Lessons in the COVID situation that makes women stand on their own feet | स्वत:च्या पायावर उभे करणारे कोरोनाकाळचे धडे

स्वत:च्या पायावर उभे करणारे कोरोनाकाळचे धडे

- प्रगती जाधव-पाटील

कोरोनाकाळाने परीक्षा पाहिलीच, पण वाईटातून काही चांगलेही होऊ शकते हेही याच काळाने पुन्हा अधोरेखित केले. महामारीच्या या काळात घरातल्या कर्त्या पुरुषाची नोकरी गेल्यानंतर देशभरात सर्वत्रच महिलांनी छोटे-मोठे उद्योग करत संसार तारले. एक साधे उदाहरण म्हणजे देशातील २७ राज्यांमध्ये २० हजार महिला बचत गटांनी १९ दक्षलक्ष मास्क तयार करून कोरोना योद्धा होण्याचा मान मिळविला. केरळमध्ये कुडुंबश्री नेटवर्कने देशातील स्त्रियांचे सर्वांत पहिले सामुदायिक स्वयंपाकघर सुरू केले. याबरोबरच परिसरात असलेल्या वयस्कांना मदत करणे, त्यांना औषधे पोहोचवणे आणि जेवणाची सोय करण्यातही बचत गटांनी पुढाकार घेतला.

लॉकडाऊनदरम्यान शहरांमध्ये एकटे राहणाऱ्या पेन्शनरांचे खूप हाल झाले. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याबरोबरच नियमित औषधे घेण्यासाठी त्यांना बँकांपर्यंत पोहोचणेही मुश्कील झाले. ज्येष्ठ, अपंग आणि अन्य गरजूंसाठी महिला बचत गट एक महत्त्वपूर्ण संसाधन म्हणून उदयास आले आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून समजल्या जाणाऱ्या बँक सख्यांनी पेन्शन वितरित करण्याबरोबरच अत्यंत गरजू लोकांना हस्तांतरणाद्वारे थेट लाभ (डीबीटी) त्यांच्या खात्यात जमा करण्याची सुविधाही पुरविली. त्यामुळे बँक खातेदार आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचा दुवा या महिला बनल्या. अन्न पुरवणे, बँकेची सेवा देणे, मास्क, सॅनिटायझर बनवणारे बचत गट अनेक ठिकाणी खास स्त्रियांसाठी हेल्पडेस्क चालवत आहेत. लॉकडाऊनच्या काळात आलेला ताण, अस्तित्वाची वाटणारी भीती, दिवसभर घरात असल्याने होणारी कुचंबणा याविषयी लाखो महिला या हेल्प डेस्कशी जोडल्या गेल्या आहेत.

व्यक्तिगत पातळीवरही काहीजणींनी आपापल्या लढाया लढल्याच. त्यातली ही काही उदाहरणे. आर्किटेक्ट असलेली साताऱ्यातली तेजश्री. मात्र, माहेरी कपड्यांचा व्यवसाय असल्याने एकदा वडिलांशी बोलताना तिला वाटले की, आपणही कपडे व्यवसाय करावा. वडिलांना व्यावसायिक गुरू करून अवघ्या दहा हजाराच्या भांडवलात तिने लॉकडाऊनच्या आधी घरगुती स्वरूपात हा व्यवसाय सुरू केला. अवघ्या आठ दिवसांत हा माल संपल्यानंतर तिने आणखी माल मागविला आणि लॉकडाऊन जाहीर झाला. या काळात खासगी ठिकाणी नोकरीत असणाऱ्या तिच्या पतीचा पगारही तीस टक्क्यांनी कापण्यात आला. संसारिक जबाबदारी सांभाळताना आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता लक्षात घेऊन तिने ऑनलाइन व्यवसाय अधिक जोरकसपणे सुरू केला. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत तिने तब्बल दोन लाखांचे नाईट ड्रेस विकले. पुणे आणि मुंबईसह अन्य मोठ्या शहरांतून साताऱ्यात लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेले अनेकजण तिचे कायमस्वरूपी ग्राहक झाले. ती म्हणते, ‘लॉकडाऊनच्या दिवसांत पैसे कमविण्याची संधी होती, पण तात्पुरते पैसे कमविण्यापेक्षा ग्राहक सेवा अधिक महत्त्वाची मानून योग्य दरात कपड्यांची विक्री करण्याचे ठरवलं आणि व्यावसाय वाढत गेला.’

अवघ्या बारावीतून शिक्षण सोडलेल्या सरिता बाबर यांचे पती औद्योगिक वसाहतीत साप्ताहिक रोजावर कार्यरत होते. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांची नोकरी सुटली. मुलांच्या शिक्षणासाठी गाठीशी असलेले पैसे संपल्यानंतर पुढे काय करायचे असा विचार करून त्यांनी महानगरांमधील आपल्या नातेवाइकांना संपर्क साधून सांडगे, चटणी आणि पापड करून देणार असल्याचे सांगितले. नातेवाइकांनी स्वत:सह इतरांचीही ऑर्डर त्यांना मिळवून दिली. लॉकडाऊन शिथिल झाले की, पार्सल पाठवून त्यांनी माल ग्राहकांपर्यंत पोहोचवला. एक छोटा स्वत:चा व्यवसायही त्यातून त्यांनी उभा केला.

तेजश्री आणि सरिता ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. कठीण काळात महिला उमेदीने उभ्या राहतात. मार्ग काढतात. तेच कोरोनाकाळातही अनेकींनी केले.

जगण्याची उमेद पेरणाऱ्या या छोट्या प्रयत्नांचं म्हणूनच कौतुक करायला हवं.

(लेखिका ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीत उपसंपादक म्हणून कार्यरत आहे.)

pragatipatil26@gmail.com

Web Title: Lessons in the COVID situation that makes women stand on their own feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.