Join us

दिल ढुंढता है फिर वहीं फुरसत के रात दिन!-हरवलेले ‘ते’ निवांत क्षण: सांगा...कसे शोधायचे ?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: July 16, 2025 16:57 IST

निवांत हा शब्द आपण सहज वापरतो, पण आयुष्यातून हरवलेला निवांतपणा किती जपतो याचा आढावा घेणारा हा स्व-संवाद!

>> ज्योत्स्ना गाडगीळ पंचमुखी 

कोणी विचारलं की, काय कसं चाललंय? आपण पटकन म्हणतो...'निवांत!' पण रोजची धावपळ पाहिली की प्रश्न पडतो, आपण निवांत आहोत का? सतत कसलातरी विचार, काहीतरी कृती, कोणाचीतरी चिंता हे निवांत क्षण आपल्यापासून हिरावून घेत आहे. 

खरं सांगायचं, तर टॉयलेट ही एकमेव निवांत जागा माणसाच्या आयुष्यात उरली होती. पण मोबाईलने तीही काबीज केली. लोक तिथेही तासन तास फोन बघत बसतात. इतर वेळेस पायाला आणि विचारांना नुसती भिंगरी लागलेली असते, अशात निवांत क्षण शोधायचे कसे आणि मिळालेच तर आपण त्याक्षणी काय करतो, यावरही निवांतपणे विचार करण्याची गरज आहे. 

परवा एक काका ऑफिसबाहेर दिसले. शांत बसून होते. कोणाचीतरी वाट बघत असतील असं वाटलं आणि मी मार्गी लागले. थोड्या वेळाने ऑफिस विंडोतून डोकावले तर काका तिथेच होते. त्यांच्या देहबोलीत कमालीची शांतता होती. निरखून पाहिलं, हातात एखादा मोबाईल, वृत्तपत्र...गेला बाजार तंबाखू तरी असेलच. पण यापैकी काही नसूनही काका निवांत बसले होते. एखादा विचार डोक्यात असणारच, पण त्या विचारांचं ओझं वा दडपण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. त्यांना पाहून त्याक्षणी मला निवांत क्षण व्यक्तिस्वरुपात भेटल्यासारखे वाटले. 

टीव्हीवर केबल सुरु होण्यापूर्वी हे निवांत क्षण आपण सर्वांनीच अनुभवले आहेत. कौटुंबिक मालिका, जाहिराती, वृत्तपत्रातल्या बातम्या, चित्रपटांची गाणी यापैकी कसलाही मारा आपल्यावर होत नव्हता. आवडते कार्यक्रम बघण्याच्या, ऐकण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या. जेवणं एकत्र व्हायची. आजी आजोबांची दिवेलागणीची वेळ ठरलेली असे. नाश्ता, जेवण यात अमुक एकच हवं हा हट्ट नव्हता. न मागता सगळं वेळच्या वेळी आई पुढ्यात आणून ठेवत होती. अभ्यासाचंही कधी दडपण आलं नाही, कारण आतासारखी जीवघेणी स्पर्धा नव्हती आणि बाबांनाही करिअरचा धोशा लावावा लागत नव्हता. शिक्षक विद्यार्थ्यांना 'बघून' घेत होते, सांभाळून घेत होते, त्यामुळे ट्युशनला जाण्याचा ट्रेंड नव्हता. कालपरत्वे सगळंच बदललं. काही मिळालं, तर काही हरवलं... त्या यादीत एक... निवांत क्षण!

आजकाल या निवांत क्षणांना 'Me Time' म्हणण्याचा प्रघात आहे. पण तो मिळाला तरी त्यातही आपण गाणी ऐकतो, रिल्स पाहतो, क्वचितच एखादं पुस्तक वाचतो, भटकंतीला गेलो तर सेल्फी  काढतो, रिल्स करतो, व्हिडीओ करतो आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करतो. लाईक, शेअर, कॉमेंट्सची वाट पाहतो. या भाऊगर्दीत हातात आलेले निवांत क्षण वाळूसारखे निसटून जातात. 

यासाठी अनेक जण मेडिटेशन करतात. ते चांगलंच आहे. विचार शून्यावर नेत श्वासावर लक्ष केंद्रित करणं सोपं नाही. तरी लोक सराव करतात. पण ती सुद्धा एक कृतीच आहे ना. मन एकाग्र करण्याची खटपट आहेच. त्याला निवांत पणाचं लेबल लावता येणार नाही. निवांत म्हणजे शब्दश: काहीही न करता शून्य विचारात जाणं तेही एफर्टलेसली...अवघड आहे ना? सद्यस्थितीत हा अवघड टास्क ठरेल. पण तो एकदा घेऊन पाहावा, यशस्वीपणे पूर्ण करावा. सुदैवाने आजही गावाकडची मंडळी या निवांत क्षणांचं वैभव टिकवून आहेत. ते मिळवण्याचा आपणही आपल्या परिने प्रयत्न करूया. 

चला तर, आज संध्याकाळी किंवा उद्या पहाटे चहाचा एक कप आणि काही निवांत क्षण शोधूया आणि जगूया!