Join us  

थकलीस का गं? असं विचारलं कधी बायकोला, विचारा तरी.. सिंधुताई सपकाळ मायेनं सांगायच्या तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 11:12 AM

सिंधुताईंच्या जाण्याने हजारो मुले झाली पोरकी....अनाथांची माय नेहमी सांगायची एक गोष्ट...

ठळक मुद्देपुरुषांना संदेश देण्याबरोबरच महिलांनाही जगण्याची प्रेरणा देणाऱ्या सिंधुताई होत्या हजारो लेकरांची मायखडतर परिस्थितीतून पुढे येत उभे केले खूप मोठे सामाजिक काम

अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी निधन झाले. हजारो अनाथ मुलांची माय असलेल्या सिंधुताई गेल्यावर त्यांची मुले पोरकी झाली. अनाथ मुले, महिला यांच्याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत माया असणारी ही माय आपल्या भाषणांत नेहमी मुलांची आणि महिलांची काळजी घ्या असे सर्वांना आवर्जून सांगायच्या. संसाराचे आणि पती पत्नीच्या नात्याचे पदर उलगडताना त्या आपल्या भाषणातून अनेकदा पुरुषांना काही सूचना देत असत. आपल्या बायकोला रोज बाई थकलीस का गं? असं आवर्जून विचारायच्या असं त्यांनी नुकत्याच झालेल्या एका भाषणात सांगितले होते. घरासाठी, आमच्या सगळ्यांसाठी किती करतेस गं, असं मायेनं विचारलं तर बायकोला केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटल्याशिवाय राहणार नाही. 

(Image : Google)

दिवस-रात्र संसाराचा गाडा ओढणाऱ्या बायकोला नवऱ्याकडून फार काही अपेक्षा नसते. नवऱ्याने दोन शब्द आपल्याशी प्रेमाने बोलावेत इतकेच तिला वाटत असते. त्यामुळे तू जेवलीस का? आजची भाजी खूप छान झाली होती. असं प्रेमानी तिला सांगितलं तर ती मनापासून खूश होईल. आपण करत असलेल्या कष्टाची कोणीतरी दखल घ्यावी इतकंच तिला वाटत असतं. नवऱ्याच्या दोन प्रेमाच्या शब्दांनीही तिला खूप बरं वाटेल आणि ती आणखी प्रेमाने, उत्साहाने आपले काम करेल. हे सांगताना सिंधूताई सायकलचे उदाहरण देतात. नवरा म्हणजे सायकलचे पुढचे चाक तर बायको म्हणजे मागचे चाक असते. सायकलचे पॅडल, चेन, स्टँड, सीट, ब्रेक हे सगळे मागच्या चाकाला असते. त्यामुळे मागे राहून ती अनेक जबाबदाऱ्या अतिशय नेमकेपणाने पार पाडत असते, याचे भान प्रत्येक पुरुषाला असायला हवे असे सिंधूताई अतिशय प्रेमाने सांगायच्या. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींबरोबरच त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीचेही ऐकणाऱ्याला खूप कौतुक वाटायचे आणि त्यांचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटायचे. 

मुलांना किंवा पुरुषांना काही गोष्टी सांगताना त्या आपल्यासमोर उपस्थित महिलांनाही जगण्यासाठी बळ मिळेल असे बोलायच्या कोणत्याही परिस्थितीत खचू नका, त्यातून पुढे जात मार्ग काढा असे धीराचे बोल त्या कायम तरुणींना ऐकवत असत. त्यांच्यातील धीर आणि ताकद बघून अनेक मुली आज आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तम असे काम करत आहेत. ‘मी जगले, तुम्हीही जगा, दुसऱ्यांसाठी जगून बघा, त्यातून मिळणारा आनंद तुम्ही खऱ्या अर्थाने जगाल तेव्हाच मिळेल.’ असे सांगत सिंधुताई समोरच्याच्या मनात प्रेरणेची ज्योत केव्हा पेटवतात हे ऐकणाऱ्याच्याही लक्षात यायचे नाही. कधी रेल्वे स्टेशनवर राहून तर कधी स्मशानात राहून आपला सुरुवातीचा कठीण काळ काढणाऱ्या सिंधुताई  हजारो लेकरांची माय होऊन गेल्या यातूनच त्यांच्या कामाचे मोल आपल्याला लक्षात आल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे आयुष्याचा प्रवास खडतर असला तरी खचू नका, हरुन जाऊ नका असे सिंधुताई वारंवार महिलांना सांगत असत. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसिंधुताई सपकाळ