Join us  

दिवाळीत घरातला पसारा आवरला, पण मनाचं काय? मन की सफाई केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2021 8:00 AM

दिवाळीत घर तर लख्ख करतो आपण, पण मनातला पसारा, तो कसा कधी आवरणार, आपण आपल्याचसाठी?

ठळक मुद्देसतत कशात ना कशात व्यस्त राहणं, शिकत राहणं याने आपलं मन स्वच्छ राहतं. मनातला सगळा पसारा आवरू शकतो. मग यंदाच्या दिवाळीत स्वच्छतेची ही सवय लावून घ्यायची का?

स्मिता पाटील

‘मैत्रिणींनो, कंटाळा आलाय गं, भेटूयात ना लवकर, मस्त नाइट आउट करूया.’ रमाने ग्रुपमध्ये लिहिलं. म्हणजे मस्त कुणाच्या तरी घरी जमून गप्पांमध्ये रात्र जागवून त्याच गप्पाळलेल्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मस्त गप्पा-खाणं असाच अर्थ; पण नाइट आउट म्हटलं की कसं भारदस्त वाटतं की नई? तर अशी गेट टुगेदरची चर्चा मैत्रिणींच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर सुरू होती. आधी नाइट आउटचा प्लॅन ठरत तो अनेक दिवस चर्चा होत होत कसाबसा ब्रेकफास्टच्या तडजोडीवर फायनल झाला. त्यातही अनेक जणींच्या अडचणी. या सगळ्या गोंधळात भेटायचा दिवस काही ठरायला तयार नव्हता. कुणाला दिवाळीच्या शॉपिंगला जायचं होतं, कुणाला घराची आवराआवर आणि साफसफाई करायची होती. काही जणींनी प्रोफेशनल मदत घेऊन ‘डीप क्लिनिंग’साठी वेळ ठरविली होती.

यानिमित्ताने मग सगळ्यांच्या बोलण्याची गाडी घरातला पसारा, मिनिमलिझम, साठवून ठेवण्याची सवय या सगळ्या विषयांकडे वळली. बाह्य जगातल्या पसाऱ्याचा आपण बायका कित्ती कित्ती विचार करतो नै? मग तो घरातला पसारा असो किंवा सगळ्या नात्यांचा- माणसांचा असो. आपल्या ‘आतल्या’ पसाऱ्याचं काय, किती काय काय साठवून असतो ना आपण ‘आत’? अनेक अपमानाच्या डागण्या, नैराश्याच्या जखमा, दुःखाचे प्रसंग, केलेले संघर्ष, विषय निघायचा अवकाश की खपली निघते आणि सगळं भळाभळा वाहायला लागतं. त्यात हार्मोनल गडबडी असतातच. मग तर काय विचारायलाच नको. मनाची अगदी युद्धभूमी तयार होते. लढायाच लढाया.यानं होतं काय तर आपलं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं, घराचं स्वास्थ्य बिघडतं आणि वर परत हिचं असलंच असतं नेहमी असंही ऐकून घ्यावं लागतं.मग आणखी वाईट वाटतं, चिडचिड होते. काय करायचं नेमकं या सगळ्या पसाऱ्याचं?काही जणांना सतत फक्त आणि फक्त प्रश्न उपस्थित करायची, सतत तेच तेच वर्षानुवर्षे उगाळत बसायची सवय असते. 

पण आवरायचाच जरा मनातला पसारा, तर काही गोष्टी करून पाहता येतील.

१. ..तर बाई गं, हे सगळं होतंय हे आधी शांतपणानं स्वीकारायचं. आपण माणूस आहोत आणि या सगळ्या भावना आपल्यात आहेत, त्यामुळे हे होणार हे आधी मान्य करायचं स्वतःशीच. याचा अर्थ हे सतत कुरवाळत बसायचं असं अजिबात नाही. आपल्याला कायम गाऱ्हाणी गायची आहेत की ती ओलांडून पुढे जायचंय, मग त्यासाठी प्रयत्न करायची तयारी आहे का, हे स्वतःला विचारायला हवंय. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या समस्याही असणार आहेत. त्याकडे आपण समस्या म्हणून बघणार की असलेली परिस्थिती सुधारण्याची, बदलवण्याची संधी म्हणून बघणार आहोत, हे तपासायला हवंय.२. कुठलीही आता आहे ती परिस्थिती आपण ठरवलं तर नक्कीच बदलू शकते, माणसं बदलू शकतात. गरज असते ती आपला ‘नजरिया’ बदलण्याची. काही काही वेळा खूप प्रयत्न करूनसुद्धा काही उपयोग होत नसतो, अशा वेळेस कुठलाही गिल्ट मनात न घेता माणसांना शांतपणे बाजूला सारून पुढे जाता आलं पाहिजे. आपण आपल्या परीने प्रयत्न केले; पण नाही काही झालं, माणसं बदलली नाहीत हेही स्वीकारता आलं पाहिजे. सगळ्याच माणसांशी आपलं नाही जमत, सगळ्यांनाच आपण आवडत असणार असं नसतं, त्यामुळे त्यांच्या खटकलेल्या गोष्टी सोडून देणं शिकलं पाहिजे. त्या व्यक्तींमधलं जे चांगलं आहे ते घेऊन पुढे जाता आलं पाहिजे.३. कृतज्ञता मनात असणं, हेही फार फार महत्त्वाचं. जे आपल्याजवळ नाहीये, मिळालं नाहीये यानं कुढत-रडत बसण्यापेक्षा जे आहे ते लिहून काढणं, त्याची जाणीव मनात सतत तेवती असणं यांनी पण मनातला नकारात्मक पसारा पुष्कळ पुष्कळ कमी होतो. आपल्याकडे असणाऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टींची यादी आपण लिहायला लागलो, की अनेक अनेक चांगल्या गोष्टी दिसायला लागतात आणि लक्षात येतं, की अरेच्या, इतरांपेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत की आपल्या आयुष्यात. मग तगमग कमी होते.४. सतत इतरांशी तुलना करून असमाधानी असण्यापेक्षा आपल्याकडे पण भरपूर गोष्टी चांगल्या आहेत, ज्या इतरांकडे नसू शकतात याचा विचार करायला हवा.आणखी एक महत्त्वाचं म्हणजे रिकामं मन सैतानाचं घर असं म्हणतात. अगदी खरंय हे. आयुष्याला काहीतरी ध्येय नक्की पाहिजे. ते फार मोठं असलं पाहिजे असं नाही. अगदी छोटं छोटं पण ते ठरवू शकतो. आज मस्त आवरून बाहेर जायचंय, छान पदार्थ तयार करायचाय असंही आणि आपल्या उरलेल्या वेळेत समाजातल्या कुणासाठी तरी काहीतरी कृती करणं, मदत करणं असंही असू शकतं. ही यादी आपण वाढवत नेऊ शकतो. निरपेक्ष भावनेनं कुणासाठी तरी काहीतरी करणं हे फार मोलाचं आहे. सतत कशात ना कशात व्यस्त राहणं, शिकत राहणं याने आपलं मन स्वच्छ राहतं. मनातला सगळा पसारा आवरू शकतो. मग यंदाच्या दिवाळीत स्वच्छतेची ही सवय लावून घ्यायची का?(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)smita.patilv@gmail.com

टॅग्स :मानसिक आरोग्यदिवाळी 2021