Languages, mathematics and science can be taught in simple ways. How? | भाषा, गणित, विज्ञान हे सोप्या पध्दतीनंही शिकवता येतं..ते कसं?
भाषा, गणित, विज्ञान हे सोप्या पध्दतीनंही शिकवता येतं..ते कसं?


-रती भोसेकर 

वर्ग म्हटला की जसं मुलं आणि शिक्षक असं डोळ्यासमोर येतं, तसंच कृतीयुक्त शिक्षण किंवा रचनावादी वर्ग म्हटलं की डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे भरपूर शैक्षणिक साहित्य. यामध्ये लादीवर कल्पक रचना काढलेल्या असतात किंवा विविध साहित्यानं भरलेले शैक्षणिक ट्रे असतात. ज्यांचा  उपयोग करु न मुलं वेगवेगळ्या संकल्पना समजून घेतात. स्वत:च्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. मुलांनी जे शिकायचं अपेक्षित आहे, त्यासाठी कोणतं साहित्य तयार करायचं, तसंच त्यांचा नेमका वापर कसा करायचा याचं संपूर्ण नियोजन शिक्षकवर्ग अभ्यासपूर्ण रितीनं करत असतात. काही शिक्षकांचा हा शैक्षणिक साहित्य निर्मितीचा अभ्यास कधी कधी खरोखरीच अंचबित करणारा असतो तर काही शिक्षकांची कल्पनाशक्ती अफाट असते. मी एका शाळेत गेले होते,  तिथले एक शिक्षक दुसरीचं संपूर्ण गणित मुलांना फक्त दहा दगड वापरु न शिकवत होते. त्यामुळे नेहमीच शिक्षक आणि साहित्य निर्मिती हे एक घट्ट नातं आहे आणि तसं असणंही अपेक्षित आहे. शैक्षणिक साहित्य हे अनुभवाधारित शिक्षणाचा गाभा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या शैक्षणिक  साहित्यनिर्मितीसाठी कधी पुठ्ठे, रंगीत कागद, रंगीबेरंगी चित्र असे आकर्षक साहित्य वापरलेलं असतं. पूर्व प्राथमिक वर्गात हे पुठ्ठे, चित्रं वगैरे वापरु न वेगवेगळ्या प्राण्याची, पक्षांची, भाज्यांची, फुलांची चित्रकार्ड आणि नावांची कार्ड तयार करु न परिसराची ओळख करु न दिली जाते. भाषेसाठी तर शैक्षणिक पुठ्ठ्यांच्या कार्डखेळांची लयलूटच असते. तर कधी या साहित्य निर्मितीसाठी आजूबाजूला उपलब्ध होणारं साहित्य जसं चिंचोके, बारीक दगड, वाळलेली पानं, फुलं, बिट्ट्या याचा वापर केलेला असतो. बहुधा गणितासाठी या साहित्याचे ट्रे तयार केले जातात. एकंदरीत भाषा, गणित, परिसर विकास आणि विविध संकल्पना परिचयानिमित्त मुलांसाठी नवनवीन शैक्षणिक साधनं तयार करणं; हा प्रत्येक कृतीशील शिक्षकाचा अविभाज्य भागच आहे आणि ते  तो अत्यंत आवडीनं करतं असतो. हे शैक्षणिक साहित्य प्रत्येक शिक्षकाचा अनमोल खजिनाच असतो आणि हा खजिना तो जीवापाड जपत असतो. सगळ्यांना अभिमानानं दाखवत असतो. 
या पाश्र्वमीवर सहज शिक्षण वर्गामध्ये मात्र मुलांच्या शिकण्यासाठी किंवा   त्यांच्या कामासाठी वापरायच्या  साधनांविषयी भूमिका अत्यंत वेगळी आहे. या वर्गात शैक्षणिक साधन निर्मितीला अजिबातच थारा नाही. किंबहुना या वर्गाचा पहिला नियम जसा शिक्षकांनी अजिबात सूचना द्यायच्या नाहीत आणि गरज   भासेल तिथेच बोलायचं हा आहे, तसा अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे   मुलांना बाजारातील कुठलीही तयार खेळणी, शैक्षणिक किंवा इतर खेळणी द्यायची नाहीत. पहिल्या नियमाबाबत मला तो पाळायला जड आहे असा अंदाज आला नव्हता. पण हा दुसरा नियम ऐकल्याबरोबरच त्याचं पालन करणं अशक्य कोटीतील गोष्ट वाटत होती. त्यामागचं एक कारण म्हणजे प्रत्येक संकल्पना  मुलांना स्पष्ट होण्यासाठी सतत साहित्य निर्मितीची सवय जडलेली होती हे तर होतंच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे, मग नेमकं काय साहित्य  मुलांसमोर ठेवायचं किंवा मुलांना द्यायचं, याबाबत संभ्रम होता. मुलं काय करतील, कशाव्दारे आपल्या ज्ञानाची रचना करतील, तसचं जर रंगीबेरंगी असं छान आकर्षक साहित्य मुलांसमोर नसेल, तर ते कशाला हात तरी लावतील का, त्याच्याबद्दल त्यांना उत्सुकता तरी वाटेल का, असे अनेक प्रश्न पडायला लागले. 
