Join us  

अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारणारी, झाडांची गोष्ट सांगणारी तुलसी आजी! तिची गोष्ट जगायचं बळ देते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 4:31 PM

तुलसी गौडा, त्यांचे अनवाणी पाय मातीशी असलेलं त्यांचं नातं सांगतात. अभावातदेखील आपल्याकडे जे काही आहे, तेच वाढवत नेलं, अविरत कष्ट घेतले तर ‘रुजणं’ अवघड नाहीच हेच शिकवतात तुलसी गौडा. (tulsi gowda)

ठळक मुद्दे तुलसी आजी, खंबीरपणे स्वतःचं आयुष्य उभं करण्याची ऊर्जा आहेत.

प्राची पाठक

पद्मश्री पुरस्कार. देशातला चौथा सर्वोच्च नागरी सन्मान. त्या आजीचं नाव पुकारलं जातं. तर त्या आपल्या नेहमीच्याच पारंपरिक वेशभूषेत अनवाणी पायाने पंतप्रधानांपासून सर्वांना अभिवादन करत राष्ट्रपतींपर्यंत पोहोचतात... हे चित्र गेल्या आठवड्यात अख्ख्या देशाने पाहिलं. वृत्त वाहिन्यांनी पुन्हा-पुन्हा दाखवलं. अनवाणी पायाने रेड कार्पेटवर चालत जाणारी गावखेड्यातली, पारंपरिक कपड्यातली साधी आजी, इतकंच याचं महत्त्व नव्हतं. त्यांच्या देहबोलीतदेखील एक अदब होती. तुलसी गौडा त्यांचं नाव. (tulsi gowda) समाजाला दिलेलं पर्यावरणाशी संबंधित योगदान या गटात त्यांना पुरस्कार मिळाला होता. अशा व्यक्तीला पुरस्कार मिळणं हा एका अर्थी पुरस्काराचाच सन्मान असतो.७७ वर्षीय तुलसी गौडा या कर्नाटकातल्या होन्नाली गावी राहणाऱ्या. या भागात पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या, असं म्हणतात. त्यावरुनच हे नाव पडलं आहे. इथेच आढळून येणाऱ्या हलाक्की या आदिवासी जमातीत तुलसी गौडा यांचा जन्म झाला. असं म्हणतात की, हलाक्की या आदिवासी जमातीचा उगमच भगवान शंकराला शेती उद्योगात मदत करण्यासाठी झाला होता. म्हणजे, अगदी पूर्वीपासूनच या जमातीतील लोक निसर्ग आणि शेतीशी संबंधित आहेत, अशी आख्यायिका आहे.

(Image : google)

तसंही शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असं जगभर मानलं जातं. पण मजुरी काम असतं, तोवर लेबर म्हणून स्त्रिया असू शकतात. पण शेतीत अर्थकारण आलं की ते प्रामुख्याने पुरुषांचं क्षेत्र बनतं. शेती असो की पर्यावरण संवर्धन, स्त्रियांकडे उपजतच निसर्गाचा एक सेन्स असतो. निसर्गविषयक भाषा समृद्धीसुद्धा स्त्रियाच मुख्यत्वे जपत असतात. त्यात तुलसी आजी अशा आदिवासी जमातीतल्या की, ज्यांची नाळच मुळात निसर्गाशी जोडलेली आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचे वडील वारले. आईसोबत एका नर्सरीत रोजंदारीवर काम करत तुलसी लहानाच्या मोठ्या झाल्या. वयाच्या अगदी दहाव्या, बाराव्या वर्षापासूनच त्यांचा झाडाफुलांशी जवळून संबंध आला. कर्नाटकात एकूणच जैववैविध्य भरपूर आहे. त्यात तुलसी या वन खात्यातदेखील स्वयंसेवक म्हणून काम करत होत्या. त्यांचं निसर्गाचं वेड आणि मुख्य म्हणजे ज्ञान पाहून वन विभागाने त्यांना एका नर्सरीचं काम देऊ केलं. वन विभागाच्या कामात तुलसी आजींनी स्वतःला झोकून घेतलं. गेल्या सहा दशकात त्यांनी ३०,०००हून अधिक झाडं रुजवली, वाढवली, त्यांची देखभाल केली. बी-बियाण्यांचं जतन, संवर्धन, लागवड आणि रोपांची निगा यातल्या तुलसी गौडा एक विश्वकोश बनल्या. स्थानिक वनस्पती, त्यांचे उपयोग यांचा चालता-बोलता संग्रह. कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना त्या वनस्पती शास्त्रात स्वतःच्या अनुभवातून पारंगत बनत गेल्या.प्रत्येक झाड हे एक मूल असतं. त्याचे वाढीचे टप्पे, पाण्याची, सूर्यप्रकाशाची, खताची गरज वेगळी असते. प्रत्येक झाडाचा वाढण्या-फुलण्याचा एक विशिष्ट ऋतू असतो. जंगलातल्या ठराविक झाडांचं बी कधी लागतं, ते किती दिवस झाडावर पक्व होऊ द्यावं, कधी ते काढावं, कसं जतन करावं, कधी ते मातीत पुन्हा पेरावं, ह्याचं शास्त्र असतं. तुलसी गौडा त्यांच्या उपजत निसर्ग ज्ञानातून आणि अनुभवातून हे सर्व शिकत गेल्या. हजारो झाडं त्यांनी मातीत रुजवली, जपली.

(Image : google)

त्यांचं निसर्गाप्रति असलेलं काम, तळमळ पाहून तिथले लोक त्यांना ‘वनदेवी’, ‘जंगलाचा विश्वकोश’ अशा नावाने संबोधू लागले.हजारो झाडांची नुसती लागवडच नाही, तर जतन, संवर्धन करत असताना लहान मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी, यासाठीदेखील तुलसी आजी अविरत कष्ट घेत असतात. झाडांची गोष्ट सांगणाऱ्या आजी.घरची गरिबी, शिक्षण नसणं, साधन सामग्रीचा अभाव अशी आयुष्यात रडत बसायची हजारो कारणं एकीकडे आणि हे सगळं असूनही आपण काही भरीव योगदान निसर्गाप्रति देऊ शकतो, असा आत्मविश्वास दुसरीकडे. त्यातूनच तुलसी गौडा घडल्या. त्यांचे ते अनवाणी पाय मातीशी असलेलं त्यांचं नातं सांगतात. सर्व अभावातदेखील आपल्याकडे जे काही आहे, तेच वाढवत नेलं, अविरत कष्ट घेतले तर प्रत्येक स्त्रीला तुलसी आजीकडून प्रेरणा मिळू शकते. त्या केवळ निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रातली प्रेरणा नाहीत, तर खंबीरपणे स्वतःचं आयुष्य उभं करण्याचीदेखील ऊर्जा आहेत... अशाच लाखो स्त्री-पुरुषांसाठी...

(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)prachi333@hotmail.com

टॅग्स :पद्मश्री पुरस्कारप्रेरणादायक गोष्टी