Matching the world's attention with military training | लष्करी प्रशिक्षण घेऊन जगाचं लक्ष वेधणार्‍या अर्मेनियाच्या अन्ना हॅकोब्यान

लष्करी प्रशिक्षण घेऊन जगाचं लक्ष वेधणार्‍या अर्मेनियाच्या अन्ना हॅकोब्यान

 

-शिल्पा दातार-जोशी

४२ वर्षीय अन्ना हॅकोब्यान. अर्मेनिया देशाच्या (पश्चिम आशिया आणि युरोपातील कॉकेशस भागातील एक पर्वतीय देश) प्रथम महिला. म्हणजे पंतप्रधान निकोल पाशिनियन यांच्या पत्नी. यांचं नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे ते त्यांनी केलेल्या युद्ध सरावामुळे. इतकंच नाहीतर त्यांनी अर्मेनियात महिलांची लष्करी फळीही तयार केली आहे. अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात युद्ध सुरू आहे.

महिलांना लष्करी प्रशिक्षण घेण्याचं आवाहन अन्ना करत आहेत. गरज पडली तर युद्धात जायला तयार व्हा, असं त्या सांगतात. अर्मेनियाच्या फर्स्ट लेडी एवढीच अन्ना हॅकोब्यान यांची ओळख नाही. त्या धडाडीच्या पत्रकार आहेत. ‘अर्मेनियन टाइम्स’ वृत्तपत्राच्या मुख्य संपादक आहेत. सुरुवातीला अन्ना यांनी समाजमाध्यमांवरून अझरबैजानला शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. युद्ध टाळा अशीच त्यांची भूमिका होती, मात्र युद्ध झालंच.

तत्पूर्वी २०१८ साली अर्मेनियामध्ये झालेल्या वेलवेट क्रांतीमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तत्कालीन सरकारविरोधातील शांतता आंदोलनात अन्ना यांच्याबरोबर त्यांचे पती सध्याचे पंतप्रधान निकोल नाशिनयन सहभागी होते. त्यानंतर ८ मे २०१८ रोजी निकोल पंतप्रधान झाले आणि अन्ना फर्स्ट लेडी. त्यांनी चालवलेली वेलवेट चळवळ म्हणजे अर्मेनियामधील सकारात्मक बदलाची सुरुवात म्हणावी लागेल. कौटुंबिक हिंसा, गर्भजलपरीक्षा करून भ्रुणाची हत्या, या गोष्टी अर्मेनियाला नवीन नव्हत्या. महिला हक्कांच्या बाबतीत अर्मेनियाचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. आताही अन्ना वेगवगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होतात. शांततेनं तोडगा निघत नसेल तर आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याचं कामही त्या करतात.

शिक्षणाचा प्रसार यासाठी त्या काम करत असून, अन्ना या त्यांचं बलस्थान आहे. अन्ना यांना बाहुल्या खूप आवडतात. त्यांच्याकडे बाहुल्यांचा मोठा संग्रह आहे. त्यामुळे सध्या अर्मेनियात अन्ना यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी बाहुली हे प्रतीक झालंय. अन्ना हॅकोब्यान यांना शांतता हवी आहे; पण तरीही समोरील देश जर युद्धखोरीच करत असेल तर आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी महिलांनीही रणभूमीवर आपलं कर्तृत्व दाखवण्याची गरज आहे, असं त्यांचं मत आहे; पण त्या केवळ भाषण देऊन थांबल्या नाहीत तर स्वतः सैनिकांबरोबर युद्धात सहभाग घेण्याची त्यांनी तयारी दाखवली. त्यामुळेच १३ महिलांच्या पथकाबरोबर त्यांनी रायफल चालवण्याबरोबरच अत्याधुनिक शस्रास्राचं प्रशिक्षणही घेतलं. त्यांच्या नेतृत्वाकडे आता जगाचं लक्ष आहे.

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

shilpapankaj@gmail.com

 

Web Title: Matching the world's attention with military training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.