Join us  

माझ्याच वाट्याला नेहमी कटकट येते असं वाटतं तुम्हाला? जगण्यात आनंद हवा तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2024 8:00 AM

आपण रोज सकाळी उठून असा विचार करतो की आज माझं आयुष्य आनंदात जाणार आहे?

ठळक मुद्देअती विचार टाळून लहान लहान प्रश्न आपल्या हातात घेऊन ते सोडवून टाकायचे पटकन. करुन पाहा.

चालता चालता आपली चप्पल तुटली, तर आपण काय करतो? म्हणजे नशिबाला दोष देतो, चिडतो, रडतो, तिथेच बसून राहतो, इतरांना दोष देतो. की आपण ही चप्पल कशी शिवता येईल याचा विचार करतो. चिडचिड होणं साहजिक आहे. आपण म्हणूही की यार, हिला आत्ताच तुटायचं होतं का? पण मग पुढच्या क्षणी आपण काय करू? तिथेच बसून राहू का? कोणी नवीन चप्पल आणून देईपर्यंत मी इथून हलणारच नाही, असा विचार करू का?

तर नाही. आपण म्हणू इतरांचा काय संबंध? आपण चटकन आपली चप्पल दूरुस्त करु. अगदीच शक्य नसेल फारच फाटली तर नवीन घेऊ. घाई असेल तर सरळ अनवाणी चालत जाऊ. हे सगळं करताना आपण इतरांना दोष देतो का? म्हणतो का आपल्याच वाटेल अशी चप्पल का यावी? इतरांच्या बऱ्या चपला तुटत नाहीत, माझीच बरी तुटली.

(Image :google)

कटकट न करता आपण सोल्यूशन शोधू. काहीच जमलं नाही तर चपलेला सेफ्टी पिन टोचून शक्य तेवढं पटकन चालत जाऊ.हे जर आपल्याला एका साध्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी करता येतं तर तेच लॉजिक आपण रोजच्या लहानमोठ्या समस्या सोडवतानाही लावू शकतो. विचार करु शकतो की एखाद्या लहानशा समस्येवर किती रडत बसायचं, स्वतःला किती छळायचं? इतरांना किती दोष द्यायचा? आणि प्रश्नाचा विचार करण्यापेक्षा सरळ उत्तर शोधायचं.

तोच तर फॉर्म्युला आहे. हेच उदाहरण आपल्या इतरही समस्यांना लावून बघायचं. स्वतःशी बोलायचं. काय बेस्ट उपाय असू शकतात, याची माहिती काढायची. आपल्या पुढ्यात येऊन पडलेल्या अडचणीच्या खेळाचे नियम समजून घ्यायचे. मग भिडायचं त्यांना, एकदम थेट. असं करत करतच आपल्या लहानमोठ्या प्रश्नांमधून आपले आपण मार्ग काढायला शिकू.

त्यासाठी खरंतर एकच मंत्र आहे, सोल्यूशनचा विचार करायचा प्रश्नांचाच विचार करत बसायचा नाही. अती विचार टाळून लहान लहान प्रश्न आपल्या हातात घेऊन ते सोडवून टाकायचे पटकन. करुन पाहा. 

टॅग्स :मानसिक आरोग्य