Leap of self-help groups.. | बचत गटांचीअँमेझॉन झेप

बचत गटांचीअँमेझॉन झेप

-प्रगती जाधव-पाटील

लोणचं, सांडगे, पापड या पारंपरिक चक्रातून बाहेर पडून महिला बचत गट   लोकल टू ग्लोबलची वाट धरतायत. बाल्यावस्थेत असलेल्या या  वाटेला आता शासकीय पाठबळही मिळालंय. गरज आहे ती पारंपरिकतेला आधुनिकतेचा परीसस्पर्श देऊन उत्पादनं सातासमुद्रापार पोहोचवायची. चाणाक्ष महिला गुणवत्ता आणि सातत्याच्या जोरावर हेही सहज साध्य   करतील, असा विश्वास यंत्रणोला आहे.
महिला बचतगटांची उत्पादनं विकण्याची हमखास जागा म्हणजे आठवडा बाजार, प्रदर्शनं, छोटे-मोठे मॉल्स किंवा विक्री प्रदर्शनं! कोरोनाच्या       प्रादुर्भावानं महिलांच्या हक्काच्या बाजारपेठा बंद झाल्या आणि उत्पादित  मालाच्या विक्रीचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला!   ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नत अभियाना’च्या वतीनं महिलांनी तयार केलेल्या 33   उत्पादनांना अँमोझोन आणि  जीईएम याची जागतिक बाजातपेठ उपलब्ध करून आर्थिक सबलकीरणासाठी आश्वासक पाऊल टाकलं आहे.
कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्यानं त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तूंपासून वंचित राहावं लागलं होतं.  घरगुती स्वरु पात वस्तू तयार करून आर्थिक स्वावलंबी होण्याचा मार्ग स्वीकारून स्वत:चे ग्राहक तयार करणारी ही यंत्रणा  कोविड 19 काळात चांगलीच अडचणीत आली होती. आपापल्यापरीनं   महिलांनी उत्पादनं विक्रीसाठी सोशल मीडियाचा वापर केला; पण तो तितकासा व्यापक ठरला नाही. मार्च ते मे या दरम्यान दरवर्षी तयार करण्यात आलेल्या कुरड्या, सांडगे, हळद, पापड, चटणी, लोणचे यांची यादी भली मोठी होती. वस्तू तयार करून ठेवलेल्या गटांना पुढील माल तयार करण्यासाठी भांडवल न मिळाल्यानं वर्षानुवर्षे सुरू असलेले अर्थचक्र अडकलं. ना नफा ना तोटा तत्त्वावर माल विक्री करणं हा पर्याय बचतगटांनी निवडला; पण आधीच महामारीचं संकट त्यात नफा न मिळाल्यानं आर्थिक गणितंच बिघडली.
महिलांच्या मालाची व्याप्ती लक्षात घेता, त्यांना मोठा ग्राहक मिळावा, या उद्देशानं   ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नत अभियाना’तर्गत बचतगटांची    उत्पादनं ही अँमेझॉन आणि ‘जीईएम’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना         त्यांच्या वस्तू सुलभरीत्या घरपोच मिळणार आहेत.

ऑनलाइन व्यवसायाची संधी मोठी आणि व्यापक आहे. त्यासोबतच नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी उत्पादकांना सज्ज राहावं लागणार आहे.  उत्पादकानं पोस्ट केलेल्या फोटोच्या आधारेच ग्राहकाला ही वस्तू आकर्षित करणार आहे.  त्यामुळे महिला बचत गटांना वस्तूच्या गुणवत्तेबरोबरच त्याच्या मांडणीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. विविध प्रकारचे फोटो काढताना त्यात उत्पादित मालाचण वेगळेपण ठसठशीतपणे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी नवनवीन कल्पना घेऊन महिलांना या ऑनलाइन व्यवसायात उतरावं लागणार आहे. पारंपरिक वस्तूंना आधुनिक स्वरु प देऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ऑनलाईन मार्केटमध्ये झुंबड आहे, त्यामुळे गुणवत्तेबरोबरच मार्केटिंगसाठी उपयुक्त कल्पनाही त्यांना लढवायला लागणार आहेत.


