Join us
Daily Top 2Weekly Top 5

..आणि मी बरी झाले! कॅन्सर बरा होतो, आयुष्य नव्यानं आनंदात जगता येतं, विश्वास ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2023 14:50 IST

उमेद सपोर्ट ग्रुप :  ब्रेस्ट कॅन्सर झाला हे कळल्यावर भीती वाटली, पण तो बरा होतो, आयुष्य नव्यानं जगता येतं..

ठळक मुद्देनवे आयुष्य मी आनंदाने जगते आहे.

निशा पंकज गोऱ्हेमी मध्यमवर्गीय घरातली एक साधीसुधी बाई.  मला एक मुलगी, एक मुलगा व पती असा आमचा सुखी संसार. माझे पती बीएसएनएल मध्ये जॉबला आणि मी एका कोचिंग क्लाससमध्ये अकाऊण्टस शिकवायला जात असे. माझे सासर आणि माहेर भुसावळ. जानेवारी २०१९ मध्ये माझ्या मुलीचे लग्न झाले. त्या वर्षीच आमच्या सोसायटीचे बोअरिंगचे पाणी गेले. तेव्हाच आम्ही ठरविले की आपण इथून निघून नाशिकला जायचे. पण नियतीने वेगळ्या प्रकारे आम्हाला नाशिकला आणले. मार्च २०२० मध्ये  कोरोना आला.  त्याच जुलै महिन्यात मला माझ्या शरीरात काहीतरी बदल जाणवायला लागला. पण माझ्या पतीला आणि मुलाला कोरोना होईल भीतीमुळे काही बोलले नाही.पण माझ्या पतीला माझ्या शरीरातील बदल जाणवला व ते मला भुसावळमधील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे सांगितल्याप्रमाणे सीटी स्कॅन केला आणि त्यामध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. आम्ही सर्वजण खूपच घाबरलो. तेथील डॉक्टरांनी नाशिकच्या डॉ, राज नगरकर यांचे नाव सुचविले आणि सांगितले की तिथे एकाच छताखाली तुम्हाला सगळी ट्रीटमेंट मिळेल. २६ ऑगस्ट २०२० ला आम्ही नाशिकमध्ये आलो. कोरोनामुळे कुणा नातेवाईकाकडे जायचे नव्हते. मग करायचे काय असा प्रश्न पडला. माझ्या मोठ्या बहिणीचे घर भाभा नगर मध्ये होते आणि तेव्हा ते बंद असायचे. ती मंडळी पुण्यात राहायला गेली होती. त्यांना फोन केला तर देवकृपेने त्यांच्या घराची एक किल्ली शेजाऱ्यांकडे ठेवली होती. त्यामुळे आमची नाशिकला राहण्याची सोय झाली. कोरोनाकाळात भुसावळ-नाशिक ये-जा करणे शक्य नव्हते.

मानवता हॉस्पिटलला आलो! ते हॉस्पिटल पाहून मला खूप भीती वाटली. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. डॉक्टरांनी चेक करायला बोलविले. मग शांतपणे म्हणाले, “ताई, तुमचे वय किती?” मी म्हणाले, “५२ वर्ष”.डॉक्टर म्हणाले, “मी अजून २० वर्ष वाढवून देतो. तुम्ही रडू नका.” हे ऐकल्यावर मनात थोडे हायसे वाटायला लागले.नाशिकला जरी आले तरी मन भुसावळमध्ये गुंतले होते. माझी मुलगी ७ महिन्यांची गरोदर होती. मला सारखे रडू येऊ लागले. कारण त्या काळात तिला माझी गरज होती. पण तिची सासरची मंडळी खूपच समजूतदार होती. त्यांनी समजावले की, “पहिले तुमची तब्येत ठीक करा आणि नंतर बाळाशी खेळायला, त्याचे लाड करायला तयार व्हा.”मग हॉस्पिटलमध्ये माझ्या सर्व ब्लड टेस्ट झाल्या, बायोप्सी झाली, व पेट सीटी स्कॅन झाले. पेट स्कॅनचा रीपोर्ट आल्यावर कळले की कॅन्सर सुदैवाने शरीरात इतर कुठे पसरला नव्हता, केवळ ब्रेस्ट मध्येच होता.या काळात कोणी भेटायला येऊ शकत नव्हते. कोरोनामुळे सगळेच हतबल होते. सर्व नातेवाईक फोन करूनच चौकशी करायचे. पण त्या काळात माझ्या पतींची बहीण भारती दाणी, पतींचे बालमित्र शैलेश महाजन यांनी आम्हाला खूप मदत केली. मानसिक आधार दिला. माझे एकूण १६ किमो झाले आणि २८ जानेवारी २०२१ मध्ये ऑपरेशन झाले. त्यानंतर २० रेडीएशन व १३ मेंटेननसचे इंजेक्शन झाले. ही सगळी ट्रीटमेंट ३० ऑक्टोबर २०२१ ला पूर्ण पर पडली. त्यानंतर मी दर तीन महिन्यांनंतर डॉक्टरांकडे नियमितपणे चेकअप साठी जात होते. २ मे २०२२ ला पोर्ट पण काढला. अशा प्रकारे मी पूर्णपणे बरी झाले होते.ट्रीटमेंटच्या दरम्यान मला हॉस्पिटलचे खूप चांगले अनुभव आले. किमो सुरू असतांना डॉक्टर श्रुती काटे मॅडम यायच्या. त्या खूप गोड बोलायच्या, आणि समजावून सांगायच्या. त्यामुळे मला खूप धीर यायचा. याप्रवासादरम्यान आमचा इन्शुरंस होता, ज्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. माझ्या पतींनी त्यानंतर माझ्या बहिणीला, माझ्या जावेला, माझ्या जावयांना, इनसुरन्स काढण्याचा आग्रह केला. कारण, खरंच कोणावर कोणती वेळ कशी व केव्हा येईल  काही सांगता येत नाही.हे सगळे घडत असतांना माझ्या मुलीला मुलगा झाला. मी आजी झाले होते.  मला खूपच आनंद झाला होता. आता माझ्या नातू अडीच वर्षाचा आहे, मला “आजी आजी” म्हणतो. आणि आता आम्ही यांचे भुसावळचे घर विकून कायमस्वरूपी नाशिकला स्थायिक झालो आहोत.नवे आयुष्य मी आनंदाने जगते आहे.

अधिक माहिती आणि संपर्कHCG मानवता कॅन्सर सेंटर् उमेद पेशंट सपोर्ट ग्रुपumed.warriors@gmail.comफोन- 9145500381

टॅग्स :कॅन्सर जनजागृतीकर्करोगस्तनाचा कर्करोग