Join us  

कॅन्सरसारख्या अवघड आजारात प्रेमाच्या माणसांनी ‘केअरगिव्हर’ होणं म्हणजे काय असतं? संवाद-सहवेदना आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 4:48 PM

उमेद सपोर्ट ग्रुप : कॅन्सरसह जगणाऱ्या व्यक्तीची काळजी घेताना एकमेकांना साथसोबत करत मायेनं जोडलं जाण्याची गोष्ट

ठळक मुद्देकॅन्सर तिथेच लपलेला होता, भीतीही तिथेच दबा धरून होती पण आयुष्य आणि आयुष्यातला आनंद पण तिथेच होता की..!

मुक्ता गुंडी‘केअरगिविंग’ मधल्या ‘केअर’चा अर्थ काय असतो? मराठीत ‘काळजी घेणे’ असं म्हणतात. काय असतं काळजी घेणं? कॅन्सरसारख्या अवघड आजाराला तोंड देणाऱ्या आपल्या प्रेमाच्या माणसाला औषधपाणी देणं, हॉस्पिटलमध्ये नेणं, वेळेवर खायला देणं- इतकंच की अजून काही? जवळ बसून बोलणं, मनापासून ऐकणं, वेदना समजून घेणं, धीर देणं, आश्वासक स्पर्श करणं, बारीकसारीक गरजा टिपणं, आपण काय प्रतिसाद देत आहोत याचं भान ठेवणं आणि मुख्य म्हणजे त्या व्यक्तीसाठी ‘असणं’.. ‘केअरगिविंग’मध्ये खरंतर हे ‘असणं’ सगळ्यात महत्वाचं असतं, पण ते तितकंच अवघडही असतं! मागे वळून पाहताना लक्षात येतं की तो काळ जितका काकूच्या (म्हणजे माझी सासू- वंदना अत्रे) कॅन्सरशी संबंधित होता तितकाच तो स्वतःची ताकद आणि मर्यादा समजून घेण्याचा होता, काकूचं आणि माझं नातं घडण्याचा होता, तिच्या आयुष्यातल्या कित्येक व्यक्तींशी प्रेमानं जोडलं जाण्याचा होता आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी देणारा होता. मी, सागर (माझा नवरा) आणि राजनकाका (माझे सासरे) यांचा प्रवास केअर-गिविंग, केअर-सीकिंग, केअर-शेअरिंग अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून आम्हाला अधिकाधिक लवचिक बनवत गेला.

