lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > तुमचा आनंद तुम्हीच तर बांधून घालत नाही? दसऱ्याला ओलांडा तुम्हीच स्वत:ला घातलेले रिंगण..पण कसं?

तुमचा आनंद तुम्हीच तर बांधून घालत नाही? दसऱ्याला ओलांडा तुम्हीच स्वत:ला घातलेले रिंगण..पण कसं?

सीमोल्लंघन म्हणजे नक्की काय करायला हवं आपण?, आपल्या सीमा काय आहेत?, माझ्या मर्यादा मला माहीत आहेत का?, मला काय आवडतं?, काय केलं म्हणजे मला मी सापडते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 05:29 PM2021-10-12T17:29:38+5:302021-10-12T17:42:45+5:30

सीमोल्लंघन म्हणजे नक्की काय करायला हवं आपण?, आपल्या सीमा काय आहेत?, माझ्या मर्यादा मला माहीत आहेत का?, मला काय आवडतं?, काय केलं म्हणजे मला मी सापडते?

To know your limits, cross it and get your real happiness on Dushera... Happiness of finding yourself. | तुमचा आनंद तुम्हीच तर बांधून घालत नाही? दसऱ्याला ओलांडा तुम्हीच स्वत:ला घातलेले रिंगण..पण कसं?

तुमचा आनंद तुम्हीच तर बांधून घालत नाही? दसऱ्याला ओलांडा तुम्हीच स्वत:ला घातलेले रिंगण..पण कसं?

Highlightsआपल्या स्वभावाच्या,बुद्धीच्या मर्यादा काय आहेत?, त्या मला माहीत आहेत का?, त्या जाणून घेण्याचा मी कधी प्रयत्न केला आहे का?कोणतं काम मला झोकून देऊन करता येतं?, काय केलं म्हणजे मला मी सापडते? या सगळ्याचा विचार आपण करायला हवा.सीमोल्लंघन करतांना आपण स्वतः बद्दलच्या गोड आणि अवास्तव प्रतिमेचा भंग करायला हवा आणि निर्भय होऊन वस्तूनिष्ठपणे स्वतःकडे बघायला हवं.

 - अश्विनी बर्वे


विशिष्ट दिवशी एखाद्या व्यक्तीला, वस्तूला,देवाला,निसर्गाला सन्मान दिला की, आपलं काम संपलं, असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. शिवाय असं करणं सोप्पंही असतं. कारण तो दिवस संपला की, त्यामागचा विचारही संपवून टाकतो आपण. आता बघा ना, आपण नऊ दिवस स्त्री शक्तीचा किती गौरव करत आहोत. स्त्रिया देखील वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांनी (जरी ती मार्केट स्ट्रॅटेजी असली तरी ),दागिन्यांनी आणि अनंत शब्दांच्या अनंत अलंकारांनी किती नटत आहेत. त्यात चांगलं किंवा वाईट असं काही नाही, अर्थात आपल्याला आवडतं म्हणून ते आपल्या विचारानं करत असू तर, हे सगळं करत आपण दसऱ्यापर्यंत पोहचतो, त्यावेळी आपण खरोखर सीमोल्लंघन करतो का?, की ते फक्त रूपकापुरते मर्यादित ठेवतो ; असा विचार माझ्या मनात आला.

Image: Google

सीमोल्लंघन करायचं म्हणजे नक्की काय करायला हवं आपण?, मी माझं डोकं खात स्वतःला विचारलं. तेव्हा लक्षात आलं की, आपल्या सीमा काय आहेत?, आपल्या स्वभावाच्या,बुद्धीच्या मर्यादा काय आहेत?, त्या मला माहीत आहेत का?, त्या जाणून घेण्याचा मी कधी प्रयत्न केला आहे का?, समाज मला जन्माला येण्याच्या आधीपासूनच एका विशिष्ट मर्यादेत , सीमेच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करत असला तरी मला माझ्या मर्यादा जाणवतात का?

समजा त्या जाणवल्या तर मी स्वतः त्यातून काही मार्ग काढू शकते का?, आणि तसा मार्ग काढायचा असेल तर, मला माझा विचार माहीत पाहिजे. मला काय आवडतं?, कोणतं काम मला झोकून देऊन करता येतं?, काय केलं म्हणजे मला मी सापडते? या सगळ्याचा विचार आपण करायला हवा. कारण आपणच आपल्याला खूप बंधनात टाकत असतो.
आपण आपल्यावर टाकलेली बंधनं एकदा शोधायला हवी. एखादी गोष्ट मला जमत नाही म्हणजे काय?, भीती वाटत असेल तर, नक्की कशाची?, लोकांच्या टोमण्यांची?, कोण काय म्हणेल याची?, आपण सगळ्याच जणी या विचारात स्वतःला एवढं बंदिस्त करतो की, पुढे काहीतरी आपल्याला जमणारं,आवडणारं आहे हेच बघत नाही.त्यामुळे आपण कोणत्याही वयाचे असो आपण स्वतःला आधी ओळखायला हवं ; तरच आणि तरच आपण सीमोल्लंघन करू शकू.
बाईपणातून माणूसपणापर्यंत आपल्याला पोहचायचं आहे. त्यासाठी आपण समाजाच्या भीतीपोटी,स्वतःची ओळख न झाल्याने ज्या बंधनात आपण अडकलो आहोत,ती बंधनं ओळखणं आणि त्यांचा अर्थ,त्यातली विसंगती आणि दुटप्पीपणा लक्षात घेणं गरजेचं आहे. ही, बंधनं आपल्याला दिसली तरच ती, ओलांडण्याचा मार्ग आपल्याला सापडेल.

Image: Google

स्त्रियांच्या परिवर्तनाचा विचार भौतिक आणि बाह्य बदला पुरता मर्यादित नाही. त्यासाठी स्त्रियांच्या विचारांमध्ये बदल होण्याची,त्यांनी स्वतः कडे एक व्यक्ती, एक माणूस म्हणून बघण्याची गरज आहे. त्यासाठी आपण आपल्यावरच अवलंबून असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपली शक्तिस्थाने ओळखणे गरजेचे आहे. तरच आपण आपल्या भोवतीच्या चौकटी विस्तारू शकू. उदार,विवेकी आणि समतोल विचाराने हे शक्य आहे.

सीमोल्लंघन करतांना आपण स्वतः बद्दलच्या गोड आणि अवास्तव प्रतिमेचा भंग करायला हवा आणि निर्भय होऊन वस्तूनिष्ठपणे स्वतःकडे बघायला हवं. जीवनाची विविधता,विशालता लक्षात घेऊन आपल्या प्रेरणांना कामाला लावायला हवं. अनेक काळ आपला मार्ग संकुचित होता हे खरं आहे, पण त्या चौकटी ज्यांनी मोडल्या आहेत त्यांनी मागे राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीला हात द्यायला हवा. म्हणजे आपोआपच विचारात निर्भयता आणि सखोलता येईल.

Image: Google

एखादी गोष्ट करायची म्हटली की, आपल्या पुढे अनंत अडचणी येतात, त्या बऱ्याचवेळा खऱ्याही असतात,तर अनेकवेळा आपल्या मनाच्या बंदिस्तपणातून सुद्धा येतात. अशावेळी मला लोकसाहित्यातल्या स्त्री समुहांनी रचलेली गाणी आठवतात. ती त्यांनी श्रम हलके करण्यासाठी, आनंदासाठी, मनावरचा भार हलका करण्यासाठी सहज गायली आहेत. मुद्दाम गाणी रचली नाहीत पण, त्यांच्या रोजच्या कामातून त्यांनी ती निर्माण केली. त्यांनी एक सीमा ओलांडली आणि आपल्यासाठी त्या काळाचा,त्यांच्या जगण्याचा दस्तऐवज निर्माण केला. त्यातल्या एक स्त्रीने आपल्या जगण्यातून गोळा केलेले आपले परखड विचार मांडले आहेत. स्वतः च कसा स्वतःचा आधार झाली हे ती सांगत आहे.
‘दुःखामागं दुःख, दुःखाला येतो पूर
मपल्या जिवाला, माजा मी देते धीर ‘
ही ओवी मी फिरायला जाते तिथं भेटणाऱ्या आजी नेहमी म्हणतात. तेव्हा मला जाणवतं ही, गाणी आपल्याच पाठीवर एक उबदार हात ठेवून सीमा ओलांडायला लावतात.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

ashwinibarve2001@gmail.com)

Web Title: To know your limits, cross it and get your real happiness on Dushera... Happiness of finding yourself.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.