Life in Housing society in mumbai, pune during lockdown | कोरोना काळातला सहनिवास

कोरोना काळातला सहनिवास

- मृण्मयी रानडे

  हाउसिंग सोसायटीला मराठीत अगदी चपखल शब्द आहे सहनिवास. मार्चच्या तिस-या आठवडय़ात देशभर टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर असे अनेक सहनिवास या अर्थाला जागले आणि त्यांनी त्यांच्या सदस्यांना कमीत कमी त्रस कसा होईल याची काळजी घेतली. काही गृह संकुलांनी खूप कडक नियमावली लागू केली, बाहेरून येणा:यांना  त्रास होईल अशा पद्धतीनं आडकाठी केली, आदी अनुभवही वाचायला/ऐकायला मिळाले. परंतु सकारात्मक वृत्तीनं या कठीण काळात एकमेका साह्य करू हा सहकाराचा मंत्र जागविणा -यांचे अनुभव अधिक मोलाचे, त्यांच्यापासून सगळ्यांनाच काही शिकण्याजोगं मिळेल याची खात्री.
मुंबईतील माहीमच्या मकरंद सहनिवासातील व्यवस्थापन समितीनं मुद्दाम बैठक वगैरे घेऊन काही निर्णय घेतले असं नाही. सहनिवासाचे सचिव   कमलेश काणोकर सांगतात, ‘टाळेबंदीनंतरही लोक सकाळ - संध्याकाळ फिरायला खाली येत राहिले, आम्ही त्याला आक्षेप घेतला नाही. आम्ही बाहेरचे अनुभव पाहत वाचत होतो. आमची मित्रमंडळी सांगत होती. काही जणांनी तर आधीपासूनच इमारतींच्या आवारात लॉकडाऊन आपणहूनच केला होता, लोकांना त्यात काहीसा अभिमान वाटत होता जणू. साधारण आठवडय़ानं समितीनं ठरवलं की, लोकांना फिरू दे, त्यांचं मानसिक  आणि शारीरिक स्वास्थ्य नीट राहणं आवश्यक आहे.’ 125 सदस्य असलेल्या या सहनिवासात काही डॉक्टर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही नियम ठरवण्यात आले. तसंच कितीही काळजी घेतली तरी एखाद्या वेळी आणीबाणीची परिस्थिती येऊ शकते या दृष्टीनं दहा पीपीई आणून ठेवले. कारण आपल्या शेजारी राहणा -यां व्यक्तीला मदत करायची नाही, हा पर्यायच नव्हता ! समितीनं या काळात आठवडय़ातून दोनदा भाजी, फळं, आंबे, खाद्यपदार्थ मागवायची सोय केली. तसंच सगळ्यांची यादी घेऊन वाणसामानही एकत्र एकाचवेळी दादरहून आणलं. सहनिवासात 3क् ज्येष्ठ नागरिक एकेकटे राहणारे आहेत, त्यांची काहीही गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिलं.
मदतनीस बायकांना बोलवायचं की नाही यावरून सध्या अनेक ठिकाणी वाद सुरू आहेत. सरकारनं काहीतरी स्पष्ट सांगावं, अशी अनेकांची मागणी आहे. यावर काणोकर म्हणतात, ‘हा काही मुखमंत्र्यांनी लक्ष घालावा असा प्रश्नच नाही. त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं लाजिरवाणं आहे. जबाबदारी घ्यायची आपल्या लोकांना सवयच नाही, ही मोठी अडचण आहे.’ 
ठाण्याच्या एका सोसायटीचे सचिव नितीन थत्ते सांगतात, ‘सुरुवातीपासून प्रवेशदारापाशी येणा:या लोकांना हात स्वच्छ धुण्यासाठी साबण पाणी, सॅनिटायझर ठेवलं होतं. सुरक्षारक्षकांनी यात खूप मदत केली. त्यांना समितीनं काही आर्थिक मदतही केली. 10 जूनपासून मदतनीस बायकांना यायला परवानगी दिली आहे. एका लहान बाळाला आंघोळ घालायला बाई यायच्या, त्यांनाही अगदी सुरुवातीपासून येऊ दिलं कारण त्या घरचे लोकच त्यांची नीट काळजी घेत होते!
ठाण्याच्या या  सोसायटीत 185 सदस्य आहेत.