माझं आणि सागरचं लग्न होण्यापूर्वी काकूला एकदा कॅन्सर होऊन ती त्यातून खंबीरपणे बाहेर पडलेली होती. तो कठीण प्रवास मी कुटुंबातील अनेकांकडून ऐकलेला होता. पण अशाच किंवा याहून कठीण प्रवासास पुन्हा एकदा- नव्हे दोनदा- तोंड द्यावं लागेल, असं स्वप्नातही आलं नव्हतं. २०१४ साली जेव्हा काकूचं कॅन्सरचं निदान झालं तेव्हा पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय ते जाणवलं. आम्ही दोघंही जेमतेम २६ वर्षांचे, वर्षभरापूर्वी लग्न झालेलं, पदव्युत्तर शिक्षणानंतरची पहिलीवहिली नोकरी- हे सगळं नवखं असताना आम्हालाच आधार देणाऱ्या जवळच्या व्यक्तीसाठी केअरगिवर होणं धक्कादायक होतं. काकूची वेदना बघवत नव्हतीच पण काकांची खंबीर राहण्याची धडपड पाहणंदेखील क्लेशदायी होतं. काकूची झालेली अवघड शस्त्रक्रिया, त्यानंतरचे रिकव्हरीचे महिने, तिचं औषधांनी थकलेल शरीर, गळणारे केस हे अनुभवताना आमच्या भवती मायेची ऊब पांघरली होती ती नातेवाइकांनी आणि काकाकाकूच्या मित्र-मैत्रिणींनी. त्यांचं प्रेमानी चहा आणणं, कधी खाऊ आणून देणं, कधी गप्पा मारायला येणं, कधी डोक्यावर हात ठेऊन ‘काळजी घे’ म्हणणं भीती, दुःख आणि एकटेपण दूर करायचं. घरकामात मदत करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या मावशीदेखील आमच्या केअरगिवर झाल्या. या साऱ्या माणसांनी आम्हाला कधीच कोसळू दिलं नाही.इतक्या वेगळ्या मुशीत घडलेली माणसं होती ही! वेगळ्या वयोगटातली, वेगळ्या प्रकारच्या कुटुंबांमधली, अगदी वेगळ्या राजकीय विचारसरणीचीदेखील होती. साऱ्या करकचून बांधलेल्या स्तरांच्या आत जे माणूसपण असतं ते या सगळ्यांमुळे मी प्रत्यक्ष अनुभवलं. नाती (रक्ताची आणि सामाजिक देखील!) जपणं, त्या नात्याना खतपाणी घालणं, वरवर खुपणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून न राहता समान धागे शोधणं.. आणि आपलं ‘मैत्र’ आपल्या सोबत असणं किती आधार देणारं असतं याचा परिपाठ देणारा काळ होता तो. पैसे, इन्शुरन्स आणि मोठ्या हॉस्पिटल्सनी आजार दूर करता येतो पण ‘आयुष्य’ परत मिळवायचं असेल तर हे मैत्र हवंच!२०१४ आणि २०१७ साली माझ्या वैयक्तिक आयुष्यात वेगळया प्रकारच्या कसोट्या सुरू होत्या. २०१४ साली मी करिअर सुरू करू पाहणारी भांबावलेली तरुणी होते तर २०१७ साली काकूला पुन्हा कॅन्सरचं निदान झालं तेव्हा मी पी.एच.डी. करत होते आणि आमची मुलगी तीन महिन्यांची होती. आईकडे तिला मांडीत घेऊन बसले होते तेव्हा बातमी समजली. सुन्नपणा आला. या दोन्ही काळात मी कुठे आणि कसा आधार शोधत होते? कुटुंबातील प्रत्येक जण आपापल्या परीनं आधार शोधत होता. कुणी देवापाशी, कुणी संगीत ऐकून, कुणी शास्त्रीय माहिती जाणून घेऊन, कुणी मानसोपचार घेऊन.. माझ्या मनातलं आस्तिक-नास्तिक द्वन्द्व या काळात तीव्र झालं. एका बाजूला ‘का?’ असा प्रश्न विचारायला देव हवासा वाटायचा पण प्रत्यक्ष समोर येऊन उत्तर देऊ न शकणाऱ्या कशातूनच मला आधार वाटत नव्हता. तर्कदेखील कुठपर्यंत पुरणार! प्रश्न अनुत्तरीतच राहणार तर! या काळानं आयुष्याचं हे अनुत्तरीत आणि अपूर्ण असणं मान्य करायला शिकवलं. हे शिक्षण - ‘वर्क इन प्रोग्रेस आहे’, पण आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाचा जाब विचारण्याची आणि नशीब बदलण्याची मुभा एक माणूस म्हणून आपल्याला असेलच असं नाही, याची मनाशी खूणगाठ बांधली आहे आता.सासू-सुनेच्या पारंपारिक नात्यामध्ये सासू आजारी असताना सुनेचं ‘केअरगिवर’ होणं याची जी कल्पना आपल्या डोळ्यासमोर आहे, तसं माझं आणि काकूच नातं नाही, कधीच नव्हतं. खरं तर केवळ केअरगिविंग नाही तर आम्ही केअरशेअरिंग केलेलं आहे. ती दोन्ही वेळा कॅन्सरनं आजारी असताना मी तिच्यापासून माझ्या विवंचना, काळज्या, आजारपणं लपवली नाहीत. यात माझा स्वार्थ होता की मी लहान असल्यामुळे मला तिच्याकडून काळजी (आणि लाड) करून घेण्याचा “हक्क” अबाधित ठेवायचा होता! मला ती माझी हक्काची स्पेस घालवायची नव्हती. तसंच खऱ्या नात्यामध्ये खोटेपणाला स्थान नसावं. त्यामुळे कंटाळा आला, चिडचिड होत असेल तर रात्री झोपाळ्यावर बसून काकांनी केलेली गरम कॉफी पीत आम्ही मनाला आणि अश्रूना वाट मोकळी करून द्यायचो, उगीचच गाडीत बसून एक चक्कर मारून यायचो. खाणं, गाणं, पुस्तकं, सिनेमा यावर गप्पा मारायचो- फुटकळ विषयांवर वादही घालायचो. जेव्हा भीतीचं सावट आजूबाजूला होतं तेव्हा ती भीती परतावून लावण्यासाठी असं ‘लाईव्हली’ राहणं हे एकमेव अस्त्र आमच्याजवळ होतं.हॉस्पिटलमधला तो प्रसंग लख्ख डोळ्यापुढे आहे. काकूच्या पोटाच्या शास्त्रक्रियेनंतरचा तिसरा दिवस असावा. तिच्याबरोबर मी हॉस्पिटलच्या खोलीत बसले होते. तिच्या वेदना आणि माझ्या मनावरचा ताण यांची एकमेकीना पुरती कल्पना होती. हातात हात घेऊन गप्पा मारल्या ..आणि थोड्या वेळानं काकूनं पुस्तक वाचायला घेतलं आणि मी कानात इअरफोन घालून पुढच्याच आठवड्यात असणाऱ्या नृत्याच्या कार्यक्रमाची मनातल्यामनात प्रॅक्टिस सुरू केली..... कॅन्सर तिथेच लपलेला होता, भीतीही तिथेच दबा धरून होती पण आयुष्य आणि आयुष्यातला आनंद पण तिथेच होता की..!

mukta.gundi@gmail.com

टॅग्स :कॅन्सर जनजागृतीकर्करोगआरोग्य