पण  हळूहळू असं लक्षात यायला लागलं की वरचे माङो सगळे प्रश्न निर्थक आहेत. मुलांच्या अन्वेषण प्रक्रि येसाठी वेगवेगळे साहित्य जमवणं  हे शैक्षणिक साहित्य निर्मितीपेक्षा जास्त अभिनव आणि आव्हानात्मक आहे. मुलांच्या आणि माझ्या विचारांना, मेंदूला भरपूर खाद्य देणारं आहे. तसंच ते खूप सोपं पण आहे. मला आठवतं पहिल्या आठवड्यात तर माङयाकडे काहीच नव्हतं. पण मुलांना आता काय देऊन आपलं आणि  त्यांच काम सुरु  करायचं, हा प्रश्न मला अगदी पहिल्या दिवशीही पडला नाही. पण याचं श्रेय संपूर्णपणो मुलांनाच जातं. काहीही समोर असेल ते घेऊन, त्याच्या आपापसातील व्यवहारांना, कामांना सुरु वात व्हायची. त्यात कधी माझ्या टेबलावर ठेवलेल्या वस्तू असतील तर कधी शाळेची भांडी, तुटलेले डबे, बाटल्या, चार्जर,  पिस्त्याची सालं, चिंचोके असे काहीही असायचं. आपसूक रोज मुलांनी स्वत: जमवलेल्या वस्तूंची एक पिशवी तयार व्हायची. आठवडाभरात मुलांनीच आजूबाजूच्या परिसरातून त्याच्या कामाचं  भरपूर साहित्य गोळा केलं होतं. त्याच्या एकेक करत अनेक पिशव्या जमायला लागल्या. मुलं आली की त्या पिशव्या घ्यायची. ही झाली मुलांनी स्वत:ची स्वत: केलेली साहित्य निर्मिती.
मुलांच्या या कृतीतून मला सहज शिक्षण वर्गाच्या साहित्य निर्मितीचा नवा धडा मिळाला. आता मी देखील रोज उघड्या डोळ्यांनी किंवा डोळसपणे सभोवताली बघू लागले. कुठल्या कुठल्या वस्तूंना आपल्या सहज शिक्षण वर्गात, (ज्याचं नाव आम्ही नंतर धडपडवर्ग ठेवलं, कारण इथला सगळाच प्रवास धडपडत  चालला होता.), न्यायचं याचा बारकाईनं विचार करायला लागले. प्रत्येक  वस्तूंची बारकाईनं तपासणी करायला लागले. ही विकतच्या खेळण्याचा भाग वगैरे नाही ना हे तपासून पाहू लागले. नंतर असं लक्षात आलं की, आपल्या आसपासच्या ज्या वस्तू आपल्याला नकोशा झाल्या आहेत किंवा आता या टाकून द्यायला पाहिजेत असं वाटत आहे, त्या वस्तू धडपड वर्गासाठी एकदम योग्य असं शैक्षणिक साहित्य आहेत. घरातील जुनी खोकी, संपलेल्या सगळ्या बाटल्या , सॉस, शॅम्पू, तेल, इतर डबे एरवी जे कच-या त जाणार होतं, ते आता मानानं धडपड वर्गात यायला लागलं. मला कोणी भेटवस्तू दिली की माझं लक्ष   त्याच्या खोक्याकडंच असायचं. खोक्याचं नाविन्य वाटायचं. त्यातील वस्तुंचं कौतूक फारसं नाहीच, असं व्हायला लागलं. घरात अशा सुक्या कच-याचा  एक कोपराच तयार व्हायला लागला. तो जेवढा जास्त जमायाचा,    तेवढा मला जास्त आनंद व्हायला लागला. एरवी मुलांसाठी चित्रं गोळा करु न किंवा पुठ्ठे वगैरे कापून शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यापेक्षा ही साहित्य  निर्मिती अतिशय सोपी वाटायला लागली आणि तेवढीच आनंद देणारी  ठरायला लागली. आता धडपड वर्गातही नेहमीच्या वर्गासारखे साधनांचे भरपूर ट्रे तयार झाले होते पण त्यात एकही साधन मी मुद्दामून तयार केलेलं नव्हतं किंवा विकतचंही नव्हतं. आहे की नाही गंमत !
या सहज शिक्षणाच्या प्रवासात, शैक्षणिक साहित्य तयार करायचं नाही, या विचारानं चक्र ावलेल्या माङया मनावर आता मात्र शैक्षणिक साहित्य निर्मिती मुलांनीच मुलांसाठी करायची किंवा आपण केली तर ती निरु पयोगी वाटणा-या  वस्तू गोळा करु न करायची, हे खोल प्रतिबिंबित झालं आहे.  

 (  लेखिका सहज शिक्षण केंद्राच्या संचालिका आहेत.)

ratibhosekar@ymail.com  


 

 

 


 

Web Title: Languages, mathematics and science can be taught in simple ways. How?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.