धैर्य-शौर्य दाखवायचं असेल तर प्रत्यक्ष युध्दाच्या मैदानावर उतरावं लागत नाही. आपल्या कृतीतून , आपल्या बोलण्यातूनही ते दाखवता येतं. संपूर्ण जग सध्या अफगाणिस्तानवर तालिबाननं कसा कब्जा केला, अफगाणिस्तानातील नागरिक मुला बाळांसह कसे देश सोडून पळून जाण्यासाठी धडपडत आहेत हे बघत आहे. आज तालिबान म्हटलं तरी त्यांच्या दहशतीचा अंदाज येवून अस्वस्थ व्हायला होतं. जे प्रत्यक्षात अफगाणिस्तानात जन्मले आहे पण इतर देशात काम करत आहे त्यांची मनस्थिती कशी असेल याबद्दल बसल्या जागी अंदाज बांधणं केवळ अशक्य. पण बीबीसी या वृत्तवाहिनीची ऑस्ट्रेलियन रिपोर्टर याल्दा हाकिम जी मूळची अफगाणिस्तानातील आहे हिनं अर्धा तासाच्या एका मुलाखतीतून पत्रकाराचं धाडस आणि आपल्या मायभूमीबद्दलची कळकळ दाखवून दिली.
छायाचित्र- गुगल
दोन दिवसांपूर्वी याल्दा बातम्या देत होती. त्यादरम्यान तिला तिच्या मोबाईलवर तालिबान प्रवक्याचा फोन आला. याल्दा जराही डगमगली नाही. विचलित झाली नाही. त्यावेळेस याल्दा एक दुसरी मुलाखत घेत होती. तिला ही मुलाखत मधेच तोडणं शक्य नव्हतं. आणि तालिबानच्या प्रवक्त्याचा फोन कट करणंही तिच्यासाठी शक्य नव्हतं. तिने मुलाखत चालू असताना सुहेल शाहिन या तालिबान प्रवक्त्याला लाऊडस्पिकरवर टाकलं आणि त्याला अफगाणिस्तानबाबत तालिबानचं काय नियोजन आहे यावर बोलण्यास उद्युक्त केलं.
आधीची मुलाखत संपल्या संपल्या याल्दानं आता आपल्यासोबत तालिबानचे प्रवक्ता सुहैल शाहिन आहेत असं सांगून तुम्हाला माझा आवाज येतोय ना? असा प्रश्न याल्दानं सुहैल याला विचरला. बोलण्यासाठी लाइन क्लिअर आहे याची खात्री पटताच सुहैल याने युध्द सदृश्य परिस्थितीत असलेल्या अफगाणिस्तानात शांतता निर्माण करण्याबाबत , अफगाणिस्तानातल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबात तालिबानांच्या दृष्टिकोनावर बोलायला सुरुवात केली. सुहैल सांगत होता की अफगाणिस्तानातील लोकं आणि त्यांची मालमत्ता यापुढेही सुरक्षित राहील यात शंका घेण्यासारखं काहीच नाही. आम्ही तर अफगाणिस्तानातल्या लोकांचे नोकर आहोत. आम्हाला आमच्या नेतृत्त्वानं आमच्या फौजा काबूलच्या प्रवेशद्वारावरच ठेवण्याचे आदेश दिले असून काबूल शहरात शिरण्यावर आम्हाला निर्बंध घातले आहेत. आम्ही अफगाणिस्तानात शांततापूर्ण सत्ता हस्तातरणाची वाट पाहात आहोत.
छायाचित्र- गुगल
सुहैल शाहिन बोलत असताना याल्दा अफगाणिस्तानातल्या तालिबानांच्या पूर्वीच्या दहशतीशी सुहैल याच्या बोलण्याचा ताळमेळ लावत होती. आपलं लक्ष जराही विचलित होवू न देता याल्दा महत्त्वाच्या मुद्यांबाबत प्रश्न विचारत होती.याल्दानं सुहैलला विचारलं की आताच्या तालिबानांच्या राजवटीतही शिक्षा झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवलं जाईल का? त्यांचा खुलेआम शिरच्छेद केला जाईल का? याल्दाच्या या प्रश्नावर बिचकलेल्या सुहैलने याबाबत मी आता काहीच सांगू शकत नाही असं सांगून भविष्यातील अफगाणिस्तान शासनाच्या कायद्यानुसार नेमेलेले न्यायाधिश काय निर्णय घेतात हे त्यावर अवलंबून असेल. पण लवकरच शरिया कायद्यानुसार अफगाणिस्तानचा कारभार चालवला जाईल असं त्याने सांगितलं.
छायाचित्र- गुगल
याल्दा मुलाखतीदरम्यान महत्त्वाच्या मुद्यांवर प्रश्न उपस्थित करत होती. जराही वेळ न दवडता अतिशय धाडसानं तिनं अफगाणिस्तानातल्या महिलांच्या कल्याणाबाबत , त्यांच्या सुरक्षा आणि शिक्षणाबाबत काय? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताना याल्दानं आपल्याला अफगाणिस्तानातल्या महिलांनी मेसेज करुन तालिबान आता पुन्हा 90 च्या दशकातील बंधनं स्त्रियांवर लादतील ते अफगाणिस्तानतल्या महिलांना, मुलींना यापुढे शाळेत जाऊ देणार नाही. महिला आणि मुली घराबाहेर पडून काम करु शकणार नाही. हे असं असताना तुमची भूमिका काय असा थेट प्रश्न याल्दानं सुहैल शाहिन याला विचारला . याल्दाच्या या प्रश्नावर तसं काही नाही, महिला आणि मुलींवर कोणताही ताण आणि दबाव नसेल. ते आपलं शिक्षण पुढे चालू ठेवू शकतील हे सुहैल शाहिननं सांगताच याल्दान काल मुली विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आल्या तेव्हा त्यांना तालिबानच्या लोकांनी तिथून परत जाण्यास सांगितलं, हे कसं? असा उलट प्रश्न विचारुन तालिबान्यांच्या कथनी आणि करणीमधला फरक जगाला दाखवून दिला.
ही मुलाखत 32 मिनिटं चालली. याल्दा रोखठोक प्रश्न विचारण्यात कुठेही कमी पडली नाही. या संपूर्ण मुलाखतीत एका क्षणापुरताही तिचा आत्मविश्वास ढळला नाही. आपल्या प्रश्नांचा रोख बदलणार नाही याची तिने प्रत्येक वेळी काळजी घेतली. याल्दाची ही धाडसी मुलाखत जगात समाज माध्यमांवर कौतुकाचा विषय ठरली. जगभरातून याल्दाचं यासाठी कौतुक केलं गेलं.
छायाचित्र- गुगल
मुलाखतीदरम्यान कळकळीनं प्रश्न विचारणारी, शाहीनच्या उत्तरांची उलट तपासणी करणारे रोखठोक प्रश्न विचारणारी याल्दा संपूर्ण जगानं पाहिली. याल्दा केवळ पत्रकार होती म्हणून हा प्रश्न विचारु शकली असं नाही तर याल्दाचा जन्म अफगाणिस्तानात काबुल येथे झाला. 1980 नंतर अफगाण आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील युध्दादरम्यान याल्दाला आणि संसराला घोड्यावर लादून तिच्या आई वडिलांनी तेथील स्मगलर सोबत देश सोडला. याल्दाचे आई वडिल ऑस्ट्रेलियात येऊन स्थायिक झाले. याल्दाचं माध्यमिक आणि पत्रकारिताचं शिक्षण ऑस्ट्रेलियात सिडनीतच झालं. ती सिडनीत स्थिरस्थावर होण्याआधी ती आणि तिचं कुटुंब अफगाणिस्तानातच राहात होतं. 2012 मधे बीबीसी सोबत काम कराण्यासठी ती लंडनला गेली. तिथे जाण्याआधी ती सिडनीतील एसबीसी या माध्यम समुहासोबत काम करत होती. तेव्हापासून आजतागयत याल्दा येमेन, सिरिया, उत्तर इराक आणि लिबिया यासरख्या अस्थिर प्रदेशातलं वार्तांकन करते. 2009 मधे याल्दाला संयुक्त राष्ट्राचा ‘मीडिया पीस’ हा पुरस्कार मिळाला. याल्दाचं काम करण्याचं तत्त्व एकच, ते म्हणजे कामाला कोणत्याही सीमा नाहीत. हे तत्त्वं रुजवण्यात याल्दा म्हणते त्याप्रमाणे तिच्या आई बाबांची भूमिका महत्त्वाची अहे. त्यांनी तिच्यात हा विश्वास निर्माण केला की काम कोणत्याही क्षेत्रात करावं लागलं तरी त्यात आपण यशस्वी होण्यासाठी कोणीही सीमा घालू शकत नाही.
याल्दा म्हणते की घरात जागतिक राजकारण आणि सामाजिक न्याय यावरच्या गप्पा ऐकतच ती मोठी झाली. तसेच . लहान असताना नॅन्सी यांच्या फ्लीट स्ट्रीटवरील गोष्टी ऐकून आणि बीबीसीवरील वार्तांकन पाहून याल्दालाही पत्रकार व्हावसं वाटलं. याल्दा तेव्हा बीबीसीवरील ताज्या घडामोडींबद्दलच्या बातम्या बघायची तेव्हा आपणही कधी तरी अशा बातम्या देऊ हे तिचं स्वप्नं होतं. याल्दानं हे स्वप्न केवळ पूर्णच केलं नाही तर पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेला बाणेदारपणा कसा जपावा याचंही उदाहरण घालून दिलं.
