Join us  

शाब्बास पोरी! मुंबईच्या ऱ्हिदमनं वयाच्या अवघ्या १० वर्षी सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 1:34 PM

सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक होण्याचा मान मुंबईतील ऱ्हिदम ममानिया हिच्या नावावर नोंदवला गेला आहे.

ठळक मुद्देमोहिम पूर्ण झाल्यावर इतर गिर्यारोहक खाली उतरण्यासाठी हेलिकॉप्टरची वाट पाहात असताना ऱ्हिदमने मात्र पायीच उतरण्याचा निर्णय घेतलासंपूर्ण मोहिमेत तिच्यामुळे तयार झालेला कचरा तिने तिथेच न टाकता तो सोबत आणला आणि काठमांडू येथे टाकला

जगातील सर्वात उंच शिखर असलेले एव्हरेस्ट किंवा एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. कठोर मनोबल, शारीरिक तयारी आणि सकारात्मकता यांच्या जोरावर ही कामगिरी करणे हे एक आव्हान आहे. आतापर्यंत अनेकांनी हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. यामध्ये एक पाय नसताना, अंध असताना किंवा ७० हून अधिक वय असलेल्यांनी आपल्या कामगिरीने स्वत:चे स्थान सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक होण्याचा मान मुंबईतील ऱ्हिदम ममानिया हिच्या नावावर नोंदवला गेला आहे. सर्वात कमी वयात एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करण्याची कामगिरी ऱ्हिदमने केली असून सर्वच स्तरातून तिचे कौतुक होताना दिसत आहे. 

(Image : Google)

ऱ्हिदम स्केटर असून अतिशय प्रतिकूल वातावरणात तिने हा बेस कॅम्प सर करत आपल्यातील जिद्द दाखवून दिली. ट्रेकिंगसाठी लागणारे कोणत्याही प्रकारचे अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नसताा तिने ही कामगिरी करुन दाखवली आहे. ५३६४ मीटर उंचीवर असणारी प्राणवायूची नीचांकी पातळी, या वातावरणामुळे सतत होणारी मळमळ अशातही तिने स्वत:ला कणखर ठेवत आपले ध्येय गाठले. ऱ्हिदम वांद्रे येथील ऋषिकुल विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकते. एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करताना तिच्यासोबत तिची आई ऊर्मी आणि हर्षल हेही होते. स्केटींग खेळत असल्याने ऱ्हिदमचे मांडीचे स्नायू बळकट होतेच, त्यामुळे ही कामगिरी करणे शारीरिकदृष्ट्या तिला काहीसे सोपे झाले. पायाला फोड आलेले असूनही अतिशय कमी तापमानात ही चढाई करणे अतिशय अवघड असते, मात्र त्या परिस्थितीतही ती खचली नाही तर अतिशय जिद्दीने तिने आपले ध्येय पूर्ण केले. वयाच्या ५ व्या वर्षापासून ऱ्हिदमला ट्रेकींगची आवड अशून तिने पाचव्या वर्षी दूधसागरचा ट्रेक केल्याचे तिच्या आईने सांगितले. 

(Image : Google)

नेपाळच्या सातोरी अॅडव्हेंचर्सचे ऋषी भंडारी यांनी ही ११ दिवसांची मोहीम आयोजित केली होती. "मोहीमेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाच्या वयाची आणि राष्ट्रीयत्वाची नोंद माझ्याकडे नाही. पण बहुतांशी गिर्यारोहक भारतीय आणि विशेषकरून मुंबईचे होते. आरोग्यबाबत कोणतीही तक्रार न करता ऱ्हिदमने मोहीम पूर्ण केली याचे मला कौतुक वाटते" असे मत ऱ्हिदमच्या कामगिरीबाबत ऋषी यांनी व्यक्त केले. मोहिम पूर्ण झाल्यावर इतर गिर्यारोहक खाली उतरण्यासाठी हेलिकॉप्टरची वाट पाहात असताना ऱ्हिदमने मात्र पायीच उतरण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे इतक्या लहान वयात तिच्यात असलेली जिद्द याठिकाणी दिसून आली. पर्यावरणाच्यादृष्टीनेही ऱ्हिदमने कलेल्या कामाचे विशेष कौतुक करायला हवे. कारण संपूर्ण मोहिमेत स्वत:चा कचरा तिथेच टाकण्याऐवजी काठमांडूने आणला."

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीएव्हरेस्टट्रेकिंग