पुण्यातल्या बावधन येथील एका सोसायटीचे सचिव प्रसाद शिरगावकर यांचाही या काळातला अनुभव चांगला आहे. सगळ्या सदस्यांनी खूप सहकार्य केलं, कोणीच नियम मोडले नाहीत. एका भाडेकरूनं मास्क न घालता फिरण्याचा प्रकार केला त्याला पोलिसांकडे नेण्याची धमकी द्यावी लागली, हा एकमेव अनुभव. मात्र खाली फिरण्यावर बंदी होती कारण ज्येष्ठ नागरिकांनीच तशी मागणी केली होती. मदतनीस बायकाही ज्यांना हव्या त्यांनी बोलवाव्या, फक्त वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन यावं, असं ठरवलं होतं. तसंच प्रवेशदारापाशीच सॅनिटायझर आहेत, रोज प्रत्येक येणा:या व्यक्तीचं तापमान मोजलं जातं. सदस्यांच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर भाज्या, फळं, ताजी मासळी असं मागवलं जातंय, त्यामुळे सगळेच सदस्य खूश आहेत, असं शिरगावकर सांगत होते. सुरुवातीपासून इलेक्ट्रिशिअन,  प्लंबर आणि ब्रॉडबॅण्ड दुरुस्ती करणा-यांना प्रवेश खुला ठेवला होता कारण या समस्या तातडीनं सुटणं आवश्यक होतं. हे सगळं वाचल्यावर वाटू शकतं की, किती सोपं आहे सगळं; परंतु जे अशा समितीवर काम करतात त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे की, हे प्रत्यक्षात जमवून आणणं किती कठीण आहे. सदस्यांकडून सहकार्य मिळणं आवश्यक आहेच; पण समितीनं काही ठोस दिशा दाखवणंही तितकंच गरजेचं. कमलेश काणोकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, ‘हे सगळं आम्ही का घडवू शकलो? पूर्वजांची देणगी ! गेल्या 56 वर्षात खूप प्रेमानं आणि रुचीनं आमच्या आईवडिलांनी हा सहनिवास उभा केला. त्यातील अनेक काळाच्या पडद्याआड गेले. अनेक अजून आमच्यासोबत आहेत, आमचे आदरणीय ज्येष्ठ नागरिक. त्यांनी आम्हाला सहकाराचा, शेजारधर्म पालनाचा अमूल्य वारसा दिला आहे. आमच्याकडे 125 कुटुंबांतले 
सगळे एकमेकांना ओळखतात. त्यातून आमचं सहजीवनाचं नातं फुलत गेलं आहे. आता तुम्ही विचाराल की, पूर्वजांच्या देणगीशिवाय, 56 वर्षाच्या तपश्चर्येअभावी असा सहनिवास कसा साध्य होणार? या प्रश्नालाही उत्तर आहे. आमच्याकडे रहिवासी भांडले तरी पुन्हा एकत्र  येतात. एवढं तर लहान मुलांनाही जमतं ! सहनिवास, सहजीवन ही आपली प्राथमिक गरज आहे. भावनिक आणि व्यावहारिकसुद्धा. तेव्हा नवीन संकुलांना, सोसायटय़ांना हे का जमू नये? एकदिलानं जगणारा समुदाय तयार करावा लागतो. त्याकरता वेळेची गुंतवणूक करावी लागते. आमच्या पिढीला, आमच्या सोसायटीतल्या भावी पिढय़ांना सहनिवासात वेळ गुंतवावा लागेल. नाही तर भावी काळातल्या संकटांना हसतमुखानं आणि कणखरपणो सामोरं जाता येणार नाही. 
सहनिवास उभारण्यात केलेली वेळेची गुंतवणूक किती भरभरून परतावा देते, हे आम्ही कोविडकाळात अनुभवत आहोत.’ 
- कोविड काळातच नव्हे तर एरवीही हे साधलं तर सगळ्यांचं जीवन सुखी होईल यात काय शंका?(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

mrinmayee22@gmail.com
 

Web Title: Life in Housing society in mumbai, pune during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.