं, पेपर वाचणं, कडक हिवाळ्यात तर उबदार दुपारी जेवणसुद्धा या झाडाखाली झोपाळ्यावर. आणि अर्थातच कधी न संपणाऱ्या अखंड गप्पा. खुपदा आईशी, सतत बहिणीशी, अनेकदा मैत्रिणींशी, पुढे माहेरी आल्यावेळी पतीशी सुद्धा. कधी पुस्तक वाचणं, कधी रेडिओ ऐकणं, कधी एकटंच बसून भवतालाशी संवाद, सगळं त्याच्या साक्षी-सोबतीनंच. त्याची बदलती रुपं न्याहाळणं, कधी त्याच्याशीच गप्पा मारणं हे सुद्धा जिव्हाळ्याचे क्षण. अजूनही एक न एक आठवण मनाच्या डहाळीवर झुलवत तो राजवृक्ष सदाहरित अशी सोबत करत आहे.

( लेखिका गोव्याच्या असून साहित्य आणि सामाजिक विषयावर लेखन करतात.)
gmmurgodi@gmail.com
 

Web Title: trees that give positive energy, ending loneliness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.