भारतात प्रत्येकाच्या हातात पॉकेट इंटरनेट आलं तसा सामान्य ग्राहकाकडून  इंटरनेटचा वापरही वाढला. इंटरनेटवरून माहिती मिळविण्यापासून ते थेट कपडे, धान्य, भाजीपाला इंटरनेटवरून ऑनलाइन खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. तशा विविध कंपन्यांनी आपलं ऑनलाइन जाळं विणण्यास     सुरु वात केली. याच स्पर्धेत आता महिला बचत गटही मागे नसून त्यांनीही आपली  उत्पादनं अँमेझॉन या सेलिंग अँपवर उपलब्ध करून  ‘ऑनलाइन’ विकण्यास सुरु वात केली आहे. बचतगटांची सुमारे 200 उत्पादनं  अँमेझॉन’वर आहेत. पहिल्या टप्प्यात 25 टक्के  उत्पादनांची विक्रीही झाली आहे.
मध्यमवयीन आणि ज्येष्ठांच्या तुलनेत ऑनलाइन खरेदीसाठी महिला आणि तरु णाईची गर्दी अधिक असते. त्यामुळे ग्राहक ओळखून त्यांच्या पसंतीचे    उत्पादन ऑनलाइन उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. पारंपरिक वस्तूंना मागणी असली तरीही त्याचा नवा बाज ग्राहकांना अधिक प्रिय आहे. ते ओळखून त्यात आवश्यक बदल करणं हे महिलांपुढील मोठं आव्हान असणार आहे. ऑनलाइन खरेदी करणारा ग्राहक कोणतंही उत्पादन आधी नजरेनं बघतो, त्यानंतर त्याच्या उपयुक्ततेबरोबरच किंमतीचा विचार करून मग खरेदीचा विचार करतो. ग्राहकाच्या डोक्यात हा विचार सुरू असताना  उत्तम मांडणी आणि आकर्षक रंगसंगती अधिक सरस ठरते. बचत गटातील महिलांनी आपली उत्पादनं विकताना मोबाइल हाती असलेल्या ग्राहकांच्या मेंदूचा हा अभ्यास करणंही क्र मप्राप्त आहे.

------------------------------------

 

अँमेझॉनवरील बचत गटांची उत्पादनं
प्रायोगिक तत्त्वावर कागदी बॅग्स आणि टेराकोटा दागिने अशा दोन  उत्पादनांची नोंदणी या संकेस्थळावर करण्यात आली होती. याला  मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता 33 उत्कृष्ट् उत्पादनांची या संकेस्थळांवर नोंदणी करण्याचे ठरले. वर्धा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची नोंदणी अँमेझॉन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. अॅमेझॉनवर सध्या 33उत्पादनं अपलोड केली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे पापड (8 प्रकार), पेपर बॅग (4 प्रकार), टेराकोटा ज्वेलरी (4प्रकार), सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले (4 प्रकार), रेशमी ज्वेलरी (6 प्रकार), शेवई, मुंगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क 8 प्रकार) यांचा समावेश आहे.

--------------------------------------------------------------------

या महिन्यात पडणार आणखी वस्तूंची भर

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात उपलब्ध असणा-या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू बचत गटांच्या माध्यमातून जगभर पोहोचाव्यात या उद्देशानं उन्नत अभियानाचे काम सुरू आहे. कोल्हापुरी चप्पल, गोंदिया भागातील बांबू पेंटिंग, जळगावच्या कॉपर बॉटल, बंजारा भागातील वॉल हँगिंग, कोकणातील काजू, सातारा-सांगलीकडचे मसाले आदी सुमारे 60 वस्तू बचतगटांच्या   माध्यमातून अँमेझॉनवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी   विभागवार प्रशिक्षण देण्याचंही काम सुरू आहे.

-------------------------------------------------------------------------------------------

प्रायोगिक तत्त्वावर वर्धा उत्तम
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देण्याच्या उद्देशानं महिलांचं प्रशिक्षण घेऊन, उत्पादित माल अँमेझॉनवर अपलोड करण्यात आले. सुमारे 35टक्के महिलांना यासाठी प्रशिक्षित करण्यात आलं. त्या सर्वच महिलांनी आपली उत्पादनं अपलोड करून ग्राहकांची उत्तम पसंतीही मिळवली. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्र म वर्ध्यात यशस्वीपणे  राबविण्यात आला.

----------------------------------------------------------------------------------------------------------

ऑनलाईनसाठी हे आवश्यकच.

राज्यातील अनेक बचत गटांना प्रशिक्षण देऊन या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासाठी बचत गटांकडे स्वतंत्र जीएसटी नंबर आणि पॅनकार्ड असणं आवश्यक आहे. खाद्य पदार्थ उत्पादित करणा-या गटांना भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरणाचं प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे.


(प्रगती सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे)
pragatipatil26@gmail.com

 

Web Title: Leap of self-help groups..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.