Join us  

कल्पनेला सलाम! प्राणी खरेदी-विक्री ॲपची निर्मिती करत तरुणींनी उभारला ५०० कोटींचा व्यवसाय, फोर्ब्सच्या यादीत मिळवले स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 9:42 AM

Animal trade application created by neetu yadav and kirti jangda Success story : आतापर्यंत या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ८.५ लाखांहून अधिक जनावरांची विक्री झाली आहे.

तुमच्याकडे कल्पनाशक्ती आणि जिद्द असेल तर तुम्ही काहीही करु शकता याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येत असतो. तरुणांच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना आणि त्याला असलेली जिद्दीची आणि हुशारीची जोड यामुळे गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रात प्रगती झाल्याचे आपण पाहत आहोत. स्टार्ट अप किंवा एखादा नवा व्यवसाय सुरू करण्यामध्ये केवळ तरुणच नाही तर तरुणींचाही पुढाकार असल्याचे दिसते. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तरुणी हे व्यवसाय यशस्वी करुन दाखवत असल्याचे आशादायी चित्र आहे. नुकताच २ तरुणींनी सुरू केलेला प्राणी खरेदी-विक्रीचा ऑनलाइन व्यवसाय त्यांनी अतिशय उत्तमपणे यशस्वी करुन दाखवला आहे. नीतू यादव व कीर्ती जांगडा या तरुणींच्या कल्पनेतून एक खास अ‍ॅनिमल अ‍ॅप्लिकेशन तयार झाले असून हे अॅप देशभरातील ८० लाख शेतकरी वापरत आहेत. Animall असे या अॅप्लिकेशनचे नाव आहे. त्यांच्या या स्टार्टअपचे वार्षिक उत्पन्न ५५० कोटींहून अधिक आहे (Animal trade application created by neetu yadav and kirti jangda Success story). 

आतापर्यंत या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ८.५ लाखांहून अधिक जनावरांची विक्री झाली आहे. कीर्ती आणि नीतू यांनी मिळवलेल्या यशाची देशभर चर्चा सुरू आहे. अ‍ॅनिमल अॅपच्या त्यांच्या संकल्पनेची आणि त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करीत फोर्ब्स या मासिकाने या दोघांचाही ३० वर्षांखालील वयोगटातील सुपर-३० च्या यादीत समावेश केला आहे. एरवी केवळ ओळखीत किंवा आठवडी बाजारात होणारी गाई, म्हशी,शेळ्या आणि इतर पाळीव प्राण्यांची खरेदी-विक्री आता घरबसल्या एका क्लिकवर करता येणे शक्य झाले आहे. नीतू यादव आणि कीर्ती जांगडा या दोघीही आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण झाल्या आहेत. या दोघींबरोबर त्यांचे दोन मित्र अनुराग बिसोय व लिबिन व्ही. बाबू यांनी मिळून हा अॅप्लिकेशनच्या माध्यमातून प्राणी खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 

(Image : Google)

आपण ज्याप्रमाणे फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, झोमॅटो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन विविध गोष्टींची , पदार्थांची खरेदी करतो, त्याचप्रमाणे हे अॅप्लिकेशन काम करणार आहे. अवघ्या तीन महिन्यांत नोव्हेंबर २०१९ मध्ये नीतू व कीर्ती यांनी ५० लाख रुपयांच्या भांडवलासह ही स्टार्टअप कंपनी सुरू केली. या अ‍ॅपचा वापर करून आपल्याला आपल्या ठिकाणापासून १०० किलोमीटरच्या परिसरातील प्राणीविक्रेते आणि खरेदीदार यांची माहिती मिळते. मग आपल्या आवश्यकतेनुसार आपण संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून ही खरेदी किंवा विक्री करु शकतो.  या अ‍ॅनिमल अ‍ॅपच्या माध्यमातून दर महिन्याला ३५० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. या अॅप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांचे काम खूपच सोपे झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीफोर्ब्स