Join us  

अंध लेकीसह चार वर्षे स्वत: अभ्यास करणाऱ्या आईलाही कॉलेजने दिली मानद डिग्री, आईची जिद्द ठरली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 3:19 PM

अंध लेकीला नोट्स वाचून दाखवणाऱ्या, तिच्या शिक्षणासाठी स्वत: कष्ट उपसणाऱ्या आईचा विद्यापीठाने केला सन्मान.

ठळक मुद्देजगभरात माणसांनी या मायलेकीची उमेद समजून घेत आईच्या कष्टांची दाद दिली.

उमेद देणाऱ्या, संघर्ष करायला शिकवणाऱ्या गोष्टी कधीच जुन्या होत नाही. तशीच ही गोष्ट. मायलेकीची. मात्र २०१८ सालची. पण गेली अनेक वर्षे ती इंटरनेट फॉरवर्डच्या चक्रात फिरते आहे. हजारदा शेअर, फॉरवर्ड होते. दरवर्षी मदर्स डे जवळ आला की पुन्हा ती गोष्ट नवनवीन टेम्पलेट घेत व्हायरल होते. यंदाही सध्या ही गोष्ट पुन्हा व्हायरल आहेच. तर ती गोष्ट काय? गोष्ट आहे एका अंध मुलीची आणि तिच्या आईची. आणि त्या दोघींनी एकत्र मिळवलेल्या पदवीची. तुर्की देशातली ही गोष्ट. बेरु नावाची लेक आणि हवा नावाच्या तिच्या आईची.

(Image : Google)

तुर्कीतल्या सकारया विद्यापीठातली ही गोष्ट. त्या विद्यापीठात कायद्याच्या पदवीसाठी बेरु मर्व्ह कूल या तरुणीने प्रवेश घेतला. ती अंध. कॉलेजात अंध विद्यार्थ्यांना अभ्यास सोयीचा होईल अशा काहीच सुविधा नव्हत्या. त्यामुळे बेरुची आई हवा तिच्यासोबत कॉलेजला यायची. तिचा अभ्यास घ्यायची. नोट्स लिहून घेणं, वाचून दाखवणं, बेरुची परीक्षेची तयारी करुन घेणं हे सारं आईनं केलं. चार वर्षे मायलेकींचा हा सिलसिला आणि अभ्यासाची, शिक्षणाची तळमळ सुरुच होती. बेरुच्या आईनं तिला नुसती शाब्दिक-आर्थिक मदतच केली नाही तर चार वर्षे तिनं लेकीच्या शिक्षणासाठी शक्य तरी सारी मदत तिला केली. पदवी परीक्षेचा निकाल लागला. पदवीदान सोहळ्याला बेरु आईसह आली होती. प्रो. महमूत बिलेन यांनी त्यावेळी जाहीर केलं की बेरु तर उत्तीर्ण झालीच आहे मात्र तिच्या शिक्षणासाठी चार वर्षे खस्ता खाणाऱ्या आईलाही आम्ही मानद पदवी देत आहोत.

ते ऐकून अर्थातच मायलेकी खूप हळव्या झाल्या. त्या मानद पदवी सोहळ्याचा आणि मायलेकीला एकत्र पदवी मिळण्याचा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला.आणि अजूनही तो व्हिडिओ आणि ही पोस्ट व्हायरल होतेच आहे.

(Image : Google)

पर्यायच नाही म्हणून रडत न बसता या मायलेकींनी शिक्षणाच्या कळकळीपोटी जे कष्ट उपसले त्याचे आजही जगभर कौतुक होते आहे. जगभरात माणसांनी या मायलेकीची उमेद समजून घेत आईच्या कष्टांची दाद दिली.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी