Join us

चारचौघात बोलायचं म्हंटलं तर तोंडातून शब्द फुटत नाही? आत्मविश्वासाने बिनधास्त बोलण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा..

By अमित इंगोले | Updated: May 21, 2025 18:43 IST

Personality Development: जेव्हाही पब्लिक स्पीकिंग म्हणजे भाषण वगैरे देण्याची किंवा चारचौघात बोलण्याची संधी मिळते तेव्हा तोंडातून शब्द फुटता फुटत नाहीत. पब्लिक स्पीकिंग सुधारण्यासाठी काय करावं ते जाणून घ्या...

Personality Development: आपल्या घरातील लोकांसमोर किंवा मित्रांसमोर ज्या आत्मविश्वासानं आपण बोलतो गरजेचं नाही की, तेवढ्याच आत्मविश्वासानं तुम्ही इतर लोकांसमोर बोलू शकाल. बरेच लोक असे असतात ज्यांना भरपूर लोकांसमोर म्हणजे पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते. जेव्हाही पब्लिक स्पीकिंग म्हणजे भाषण वगैरे देण्याची किंवा चारचौघात बोलण्याची संधी मिळते तेव्हा तोंडातून शब्द फुटता फुटत नाहीत.

सगळ्यात जास्त अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्ही नोकरीच्या ठिकाणी टीम लिडर असता. कारण तेव्हा तुम्हाला सगळ्यांना गाइड करावं लागतं. बोलावं लागतं. अशात तुम्हाला तुमचं पब्लिक स्पीकिंग स्किल सुधारण्यासाठी खूप काही करावं लागतं असं नाही. लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी तुम्ही काही छोट्या छोट्या टिप्स वापरूनही खाड खाड बोलू शकता. स्पीच थेरपिस्ट श्रुति सत्यन यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर याबाबत टिप्स देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पब्लिक स्पीकिंगची भीती घालवण्यासाठी आणि आत्मविश्वासानं बोलण्यासाठी टिप्स दिल्या आहेत.

लोकांसमोर आत्मविश्वासानं कसं बोलाल?

आरश्यासमोर प्रॅक्टिस करा

आत्मविश्वासानं बोलण्यासाठीची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करा. लोकांसमोर बोलण्याआधी काही वेळ किंवा काही दिवस आरश्यासमोर उभं राहून बोलण्याची प्रॅक्टिस करा. यानं तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि हावभाव सुद्धा सुधारता येतील.

भाषेवर लक्ष द्या

स्पीच थेरपिस्ट सांगतात की, जेव्हा तुम्ही तुमच्या मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत बोलता तेव्हा ती भाषा बोलण्यासाठी तुम्हाला लोकांसमोर काहीच अडचण येत नाही. पण जर एखाद्या दुसऱ्या भाषेत जसे की, इंग्रजीमध्ये तुम्हाला लोकांसमोर बोलायचं असेल तर तुम्ही अडखळता. अशात तुम्ही या भाषेवर मेहनत घेतली पाहिजे. भाषा सुधारली तर आपोआप तुमचा लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वासही वाढेल.

कुणासोबतही बोला..

पब्लिक स्पीकिंग सुधारण्यासाठी आणखी एक चांगली प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही कुणासोबतही बोला. यानं तुमची लोकांसमोर बोलण्याचा अवघडलेपणा दूर होईल. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि पब्लिक स्पीकिंग सुधारण्यासाठी ही एक चांगली पद्धत ठरू शकते.

इतरही काही टिप्स

- पब्लिक स्पीकिंग स्किल्स सुधारण्यासाठी मनातल्या वाचण्याऐवज पुस्तक मोठ्यानं वाचा. यानं तुमचं उच्चारण आणि भाषा दोन्ही सुधारेल. 

- पब्लिक स्पीकिंगमध्ये बॉडी लॅंग्वेजचा देखील खूप प्रभाव पडतो. यासाठी हातवारे करत आणि ताठ उभं राहून बोला. तुम्ही बॉडी लॅंग्वेंज अवघडल्यासारखी असू नये.लोकांच्या डोळ्यात डोळे घालून आणि त्यांकडे बघून बिनधास्त बोलल्यास तुमचा आत्मविश्वास वाढतो.

- थोड्या थोड्या वेळानं पॉज घेत बोला. जराही पॉज न घेता खाली बघून सगळं भडाभडा बोलून टाकाल तर तुमचा मुद्दा लोकांपर्यंत योग्यपणे पोहोचणार नाही.

- तुम्हाला जे बोलायचं आहे त्या मुद्द्यावर फोकस करा. मुख्य मुद्दा सोडून भरकटू नका. जर तुम्हाला नर्वस वाटत असेल तर आधी मोठा श्वास घेऊन रिलॅक्स व्हा आणि नंतर बोला

टॅग्स :व्यक्तिमत्वमानसिक आरोग्य