Join us  

झोपच येत नाही ? रात्री ओटीटीवर सिनेमे पाहत तुम्ही झोपतच नाही?- हे झोप उडणं महागात पडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 2:59 PM

‘झोपेचं कर्ज’ ही आपली जीवनशैली बनत चाललं आहे. “इफ यु स्नूज, यु लूज”, जो थांबला तो संपला वगैरे वाक्प्रचार आपल्या सर्वात आवश्यक अशा झोपेपासून आपल्याला दूर करत असतात.   

ठळक मुद्देझोपलं तर आपला वेळ वाया जाईल असं वाटून आपल्या शरीरासह मेंदूची आपण फार मोठी हेळसांड करतो हे तरी लक्षात घ्या.

प्रज्ञा शिदोरे

झोप न येणं. फार उशीरा झोप लागणं, गाढ झोप न लागणं, झोप लागली की दचकून जाग येणं हे सारं अनेकांच्या बाबतीत घडतं. मनावर ताण असो नसो, झोपेच्या तक्रारी असतात. पण झोप ही एक जादू आहे. जवळजवळ प्रत्येक रात्री आपल्या शरिरामध्ये मेटामॉर्फोसिस म्हणजे कायापालट होतो. आपला मेंदू हा बदल घडवून आणतो. आपला मेंदू हे बदल त्याच्या वागणुकीत आणि उद्देशामध्ये करतो. आपली शुद्ध काही काळासाठी मालवून मेंदू अक्षरशः ‘आवराआवर’ करतो. त्या वेळेत अगदीच पंगू झाले असतो. पण तो आपल्याला पुढच्या दिवसासाठी तयार करत असतो. आपण झोपतो!कोणत्याही शारीरिक क्रियेपेक्षा ‘झोपणे’ याविषयी समजून घेणं खूपच अवघड. कारण झोपलेला ‘शुद्धी’तच नसतो ना! पण, इस. पूर्व ३५० मध्ये अरिस्टोटलने पहिल्यांदा “ऑन स्लीप ऍण्ड स्लीपलेसनेस” नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर २३०० वर्ष कदाचित काहीच घडलं नाही. १९२४ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ हान्स बर्जर याने इलेक्ट्रोएनसीफ्लॉग्राफचा शोध लावला. यामुळे मेंदूमधल्या घडामोडी लक्षण येणं सोपं झालं. यामुळे झोपेचा शोध वैचारिक पातळीवरून शास्त्रीय पातळीवर शोध सुरु झाला.सध्याच्या काळात आपण आपल्या झोपेला फारच कमी लेखत असतो. ‘झोपेचं कर्ज’ ही आपली जीवनशैली बनत चाललं आहे. “इफ यु स्नूज, यु लूज”, जो थांबला तो संपला वगैरे वाक्प्रचार आपल्या शरिरासाठी सर्वात आवश्यक अशा झोपेपासून आपल्याला दूर करत असतात. एवढंच नव्हे तर आपल्या आजूबाजूची आमिषे आपल्याला झोपेपासून दूर दूर नेतात. कसं असतं ना, की आपण जर चांगले ८ तास झोपलो, तर रात्रीच्या सिरियल्स कोण पाहणार, सिनेमे कसे चालणार. माणूस ‘कंझ्युमर’ किंवा उपभोक्ता झाला आणि हे सर्व प्रश्न सुरू झाले बघा!!

अरियाना हफिंग्टन (हफिंग्टन पोस्ट या ऑनलाईन वृत्तपत्राच्या संपादिका) यांनी नेमक्या विषयावर ‘स्लीप रिव्होल्यूशन’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. २०१६ साली प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक अमेरिकेत लगेचच हिट झालं. आपल्याला झोपेची आवश्यकता का आहे, त्यामुळे आपल्या मनावर - शरीरावर कसे परिणाम होतात, कमी झोपेमुळे आपण रोगांना कसं आमंत्रण देतो हे विषय या पुस्तकात हाताळले आहे.याविषयी रसेल फॉस्टर यांनी ‘आपण का झोपतो’ या विषयी टेड टॉक दिलं आहे. ते तुम्हाला टेड टॉकच्या वेबसाईटवर बघायला मिळेल. हे सुद्धा नक्की ऐका..

या सगळ्यांचं बेसिकली म्हणणं काय? तर प्लिज रोज आठ तास शांत झोपा ! बास्स…झोप ही आपली फार महत्वाची गरज आहे. ओटीटी पाहण्याच्या स्पर्धेत आपण मागे पडू, झोपलं तर आपला वेळ वाया जाईल असं वाटून आपल्या शरीरासह मेंदूची आपण फार मोठी हेळसांड करतो हे तरी लक्षात घ्या.निवांत झोपा, मेंदू नव्यानं जगायला आपल्याला नक्की तयार करत राहील..

टॅग्स :मानसिक आरोग्य