Join us  

...मी फक्त रॅकेटने उत्तरे देते! असं का म्हणतेय पी.व्ही. सिंधू: काय तिचे अवघड पेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 2:29 PM

आयुष्यात सगळ्यांनाच अडचणी येतात. कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. माझ्याही आयुष्यात अवघड पेच आले, पण मी हातात रॅकेट घेतली आणि रॅकेटने सगळे प्रश्न टोलवले.... असं सांगतेय पी. व्ही. सिंधू. 

ठळक मुद्देतुम्ही हरता की जिंकता ही भावना खूप नंतरची आणि खूपच वेगळी असते. पण अशा खडतर वेळी मैदानात टिकून राहणं खरोखरंच खूप अवघड असतं. 

पी. व्ही. सिंधू म्हणजे ऑलिम्पिकमध्ये भारताचं भुषण. क्रिकेट वगळता अन्य खेळांच्या खेळाडूंना आपल्याकडे खूपच कमी ग्लॅमर मिळतं. अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे पी. व्ही. सिंधू. नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील तिची दमदार कामगिरी तिच्या लोकप्रियतेत भर टाकणारीच आहे. ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा पदक मिळविणारी पी. व्ही. सिंधू ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. याशिवाय जगभरातील ज्या महिला खेळाडूंना स्टारडम आहे, त्यांच्यापैकी एक नाव म्हणून पी. व्ही. सिंधूकडे पाहिलं जातं. तिचाही प्रवास सोपा नव्हताच. तिलाही अनेक अडचणी आल्या. पण प्रत्येक अडचणीवर मात करून ती कशी पुढे गेली हे तिने वारंवार तिच्या मुलाखतींमधून सांगितलं आहे. रॅकेट हे उत्तर देण्यासाठी माझ्या हातातलं सगळ्यात उत्तम साधन आहे, असंही ती सांगते.

 

टोकियो ऑलिम्पिकच्या आठवणी सांगताना ती म्हणाली की जेव्हा मी सेमी फायनल मॅच हरले आणि माझ्या रजत पदकाच्या आशा मावळल्या, तेव्हा मी खूप जास्त नाराज झाले होते. पण माझ्या प्रशिक्षकांनी मला तेव्हा एकच वाक्य सांगितलं आणि ते म्हणजे ऑलिम्पिकमध्ये चौथं स्थान मिळवणं आणि तिसऱ्या स्थानावर असलेलं कांस्य पदक पटकावणं यात खूप जास्त अंतर आहे. त्या अवघड परिस्थितीत हे वाक्य खूपच महत्त्वाचं होतं. गोल्ड आणि सिल्व्हर मेडल मिळू शकत नाही, हे स्पष्ट झालंच होतं. पण त्याचा विचार करून खचून जायचं की कांस्य पदकासाठी पुन्हा लढा द्यायचा, हे लक्षात येत नव्हतं. पण वेळीच सावरले आणि रॅकेट घेऊन पुन्हा मैदान गाठलं. तुम्ही हरता की जिंकता ही भावना खूप नंतरची आणि खूपच वेगळी असते. पण अशा खडतर वेळी मैदानात टिकून राहणं खरोखरंच खूप अवघड असतं. 

 

पी. व्ही. सिंधू म्हणते की जेव्हा लोक तुमचं कौतूक करत असतात, जेव्हा तुमच्या देशातली मुलं- मुली तुमच्यासारखं व्हायचं स्वप्न बघत असतात, तेव्हा ती फिलिंग खूप छान असते. पण हे सगळं एकीकडे हाेणं आणि त्याचवेळी तुमची मैदानातली फाईट यात खूपच जास्त अंतर आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये मी पहिल्यांदाच जिंकले होते.

 

पण या विजयामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. या ऑलिम्पिकमध्ये सिंधूकडून मेडल मिळावं, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. त्यामुळे या सगळ्या दडपणात मी यंदा खेळले. मी हरेल की जिंकेल हे माहिती नव्हतं. बस रॅकेट हातात घेऊन खेळणं आणि सगळ्या प्रश्नांना रॅकेटच्या माध्यमातूनच उत्तर देणं एवढंच मला ठाऊक होतं, असं सिंधू म्हणाली. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीपी. व्ही. सिंधूटोकियो ऑलिम्पिक 2021