Join us  

आईसोबत देशभर सहलीला, कुणी जातं का? भेटा या मायलेकींना, प्रवासाची जिंदादिल गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 08, 2021 2:30 PM

सहलीचा बेत, तोही आपल्या आईबरोबर? कसा असेल अनुभव? सांगतेय वृषाली...

ठळक मुद्देदिलखुलास, स्वतंत्र, बेधुंदपणे जगता यावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अगदी आपल्या पालकांचीसुद्धा!

ज्योत्स्ना गाडगीळ

सहलीचे बेत हे रद्द होण्यासाठीच असतात का? खरं तर हो! विशेषत: मुलींच्या बाबतीत! कारण त्यांच्या मागे शेकडो अडचणी, जबाबदाऱ्या, समाजभान, सुरक्षा आणखीही बऱ्याच गोष्टी असतात. तरी या सर्वांवर मात करत काही जणी बेधडकपणे सोलो ट्रीप करतात. तर काही जणी मैत्रीणींची मनधरणी करत दहापैकी एखादा बेत यशस्वी करतात. मात्र आपली एक सखी अशी आहे, जिने आईलाच आपली मैत्रीण बनवले आणि विविध ठिकाणच्या पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. तिचे नाव आहे वृषाली महाजन.वृषाली उल्हासनगरला राहते. सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात काम करते. तिला सुरुवातीपासूनच फिरायची खूप आवड होती. मात्र, तिच्या बालपणीच वडील निवर्तले. घराची जवाबदारी आईवर आली. याचे भान ठेवून वृषालीने आईकडे सहलीसाठी कधी हट्ट केला नाही. वृत्तपत्र, मासिकातले लेख, टीव्ही, पुस्तकातील पर्यटन क्षेत्रांची माहिती वाचून ती मनाला मुरड घालत असे.

कॉलेजवयात आल्यावर एकदा तिने एका नामांकित पर्यटन कंपनीची महिला विशेष गोवा सहल पाहिली. न राहावून आईला ती जाहिरात दाखवली. लहान वयात जबाबदारीखाली दडपून गेलेल्या आईने आपल्या मुलीला स्वच्छंदी आयुष्य जगता यावे म्हणून सहलीला जाण्यासाठी होकार दिला. वृषालीला आकाश ठेंगणे झाले. कारण, तिचा पहिला वहिला विमान प्रवास हा पर्यटनाच्या बाबतीतही पहिला वहिला सुखद अनुभव देणारा ठरला होता.या सहलीत सगळ्या वयोगटातल्या महिला आल्या होत्या. वृषाली त्यांच्यातली एक झाली. घर-दार-संसार मागे ठेवून सगळ्याजणी फुलपाखरासारख्या बागडत होत्या. त्यांच्यातच एक तरुण मुलगी तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन आली होती. थोडी जवळीक झाल्यावर कळले, की तिच्या पतीचे नुकतेच निधन झाले आहे. ते दु:खं विसरण्यासाठी आणि आयुष्याची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी ती सहलीत सामील झाली होती. तिला पाहता वृषालीला आईची आठवण आली. त्या मुलीप्रमाणे आपल्या आईनेही आता जबाबदारीतून मोकळे होत स्वत:साठी वेळ दिला पाहिजे, असे तिला वाटले. पण आई स्वत:साठी कधीच वेळ काढत नसते. हे लक्षात घेऊन वृषालीने आईला घेऊन पहिली वैष्णवदेवी सहल केली.दोघी मायलेकी घट्ट मैत्रीणी झाल्या. एकमेकींच्या सोबती झाल्या. आईच्या डोळ्यात वृषालीला अवखळ, अल्लड मुलीच्या डोळ्यातली चमक दिसली. आई मनाने तरुण झाली. त्यानंतर दोघींनी मिळून सहलीचे नुसते बेत आखले नाहीत, तर यशस्वीही केले. गेली सात वर्षे दोघी जणी पर्यटनाचा आनंद घेत आहेत. राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण भारत असा प्रवास दोघींनी केला आहे. त्यांना पाहून सहप्रवासी आश्चर्यचकित होता. कारण मायलेकीची अशी अतूट जोडी पहायला मिळणे दुर्मिळच!

वृषाली सांगते, 'आपण वयाने, अनुभवाने मोठे होत जातो, तसे पालकांपासून दुरावतो. परंतु तेव्हा त्यांना आपली खरी गरज असते. विशेषत: एकल पालकत्व ज्यांच्या वाट्याला आले, अशा पालकांना वाढत्या वयात सोबतीची गरज असते. त्यांचा जोडीदार होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वयातली आणि मनातली दरी आपोआप मिटेल आणि तुम्हाला फिरायला, खायला, सहलीला जायला हक्काचा साथीदार मिळेल.'आयुष्य एकदाच मिळते. ते मनसोक्त, दिलखुलास, स्वतंत्र, बेधुंदपणे जगता यावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अगदी आपल्या पालकांचीसुद्धा! मग घरच्या घरी असा `जिवलग' असताना अन्य कुणाची वाट बघत वेळ कशाला दवडता? चला, ताबडतोब सहलीचे बेत आखायला घ्या आणि ते यशस्वी करून दाखवा... हॅप्पी जर्नी!