Kim Tsu who struggle for smokeless chula | घरात धूरविरहित चूल पेटावी म्हणून झटणारी किम त्सु

घरात धूरविरहित चूल पेटावी म्हणून झटणारी किम त्सु

-डॉ. विनिता आपटे


मला पूर्ण विश्वास आहे की जगाला हवामानबदलाच्या धोक्यापासून वाचवायचं असेल तर वेगवेगळ्या देशांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या जातात त्याचा अभ्यास केला पाहिजे, तरच आपल्यातही योग्य बदल करता येईल. आम्हीही आमच्या पातळीवर काही बदल केले विशेषत: स्वयंपाकासाठी लाकूड वापरणं कमी व्हावं यासाठी सगळ्या महिलांनी संघटित प्रयत्न केले आणि लाकूडफाटा गोळा करण्यासाठी लागणारे कष्ट कमी करायचा प्रयत्न केला.’ जगातली  ‘हरित सेलिब्रिटी’  म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती  किम त्सु एका परिषदेत विचार मांडत होती.
 

मूळची उत्तर कोरियामधली किम आता बीजिंगजवळच्या दियावो या पियांगु जिल्ह्यातल्या खेड्यात राहते. इथल्या महिलांना जीवनावश्यक गोष्टींसाठी खूप मोठी लढाई लढावी लागते. चूल पेटवण्यास लागणारा लाकूडफाटा गोळा करण्यासाठी अनेकदा त्यांना अपघातांना सामोरं जावं लागतं. मुळात लाकूडफाटा गोळा करताना आजूबाजूच्या काटेरी झुडपांचे काटेही हातात जातात. आठवडाभराची लाकडांची बेगमी करायची तर एक संपूर्ण दिवस त्यांना त्यातच घालवावा लागतो.  त्यामुळे कधी कधी  त्या दिवशी त्यांना घरात स्वयंपाक करण्यासाठीही वेळ मिळत नाही. कुटुंबच्या कुटुंब या लाकूडफाट्यामागे फिरत उपाशी राहतं. या जीवघेण्या संकटातून मार्ग काढणं अवघड होतं, पण अशक्य नव्हतं याची जाणीव किम त्सुला होती. त्यासाठी सगळ्यात मोठा अडसर होता तो म्हणजे स्वयंपाकाच्या ऊर्जेसाठी नेमका दुसरा कुठला पर्याय उपलब्ध करून द्यायचा हे कळत नव्हतं. त्यावर उपाय शोधण्यासाठी अभ्यास करताना किमला ‘बीजिंग अजेंडा फॉर अँक्शन’ याविषयी माहिती समजली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा दूरदर्शी अजेंडा जवळपास 20 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला होता.  नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याविषयी मार्गदर्शन करणारा हा एकमेव अजेंडा आहे. पर्यावरण असंतुलनामुळे महिलांना खूप गोष्टींमध्ये नुकसान सहन करावं लागतं. पण, एक गोष्ट निश्चित आहे की महिला पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी तत्पर तर असतातच, शिवाय आपल्यातील कल्पकतेचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी नव्या गोष्टी कशा करायच्या, वस्तूंचा पुनर्वापर कसा करायचा या गोष्टी शिकवू शकतात. ज्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे त्या पर्यावरणाचा विचार त्या प्रथम करतात.
 किमच्या या विश्वासाला तडा जाणार नाही अशी गोष्ट तिच्या गावातल्या महिलांनी करून दाखवली. ती सांगत होती, लाकूड जाळून स्वयंपाक करणार्‍या महिलांच्या आयुष्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो याची कोणालाच कल्पना येणार नाही. पण पर्याय उपलब्ध होत नाही त्यामुळे महिला स्वयंपाक करण्यासाठी आपल्या फुप्फुसांत विषारी धूर भरून घेतात. या विषारी धुरांमुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी होते. पण आमच्याकडे इंधनाचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे महिलांना आरोग्य बिघडवणारी ही ऊर्जा वापरण्याशिवाय पर्याय नाही. स्टोव्हसाठी पुरेसं लाकूड मिळवणं हे पण एक आव्हानच आहे. जवळपासची सगळी झाडं तोडली गेल्यामुळे लाकूडफाटा आणण्यासाठीदेखील महिलांना खूप लांब जावं लागतं. कारण जवळपास बरीच झाडं आधीच तोडली गेली आहेत. जंगलतोड हे एक पर्यावरण असंतुलनाचं प्रमुख कारण आहे. 
प्रदूषणाची समस्या त्याचमुळे गंभीर रूप धारण करते आहे याचीसुद्धा आमच्या गावातल्या लोकांना माहिती नव्हती. यावर काहीतरी तातडीची योजना अंमलात आणली पाहिजे म्हणून मी माझ्या केनियातल्या एका मैत्रिणीची मदत घेतली आणि तिनं एक धूरविरहित चूल विकसित केली होती त्याची आठवण देऊन ते तंत्र शिकून घेण्याची माझी इच्छा तिला बोलून दाखवली. तिनं मला तंत्र अवघड नसलं तरी त्यात तू वेळ घालवू नकोस पण अशी चूल ज्या संस्था तयार करतात त्यांची मदत घे, असा सल्ला दिला.  

