Join us  

स्वत:च्या मनाशी तुम्ही कधी बोलता का? कधी विचारलं स्वत:ला की मला नक्की काय हवंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:07 PM

सतत काळ्या ढगाच्या छायेत वावरणाऱ्या मनाला आपली इच्छा काय आहे, ते निर्विवादपणे सांगणे हे फार-फार आवश्यक असते.

ठळक मुद्देकोणतीही इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला विचारांची आणि कृतीची जोड द्यावी लागते. 

वंदना अत्रे

लखनौहून देहराडूनला रेल्वेने निघालेल्या अरुणीमा सिन्हाच्या गळ्यातील साखळी आणि सामान चोरण्याच्या इराद्याने तिघेजण डब्यात शिरले. सावध झालेल्या अरुणीमाने झटकन साखळी खेचली पण पुढे काय घडते आहे ते समजायच्या आत त्या तिघांनी तिला गाडीच्या डब्याबाहेर फेकून दिले होते ! वेगाने धावणारी गाडी रुळावर पडलेल्या अरुणीमाच्या पायावरून गेली आणि तिला आपला एक पाय गमवावा लागला.. ! ही घटना घडली १२ एप्रिल २०११ या दिवशी. त्यानंतर दोनच वर्षांनी, २१ मे २०१३ या दिवशी अरुणीमा जगातील सर्वोच्च शिखरावर, एव्हरेस्टवर होती. एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी ती पहिली भारतीय विकलांग महिला ठरली.सहजासहजी विश्वास बसू नये अशीच ही कथा. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करणारी अशी माणसे फक्त बातम्यांमध्येच नसतात. आपल्या अवतीभोवती सुद्धा कितीतरी दिसतातच की. या माणसांबद्दल आपण ऐकतो, वाचतो तेव्हा आपण काय विचार करतो? अप्राप्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवणाऱ्या या लोकांना देवत्व बहाल करून टाकतो आणि त्यांची पूजा करायला लागतो. हे फार सोपे असते. पण कधीतरी, काही प्रश्न स्वतःला विचारून बघितले तरअशक्य वाटणारी गोष्ट शक्य करणारी अशी काही वेगळी शक्ती असते का? असेल तर, काही विशेष माणसांनाच ती मिळालेली असते का? कोण करते या माणसांची निवड? आपल्यातही शक्ती आहे याचा शोध त्यांना कसा लागतो?

हे प्रश्न आपल्याला अशा एका टप्प्यावर आणतात जिथे, एकच खणखणीत उत्तर आपल्याला मिळते. स्वतःकडेच बोट दाखवणारे. लख्खकन प्रकाश पडावा तसे जाणवते, जी इच्छाशक्ती पुराणातील हनुमानात आणि आजच्या अरुणीमामध्ये आहे, इच्छाशक्तीचा तोच जोमदार प्रवाह आपल्या प्रत्येकात आहे. किंबहुना, या पृथ्वीतलावर राहणाऱ्या आपल्या प्रत्येकाला निसर्गाने इच्छाशक्तीचे एक अद्भुत वरदान दिले आहे. जे-जे असाध्य आणि अशक्य, ते साध्यकरण्यासाठी मदत करणारी शक्ती.. !- फक्त ही शक्ती देणाऱ्या निसर्गाचा चतुरपणा असा की, या इच्छाशक्तीला आपोआप कार्यरत करणारी, जागृत करणारी व्यवस्था मात्र आपल्या शरीरात नाही.. ! समोर असलेली परिस्थिती बघून जाणीवपूर्वक तिचा वापर करावा लागतो, तिला आवाहन करावे लागते ! अगदी सध्या सुरु असलेल्या कोरोनाचेच उदाहरण घेऊन सांगायचे तर काय करू शकतो आपण? आजारापासून दूर, निरोगी राहण्याची आपल्या सर्वांची इच्छा आहे पण मला निरोगी आणि सुदृढ राहायचेआहे या इच्छेचा रोज स्वतःशी उच्चार तरी आपण करतो? दिवसभरात आपल्या मनात भीतीचे, चिंतेचे,स्वतःच्या आरोग्याबद्दल शंका घेणारे असे कित्येक विचार येऊन गेलेले असतात. विशेषतः, अशाआव्हानांच्या काळात तर भय आणि काळजी या विचारांचा एक गडद काळा ढग सतत मनावर रेंगाळतअसतो. आपल्याला अस्वस्थ करीत असतो. सतत या काळ्या ढगाच्या छायेत वावरणाऱ्या मनाला आपलीइच्छा निर्विवादपणे सांगणे हे फार-फार आवश्यक असते. त्यामुळे दिवसातून किमान एकदा का होईना“आज मी निरोगी आणि सुदृढ आहे, आणि तसेच राहू इच्छितो / ते ” हे स्पष्टपणे स्वतःलाच सांगायला हवे..!त्याचा उच्चार करायला हवा.- अर्थात अशी केवळ इच्छा व्यक्त करणे म्हणजे इच्छाशक्ती जागृत करणेनाही. कोणत्याही इच्छेला प्रयत्नांची जोड नसेल तर ती इच्छा म्हणजे स्वप्नाचा बुडबुडा ठरू शकतो ! “ मीलता मंगेशकर इतके उत्तम गाते आहे ” अशी निव्वळ इच्छा करून कसे चालेल? त्यासाठी मला उत्तमाकडेनेणारा रियाझ करायला नको का? त्यामुळे कोणतीही इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला विचारांची आणिकृतीची जोड द्यावी लागते. 

जाता-जाता रिकामपणातील एक उद्योग

आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दल काहीतरी अशा इच्छा असतात ज्या प्रत्यक्षात येत नाहीत, येऊ शकत नाहीत. त्या जाणण्याची आत्ता संधी आहे.कशी? घरात जी कोणी माणसे आहेत त्या प्रत्येकाने स्वतःच्या इच्छांची आधी आपल्यापुरती यादीकरायची. त्यानंतर कुटुंबात जी कोणती सार्वजनिक जागा आहे ( अनेक कुटुंबांमध्ये असणारा व्हाईट बोर्डकिंवा पाटी ) त्यावर प्रत्येकाने आपल्या मनातील आजवर अपूर्ण राहिलेल्या दोन इच्छा लिहायच्या.घरातील सर्वांना त्या वाचता आल्या पाहिजेत. त्याने काय होईल? आपल्याच कुटुंबातील माणसांच्यामनातील, आजवर न कळलेल्या, अपूर्ण इच्छा तर कळतील ! त्यातून खूप काही घडू शकेल. काय?तुम्हीच विचार करा...

टॅग्स :मानसिक आरोग्यकोरोना वायरस बातम्या