Join us  

इंजिनिअर होऊन एअरफोर्समध्ये जाणारी, गोव्याची ऑल राउंडर शिखा जेव्हा 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 11:59 AM

गोव्याची शिखा पांडे, क्रिकेटच्या जगात जेव्हा भन्नाट कर्तबगारी करते

ठळक मुद्देगोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग केले आहे.भारताची वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखाने अनेक सामन्यांमध्ये आपली खेळी दाखवून दिली आहेगो्व्याची पहिली महिला क्रिकेटपटू हा मान तिने मिळवला आहे

‘हम भी किसीसे कम नही’ हे पुन्हा एकदा महिलांनी दाखवून दिले आहे. भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज शिखा पांडेचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिका सुरु आहे. २ ऑक्टोबर रोजी या मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात शिखाने पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. तिने हिलीला ४ धावांवर त्रिफळाचीत केले. हिलीला काही कळायच्या आतच शिखाच्या चेंडूने स्टंप उडवले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने शिखाच्या या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ म्हटले आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनीही ‘बॉल ऑफ द इयर’ म्हणजेच ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’  तिच्या या चेंडूला हीच उपाधी दिली आहे. 

आता जिच्या नावाची इतकी चर्चा होते ती शिखा नेमकी कोण आहे, तिची पार्श्वभूमी काय याविषयी जाणून घेऊया. शिखा ही मूळची गोव्यातील करीमनगर येथील असून तिचे माध्यमिक शिक्षण केंद्रिय विद्यालयातून झाले आहे. त्यानंतर तिने गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग केले आहे. २०११ मध्ये भारतीय वायूसेनेत रुजू झाली. "भारतातर्फे कसोटी क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न आहे,'' असे "फ्लाईंग ऑफिसर' या पदावर कार्यरत असलेल्या शिखाने तिच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण करताना सांगितले होते, २०१४ पासून ती भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत आहे. भारताची वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखाने अनेक सामन्यांमध्ये आपली खेळी दाखवून दिली आहे. 

लोकमत

शिखा पांडेने आपल्या क्रिकेट खेळाची सुरूवात प्रारंभी टेनिसबॉल क्रिकेट खेळाने केली. विविध राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत तिने गोव्याचे प्रतिनिधीत्व करून कित्येकदा गोव्याला राष्ट्रीय जेतेपदेही मिळवून दिली. वेरें येथे राहणारी शिखा पांडे सध्या अंबाला येथे एअर फोर्समध्ये इंजिनीयर म्हणून काम करत होती. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या शिखाने क्रिकेट आणि अभ्यास यांची व्यवस्थितपणे सांगड घातली. गो्व्याची पहिली महिला क्रिकेटपटू हा मान तिने मिळवला आहे. आताच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरीही शिखाच्या एका चेंडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

लोकमत

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाला ११९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाकडून एलिसा हिली आणि बेथ मूनी या फलंदाज सलामीला उतरल्या. पण शिखाच्या या चेंडूने त्या गारद झाल्या. शिखाच्या या चेंडूचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडियो रिट्विट केला तर कित्येकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. चाहत्यांनी या व्हिडियोला सुपर्ब, स्वप्नवत असा चेंडू, अभिमानास्पद कामगिरी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी तिचे या चेंडूसाठी भरभरुन कौतुक केले आहे. तिचा चेंडू पाहून समालोचकासह भारतीय खेळाडूही थक्क झाले. विशेष म्हणजे तिच्या या चेंडूचा व्हि़डियो ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानेही शेअर केला आहे. भारताने  हा सामना गमावला असला तरीही शिखा पांडे हिच्या इनस्विंग गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना जेरीस आणले. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने १९९४ मध्ये आपल्या गोलंदाजीने इंग्लंडचा फलंदाज माइक गेटिंग याला बाद केले होते. त्यावेळी त्याच्या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' ही उपाधी मिळाली होती. वॉर्न याच्या चेंडूला टक्कर देणारा चेंडू टाकत या उपाधीचा मान भारतीय महिला संघाची गोलंदाच शिखा पांडे हिने मिळवला आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीगोवा