lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > अफगाणी बायकांचा दर्द सांगत तालिबानी सत्तेसमोर उभी ठाकणारी निडर कलाकार, चित्र तिचे शस्त्र झाले!

अफगाणी बायकांचा दर्द सांगत तालिबानी सत्तेसमोर उभी ठाकणारी निडर कलाकार, चित्र तिचे शस्त्र झाले!

शमसिया हसानी हिची कला आपल्याला कधीच दिसणार नाही अशी जगभरातल्या लोकांची खात्री झाली होती. कारण तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करायला सुरुवात केली तशी शमसिया हसानी समाज माध्यमांवरुन लुप्त झाली. पण आपण आहोत आणि आपल्या कलेच्या माध्यमातून आपण कायम बोलत राहाणार हा संदेश घेऊन शमसिया हसानीने दोन चित्रं समाजमाध्यमांवर प्रसिध्द केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 07:48 PM2021-09-16T19:48:02+5:302021-09-17T12:40:26+5:30

शमसिया हसानी हिची कला आपल्याला कधीच दिसणार नाही अशी जगभरातल्या लोकांची खात्री झाली होती. कारण तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करायला सुरुवात केली तशी शमसिया हसानी समाज माध्यमांवरुन लुप्त झाली. पण आपण आहोत आणि आपल्या कलेच्या माध्यमातून आपण कायम बोलत राहाणार हा संदेश घेऊन शमसिया हसानीने दोन चित्रं समाजमाध्यमांवर प्रसिध्द केली.

Fearless artiste standing in front of the Taliban regime expressing the pain of Afghan women. pictures have become her weapon! | अफगाणी बायकांचा दर्द सांगत तालिबानी सत्तेसमोर उभी ठाकणारी निडर कलाकार, चित्र तिचे शस्त्र झाले!

अफगाणी बायकांचा दर्द सांगत तालिबानी सत्तेसमोर उभी ठाकणारी निडर कलाकार, चित्र तिचे शस्त्र झाले!

Highlights शमसिया हसानी ही अफगाणमधील पहिली ग्राफिटी आणि स्ट्रीट आर्टिस्ट आहे. तिची ही कला केवळ अफगाणिस्तानात दबून राहिली नाही.अफगाण स्त्रियांचा आवाज , त्यांच्या मनातील भावना शमसिया हिने जोरकसपणे आपल्या ग्राफिटीतून व्यक्त केल्या.अफगाण महिलांकडे बघण्याची दृष्टी बदलण्यासाठी शमसिया आपल्या कलेतून प्रयत्न करतेय.छायाचित्रं - गुगल

 अफगाणिस्तानात सध्या चर्चा फक्त तालिबान्यांचीच. आवाज फक्त त्यांचाच. या देशात काही काळापूर्वी थोड्या प्रमाणात का होईना स्त्रिया मुक्त जगत होत्या हे विसरायला लावणारा हा काळ अफगाणिस्तानात अवतरला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानातल्या महिला घराबाहेर पडत नाहीये. सार्वजनिक ठिकाणी वावरत नाहीये. अनेक कलाकारांनी समाजमाध्यमांवरुन आपली कला, संदेश हटवले आहेत. यापुढे शमसिया हसानी हिची कला आपल्याला कधीच दिसणार नाही अशी जगभरातल्या लोकांची खात्री झाली होती. कारण तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करायला सुरुवात केली तशी शमसिया हसानी समाज माध्यमांवरुन लुप्त झाली. पण आपण आहोत आणि आपल्या कलेच्या माध्यमातून आपण कायम बोलत राहाणार हा संदेश घेऊन शमसिया हसानीने दोन चित्रं समाजमाध्यमांवर प्रसिध्द केली.
  ‘ डेथ टू डार्कनेस’ या मालिकेअंतर्गत प्रसिध्द झालेली ही दोन चित्रं. दहशतीच्या काळ्या पार्श्वभूमीवर दोन चमकदार निळ्या रंगातल्या मुली एकाच वेळेस दहशत आणि आशेच्या प्रतिमा दाखवतात. आजच्या अफगाण स्रीच्या , तरुणींच्या मनातला मूक कोलाहल व्यक्त करण्यासाठी फुलं, झाड, संगीत अशा प्रतिमा वापरुन शमसियाने दहशतीच्या दडपशाहीविरुध्द मूक झालेल्या अफगाण स्त्रियांना, त्यांच्या मनातील भावनांना आपल्या कलेतून शब्द दिले आहेत.

