Is it advisable to consume vegetable juice daily or dangerous? | दररोज भाज्यांचा रस सेवन करणं योग्य आहे की घातक?
दररोज भाज्यांचा रस सेवन करणं योग्य आहे की घातक?


-वैद्य  राजश्री कुलकर्णी

सध्या ग्रीन ज्यूसचं फॅड खूपच जोरात आहे !  सगळ्या हिरव्या भाज्या बारीक करून त्याचा रस काढून, गाळून पिणं असं साधारण याचं स्वरूप असतं. सकाळी व्यायाम करून आल्यावर बहुतेकजण हा असा रस पितात.
यात पालक किंवा इतर पालेभाज्या, दुधी भोपळा, कोथिंबीर वगैरे आपण नेहमी वापरतो. त्या भाज्यांचे रस प्यायले जात असतील तर एकवेळ तेही ठीक आहे; परंतु मध्यंतरी त्यातच आणखी एक असा ट्रेण्ड आला होता की सगळ्या हिरव्या पानांमध्ये क्लोरोफिल असतं. हे क्लोरोफिल आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे आणि ते शरीरात विषार साठू देत नाही. ते उत्तम अँण्टी ऑक्सिडण्ट म्हणून काम करतं. त्यामुळे मग कोणतीही हिरवी पानं या ज्यूससाठी वापरू शकता. या अशा ऐकीव सल्ल्यास प्रमाण मानून अनेकजण आपल्या बागेतील किंवा परिसरातील मिळतील त्या झाडांची पानं आणून ज्यूस बनवू लागले. याशिवाय हल्ली जॉगिंग ट्रॅकच्या आसपास अनेक विक्रे ते अगदी गव्हाच्या तृणरोप रसापासून ते शतावरी, जांभूळ, कारली, दुधी ते कडुनिंबार्पयत अनेक भाज्या आणि औषधी वनस्पती यांचे रस काढून विकत असतात. मुळात पालेभाज्या या कडवट, तुरट रसाच्या असतात. आपण जेव्हा पोळीबरोबर भाजी या स्वरूपात त्या खातो तेव्हा त्यात तेल, मीठ, मसाले टाकून त्या बनवतो, त्यामुळे त्या रुचकर लागतात; परंतु जेव्हा त्यांचा रस काढला जातो तेव्हा बरेचजण तो तसाच पिऊ शकत नाहीत. आणि मग त्यांना रुचकर बनवण्यासाठी विविध युक्त्या केल्या जातात. मग कधी त्यात कडधान्यं मिसळली जातात, कधी फळं घातली जातात, कधी सुकामेवा वापरला जातो, तर कधी साखर, बर्फ वगैरे टाकून या रसामध्ये गोडवा आणला जातो. पण अशा प्रयोगांनी हे रस आरोग्यदायी होतात की आरोग्यास घातक हे मात्र माहीत नसतं. 
पालेभाज्या या कितीही पौष्टिक असल्या तरी त्यांचा ज्यूस आणि स्मूदीज सेवन करण्याआधी त्यांचे बरे-वाईट परिणाम समजून घ्यायला हवेत. 
हिरव्या रसांचा फायदा
*  हे रस आपण इतर कोणतीही प्रक्रि या न करता वापरत असल्यामुळे त्यातून व्यवस्थित पोषक द्रव्यं नैसर्गिकरीत्या वापरल्यास मिळू शकतात.
*  ताज्या वनस्पतींमध्येअँण्टी ऑक्सिडण्ट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात विषार साठू देत नाहीत.
*  रस या पातळ, द्रव स्वरूपात वापरल्यामुळे रक्तात पोषणमूल्यं पटकन शोषली जातात.
*  हिरव्या भाज्यांत क्लोरोफिल असल्यानं पचन चांगलं होतं तसेच विशेषत: यकृताचं आरोग्य सुधारतं. पाचक स्त्राव योग्य आणि चांगल्या प्रकारे स्रवतात.
*  रक्तशुद्धी होते आणि रक्ताभिसरण सुधारतं.
*  रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
*  यकृत आणि मूत्रपिंड यांचं कार्य सुधारतं. 
*  अनेक प्रकारच्या  कॅन्सरच्या विरोधात शरीरात विशेष प्रतिकारशक्ती निर्माण होते.
*  ताज्या रसांमुळे उत्साह वाढतो.
*  त्वचा चमकदार व तुकतुकीत होते.
*  केस मजबूत आणि चमकदार  होतात.
*  शरीरातील आम्लाचं प्रमाण कमी होतं. 
*  वय वाढल्याची लक्षणं उशिरा दिसतात.
 पोट आणि आतडय़ांची कार्यशक्ती वाढते.
फायद्यासाठी पथ्य हवं !
 हिरव्या भाज्यांच्या रसात अनेक फायदे असतात ते जसेच्या तसे मिळवायचे असतील तर ग्रीन ज्यूस अर्थात हिरवा रस पिण्यासाठी काही पथ्यं पाळणं गरजेचं आहे. 
 कोणताही रस किंवा ज्यूस हा कितीही आरोग्यदायी आहे असं गृहीत धरलं तरी तो परिपूर्ण आहार होऊ शकत नाही. कारण त्यात प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ यांचा अभाव असतो.
* जर हिरव्या भाज्यांच्या रसात साखर घालून त्याचं सेवन केल्यास  वजन कमी करण्यासाठी या रसाचा काहीच उपयोग होत नाही.
*  पालेभाज्यांतील काही भाज्या किंवा वनस्पती या औषधी गुणधर्म असणा-या असतात. त्यामुळे व्यक्तिपरत्वे त्याचे होणारे परिणामदेखील विभिन्न असतात. सगळ्या वनस्पती प्रत्येक व्यक्तीला चालतीलच, असं सांगता येत नाही.
* काही जणांना सातत्यानं हिरवा रस प्यायल्यानं  पित्त होणं, मळमळ, उलटय़ा होणं, डोकेदुखी, पुरळ येणं, खाज येणं, शरीरात उष्णता जाणवणं अशा तक्रारी जाणवू शकतात, तर याविरुद्ध काही जणांना वारंवार सर्दी, खोकला असे त्रास होतात.
 * अगदी नेहमीच्या वापरातील भाज्यादेखील एकेकटय़ा अत्यंत गुणकारी असल्या तरी जेव्हा सगळ्या एकत्र करून वापरल्या जातात तेव्हा त्या संयोगानं त्या मिश्रणाला काय नवीन गुणधर्म प्राप्त होतील आणि  त्यात कशा प्रकारचे बदल घडतील हे माहीत नसल्यानं त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात.
 * दीर्घकाळ केवळ असाच रसाहार करत आल्यास शरीरात इतर जीवनसत्त्वं किंवा पोषकतत्त्वांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते.
 आपली प्रत्येकाची तब्येत, प्रकृती ही एकमेकांपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे काय चालेल, काय सहन होणार नाही, हे सर्व व्यक्तिगणिक बदलतं. 

काय चूक, काय बरोबर?
 * कोणतेही डाएट केवळ वाचून किंवा ऐकीव माहितीवर जाऊन त्याचा अवलंब करू नये.
 *आपल्या शरीराला काय चालेल याविषयी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेऊन मगच ते पाळावं
 * कोणताही वजन कमी करण्याचा प्रयोग प्रदीर्घ काळ एकाच प्रकारच्या डाएटवर राहून पाळू नये.
*  भाज्यांचे रस किंवा फळांचे रस पिण्यास हरकत नाही परंतु ते सगळे कसेही ,घरात आहेत म्हणून सगळं एकत्र करु न वापरु  नयेत.  एकावेळी एकच भाजी अथवा फळ वापरून रस काढावा.
 * उगीचच बागेत सापडतील त्या झाडांच्या पानांचे रस काढून, कशातही मिसळून पिऊ नयेत. ते जिवावरदेखील बेतू शकतं.
*  पालेभाज्या, किंचित मीठ, लिंबाचा रस असं मिश्रण क्वचित चालतं.
*  गाजर, बीट अशा गोडसर चवीच्या भाज्यांबरोबर डाळिंब, तुतू, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, संत्री, मोसंबी अशा फळांचे रस चालतील.
 * रस काढले की ताजेच प्यावेत, बाहेर किंवा फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नयेत कारण त्यांचे गुण बदलतात.
 * रसात साखर, बर्फ वगैरे घालू नये. नैसर्गिकरीत्या जसे बनतील तसेच प्यावेत.
 * असे रस घेण्यास सुरुवात केल्यावर जर काही वेगळी लक्षणं किंवा तक्रारी वाटल्या, जाणवल्या तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
 अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा साठीच्या पुढच्या व्यक्तींना अशा कोणत्याही प्रकारचे रस देऊ नये.

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

rajashree.abhay@gmail.com
 

 

 

Web Title: Is it advisable to consume vegetable juice daily or dangerous?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.