Join us  

बाईपण बिच्चारं, मला मनासारखं जगताच नाही आलं म्हणत कुढता तुम्ही? जगायला वेळ का मिळाला नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2023 4:14 PM

मला करायचं खूप होतं पण करताच नाही आलं असं म्हणत रडणं सोपं, पण बदल करायचा तर छोटे प्रयत्नही पुरेसे असतात.

ठळक मुद्देबाबदारी घेणं आणि आपलं जगणं घडवणं जास्त आनंदादायी असतं.

मैत्रिणी विचारतात भेटतेस का? उत्तर तेच-वेळच नाही. पार्लरमध्ये जायचंय पण वेळच नाही. वाचायचं आहे, शिकायचं आहे, निवांत झोप काढायची आहे, मुलांसोबत खेळायचं आहे, नवऱ्याशी गप्पा मारायच्या आहेत, मनासारखा पदार्थ करुन खायचा आहे, आईबाबांशी गप्पा मारायच्या आहेत, खूप काही करायचं आहे पण काय करणारच वेळच नाही. बाई मला वेळच नाही असं आपण सतत स्वत:ला सांगतो.

पण कधी स्वत:ला विचारुन पाहिलं आहे का आपला वेळ नक्की कुठं जातो? कशात जातो? वेळ नाही म्हणताना आपला वेळ नक्की कशात जातो? आपण नक्की कशात बिझी असतो. आणि इतके बिझी आहोत तर मग आपण जगणार कधी? मरताना वाटलं की जगायला वेळच मिळाला नाही तर..

 

(Image :google)

आपलं नक्की असं का होतं?

त्याचं कारण एकच की आपण जे करायचं म्हणतो ते आपल्याला जीव तोडून करायचंच नसतं. सगळं एकावेळी नाही जमणार पण आपल्या आवडीच्या कामाला रोज १० मिनिटं तर मिळूच शकतात. आपल्या आवडत्या माणसाला एक फोन करणं. आपल्याला जे आवडतं ते करताना फोन लांब ठेवणं. इतर कामातून वेळ काढून स्वत:साठी जगणं. हे सारं करणं मुळात अवघड नाही.

पण आपल्यासाठी नेमकं काय महत्त्वाचं हेच नक्की नसतं आणि त्यापेक्षा मी बाई बिचारी म्हणत रडणं आणि व्हिक्टिम कार्ड खेळणं जास्त सोपं असतं.खरेतर एकटेपण आणि वेळ असे दोन्ही अंगावर येऊ शकते. म्हणूनच रुटीन स्वतःपुरते आखून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. टीव्ही बघत, मोबाईल -कॉम्प्युटरवर गेम्स खेळत किंवा सोशल नेटवर्किंगवर वेळ वाया घालविण्यापेक्षा तो वेळ आपल्या मनासारख्या गोष्टी करण्याला देता येईल का असा विचार केला तर मार्ग नक्की सापडेल.

माझे मनासारखे राहून गेले असं सतत सेण्टी मारण्यापेक्षा मनासारखं जगण्यासाठी वेळ काढणं, जबाबदारी घेणं आणि आपलं जगणं घडवणं जास्त आनंदादायी असतं. फक्त स्वत:ची तयारी हवी. तशी तयारीच जगण्यात चांगल्या अर्थानं बदल घडवते. बाकी रडगाणी तर आहेतच नेहमीची ती सोपीच असतात.

टॅग्स :महिलामानसिक आरोग्य