ही चूल म्हणजे प्रदूषणावर मात करणारी स्वयंपाकाची ऊर्जा. ज्यासाठी अगदी कमी लाकडाचा वापर होतो आणि धूर कमी निर्माण होतो. त्यामुळे आपोआपच प्रदूषण काही प्रमाणात आटोक्यात येते. मी तिच्याच सल्ल्यानुसार  पाहिली चूल आणून माझ्या घरात वापरायला सुरुवात केली तेव्हा स्वभावाप्रमाणे आमच्या गावातल्या सगळ्या पुरु ष मंडळींनी मस्त नावं ठेवली. 

बायकाही  यात कमी नव्हत्या. शिवाय या चुली विकत घ्यायच्या तर आमच्याकडे पैसेही नव्हते. पण माझ्या कॉलेजमध्ये शिकणा-या  मुलीनं मला ‘ग्लोबल अलायन्स’ नावाच्या संस्थेविषयी माहिती सांगितली आणि त्या संस्थेकडून बीजिंग अजेंडा अंतर्गत मदत घेऊ शकतो अशी माहिती दिली. मी कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता या संस्थेकडे विनंती अर्ज केला आणि त्यांना हव्या असलेल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली. 
या संस्थेनं आमच्या गावात प्रायोगिक तत्त्वावर काही धूरविरहित चुली घेण्यासाठी मदत दिली. या चुलींवर स्वयंपाक करून त्याचा नेमका परिणाम काय होतो याच्या नोंदी करून देण्याच्या तत्त्वावर आमच्या गावातल्या 11 महिलांना चुली मिळाल्या. तेवढय़ानं आमची गरज भागणार नव्हती. पण त्यासाठी ब-याच गोष्टींच्या पूर्तता कराव्या लागणार होत्या. म्हणून मी आमची एक संघटना स्थापन केली आणि त्यानुसार कामाला लागलो. या महिलांनी आजूबाजूच्या सगळ्या घरातल्या महिलांना चुली कशा वापरायच्या त्यासाठी त्यांना आर्थिक मदत हवी असेल तर कोणत्या कागदपत्नांची पूर्तता करायची याविषयी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आता हळूहळू करत आमच्या ‘स्मोकलेस चुल्हा’  या संकल्पनेशी निगडित खूप महिला एकत्र आल्या आहेत. आमच्याच नाही तर आजूबाजूच्या पाच खेड्यांत आमच्या संघटनेतल्या बायका या ऊर्जेचा प्रसार करताहेत . 
जगभरात अशा अनेक स्मार्ट महिला अशा प्रकारच्या चुली वापरून स्वत:चं आणि  पर्यावरणाचं रक्षण करताहेत. त्याशिवाय लाकूडफाटा वापरण्यासाठी होणारी जंगलतोड कमी करताहेत हे सगळ्यात महत्त्वाचं.
 महिला या कोणत्याच आघाडीवर कमी नाहीत हे शहरी जीवनावरून लक्षात येतंच. पण आज खेडोपाडी राहणा-या  महिला स्वत:च्या आरोग्याविषयी तसेच पर्यावरण रक्षणासाठी तितक्याच जागरूक आहेत आणि सक्षमही आहेत हेच या उदाहरणावरून दिसून येतं .

(लेखिका तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक  संचालक  आहेत.) 

aptevh@gmail.com 

Web Title: Kim Tsu who struggle for smokeless chula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.