छायाचित्र- गुगल

शमसिया हसानी ही अफगाणमधील पहिली ग्राफिटी आणि स्ट्रीट आर्टिस्ट आहे. तिची ही कला केवळ अफगाणिस्तानात दबून राहिली नाही. जगभरात तिच्या या कलेला, कलेतून व्यक्त केलेल्या विचारांना दाद मिळाली. अफगाण स्त्रियांचा आवाज , त्यांच्या मनातील भावना शमसिया हिने जोरकसपणे आपल्या ग्राफिटीतून व्यक्त केल्या. स्वातंत्र्याची आशा मनात ठेवून निर्भिडपणे उमलण्याची, फुलण्याची इच्छा असलेली अफगाण मुलगी, तरुणी, महिला तिने जगभरात पोहोचवली. उत्तर अमेरिकेत, युरोपियन आणि आशियाई देशात तिने गॅलरी प्रदर्शनात सहभाग घेतला. तालिबान्यांच्या अफगाणिस्तानावरील कब्ज्यानंतर शमसिया हसानी हिने समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या या दोन चित्रांना लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. तिच्या या अभिव्यक्तीवर हजारो प्रतिक्रिया आल्या, इन्स्टाग्रामवरुन तिची ही चित्रं हजारोंनी फॉरवर्ड केली.

शमसिया हसानी हिने ही दोन चित्रं प्रसिध्द करुन मोठा धोका पत्करल्याच्या भावना व्यक्त होत आहे. तालिबानी अशी अभिव्यक्ती सहन करत नाही. त्यात शमसिया ही स्त्री आहे आणि कलाकारही. तिच्या जीवाला मोठा धोका असल्याची भीती जगभरातून व्यक्त होत आहे.

छायाचित्र- गुगल

अफगाणिस्तानमधे अफगाण सरकारच्या काळातही ग्राफिटी आर्टिस्ट म्हणून काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती. स्वत: शमसियालाही याची जाणीव होती. महिलांनी अशी कला सादर करत फिरणं, अभिव्यक्त होणं हे अफगाणिस्तानात मान्य नाही हे माहित असतानाही शमसिया हिने अफगाण महिलेच्या मनाला आपल्या भित्तीचित्रातून व्यक्त केलं. अफगाणिस्तानात सतत होणार्‍या स्फोटांची दहशत तिच्याही मनात होती. म्हणूनच अफगाण रस्त्यावरील भिंतीवर ग्राफिटी चितारताना ती छोट्या आकाराची चित्रं काढायची. म्हणजे काही झालं तर पटकन तिथून निसटता यावं हा त्यामागचा तिचा विचार. नंतर नंतर शमसिया इमारतींचे, रस्त्याचे फोटो काढून स्नॅपशॉटद्वारे चित्रं रेखाटायला लागली. अफगाण महिलांकडे बघण्याची दृष्टी बदलण्यासाठी शमसिया आपल्या कलेतून प्रयत्न करतेय. येथील बुरख्यातील स्त्री तिने जगापुढे कलेतून मांडताना वास्तवापेक्षा खूप मोठी, आधुनिक आणि आनंदी दाखवली.

छायाचित्र- गुगल

1988 मध्ये शमसिया इराणमधे निर्वासित अफगाण आईबापाच्या पोटी जन्माला आली . 2005 मध्ये शमसिया पुन्हा अफगाणिस्तानात आली . तिने काबूल युनिव्हर्सिटीत चित्रकला आणि दृश्यकलेचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. 2010मधे तिने ग्राफिटी साकारायला सुरुवात केली तेव्हा तिने कलेतली पदवी घेतली होती. तेव्हापासून आजपर्यंत अफगाण महिलांना वेगवेगळ्या प्रकारे तिने अभिव्यक्त केलं. अफगाण महिलांना तिच्या कलेतून तिने आवाज दिला. आपल्या कलेतून अफगाण महिलांना ताकद मिळावी हा तिचा तिच्या कलेमागचा उद्देश आहे. आताही तिने सोशल मीडियाद्वारे इमेजेस प्रसिध्द केल्यानंतर सोबत जगानं अफगाण महिला विस्मरणात जाणार नाही यासाठी मदत करण्याची विनंतीही केली.
शमसियाच्या कलेकडे डोळे लावून बसलेलं जग तिची ही विनंती नक्कीच अव्हेरणार नाही अशी खात्री वाटते.

Web Title: Fearless artiste standing in front of the Taliban regime expressing the pain of Afghan women. pictures have become her weapon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.