Join us  

गोष्ट बाऊन्सर आईची, दोन लेकरांची जबाबदारी असताना वयाच्या चाळीशीत घेतला बाऊन्सर होण्याचा निर्णय...

By सायली जोशी-पटवर्धन | Published: May 13, 2023 3:32 PM

Mothers Day Special 2023 Story Of Bouncer Mother: भेटा एका बाऊन्सर आईला, जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर काय अशक्य असतं?

सायली जोशी-पटवर्धन

बाऊन्सर. हा शब्दच पुरुषांची मोनोपॉली सांगतो. मात्र  २ लेकरांची आई आणि आता आजीही असलेल्या ज्योती मानकर (आधीच्या सुखविंदर कौर मान) यांनी थेट वयाच्या चाळीशीत बाऊन्सर व्हायचं ठरवलं. त्यांच्या घरच्यांनीही त्यांना उत्तम साथ दिली. गेल्या ७ वर्षांपासून त्या बाऊन्सर म्हणून उत्तम काम करतात. पुण्यातल्या अनेक कार्यक्रमात दिसतात. एकेकाळी फूड स्टॉल चालवणाऱ्या ज्याेती एकदम वेगळं काम करायला निघाल्या त्या कशा? आणि त्यांच्या लेकरांनी त्यांना कशी साथ दिली, हे सारं मदर्स डेच्या निमित्त त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडत जातं आणि कळतं एक आई मनात आणलं तर काय काय करु शकते, आपली आणि आपल्या लेकरांची स्वप्न पूर्ण करण्याची धमक बाळगते (Mothers Day Special 2023 Story Of Bouncer Mother).

बाऊंन्सर विषयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या ज्योती पुण्यातील स्वारगेट बस डेपोपोशी खाण्याचा स्टॉल चालवत होत्या. पतीही याच क्षेत्रात असल्याने त्यांचा व्यवसायात चांगला जमही बसला होता. मात्र याठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आणि स्टॉलवरची गर्दी कमी व्हायला लागली. नंतर काही घरगुती कारणांमुळे त्यांनी स्टॉल बंद करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्यांचे एका लग्नाला जाणे झाले आणि त्याठिकाणी त्यांनी  पहिल्यांदा लेडी बाऊन्सर पाहिल्या. त्यानंतर काही ठिकाणी चौकशी केल्यानंतर आपण हे काम करु शकतो असे त्यांच्या लक्षात आले. या वयात नव्याने काही करण्याची इच्छा असलेल्या ज्योती यांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली. मार्शल आर्ट, बॉक्सिंग यातील किमान गोष्टी त्यांना येत असल्याने आणि शरीरयष्टी उत्तम असल्याने त्यांचे लगेचच सिलेक्शन झाले. वयाच्या या टप्प्यावर हा निर्णय घेणे त्यांच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक होते. पण न डगमगता त्यांनी करायचे ठरवले. 

त्या सांगतात, मी निर्णय तर घेतला पण मला माझ्या पती आणि मुलांनी यामध्ये चांगली साथ दिल्याने फारशी अडचण आली नाही.’आता ज्योती यांच्या मुलीचे आणि मुलाचे लग्न झाले असून त्यांना एक नातूही आहे. वैयक्तिक बाऊन्सर तसेच इतर सोशल कार्यक्रमांसाठी ज्योती बाऊन्सर म्हणून काम करतात. यात राजकीय नेते, वरीष्ठ अधिकारी यांचे बाऊन्सर म्हणून कंपनीकडून निवड केली जाते. यात लक्षात राहीलेला इव्हेंट म्हणजे काही वर्षांपूर्वी पुण्यात नवरात्रीचा झालेला इव्हेंट. यावेळी खूप गर्दी होती आणि आत कोणालाही सोडायचे नाही अशा आम्हाला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी या ठिकाणी कार्यक्रमाचे मालक आले. त्यांनी मला आत सोडण्याची विनंती केली. मी त्यांना ओळखपत्र दाखवायला सांगितले.  त्यांनी बराच वेळ मला प्रेमाने, रागाने, भांडून सांगितले, मात्र तरीही मी त्यांना अजिबात आत सोडले नाही. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी या घटनेचा विशेष उल्लेख करुन आवर्जून सत्कार केला. ही लक्षात राहण्याजोगी आणि आनंदाची बाब होती. बाऊन्सर म्हणून काम करताना अशाप्रकारच्या घटना बऱ्याचदा घडतात मात्र आम्ही अतिशय प्रेमाने, शांतपणे समोरच्याचे म्हणणे समजून घेऊन अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतो. शारीरिक क्षमता असली तरी तिचा विनाकारण वापर करणे योग्य नसल्याने शांततेत जितके प्रश्न सुटतील तितका आमचा प्रयत्न असतो. 

ज्योती सांगतात, आई असताना आपण इतर ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करतो त्याचप्रमाणे मी हे काम करते. त्यात वेगळं असं काहीही नाही.’जिद्द आणि इच्छा या जोरावर एका आईची प्रगती प्रेरणादायी आहेच.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिलामदर्स डे